>> औपचारिकपणे भाजपात प्रवेश
बंडखोर कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करीत येथील भाजप मुख्यालयात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे भाजपात प्रवेश केला.
भारताचे भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे. मोदींच्या धोरणांमुळे आपण प्रभावित झालो आहे, अशा शब्दात पंतप्रधानांविषयी शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोक सेवा करण्यासाठी आपल्याला व्यासपीठ दिल्याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी व नड्डा यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. तर भाजपात ज्योतिरादित्य यांचे स्वागत करताना नड्डा यांनी भाजपाच्या एक संस्थापक तथा ज्योतिरादित्य यांच्या आजी विजयाराजे शिंदे यांचा नामोल्लेख करीत ज्योतिरादित्य आपल्या कुटुंबात आले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या मनोगतात कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेस आज पूर्वीची राहिलेली नाही आणि कॉंग्रेसमध्ये राहून लोकांची सेवा करता आली नाही म्हणून वेदना होत आहेत, असे ते म्हणाले.
ज्योतिरादित्य, उदयनराजे यांना राज्यसभा उमेदवारी
भाजपने काल ९ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर केली. नावे पुढीलप्रमाणे ः- मध्य प्रदेश – ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंग चौहान. आसाम – भुवनेश्वर कालिता. गुजरात – अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा. झारखंड – दीपक प्रकाश. मणिपूर – लिसिएंबा महाराजा, महाराष्ट्र – उदयनराजे भोसले, रामदास आठवले. राजस्थान – राजेंद्र गहलोत.