पंजाबचा ४५ धावांनी दारुण पराभव

0
144

>> सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक सत्कारणी

किंग्स इलेव्हन पंजाबला काल सोमवारी सनरायझर्स हैदराबादकडून ४५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४८ वा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. सनरायझर्सने विजयासाठी ठेवलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबला केवळ १६७ धावांपर्यंत मजल मारता आली.

डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स पंजाबला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. परंतु, खलिलने धोकादायक ठरू पाहणार्‍या ख्रिस गेल (३) याला स्वस्तात बाद करत पंजाबला जोरदार धक्का दिला. अगरवाल व राहुल यांच्यात दुसर्‍या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी झाली. ही दुकली असताना पंजाबच्या विजयाची शक्यता होती. परंतु, अगरवालच्या परतण्यामुळे ही जोडी फुटताच राहुलवर दबाव वाढला. राहुलने ५६ चेंडूंत ७९ धावांची शानदार खेळी केली. परंतु, दुसर्‍या टोकाने अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याचे एकहाती प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरच्या ८१ धावा आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या उपयुक्त योगदानासह २० अवांतर धावांच्या खैरातीच्या बळावरे हैदराबादने २१२ धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड वॉर्नरने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीवर अंकुश लावण्यात पंजाबचे गोलंदाज अपयशी ठरले. मायदेशी रवाना होण्यापूर्वी यंदाच्या मोसमातील आपला अखेरचा सामना खेळणार्‍या वॉर्नरने पहिल्या गड्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज वृध्दिमान साहासोबत ७८ धावांची दणकेबाज सलामी दिली. सलामीला बढती मिळालेल्या साहाने केवळ १३ चेंडू खेळताना २८ धावांची खेळी केली. मुरुगन अश्‍विनच्या गोलंदाजीवर प्रभसिमरनने त्याचा सुरेख झेल टिपला. साहा तंबूत परतल्यानंतर वॉर्नरने मनीष पांडेच्या साथीने डावाला उभारी देण्याचे काम केले. साहाने दिलेली वेगवान सुरुवात वाया जाणार नाही याची दक्षता पांडेने घेतली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ८२ धावा जोडताना संघाला १६० पर्यंत पोहोचविले. रविचंद्रन अश्विनने पांडेला (३६) माघारी धाडत हैदराबादची जमलेली जोडी फोडली.
या दरम्यान वॉर्नरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यंदाच्या मोसमातील वॉर्नरचे हे आठवे व आयपीएलमधील एकूण ४४वे अर्धशतक ठरले. पांडेला बाद केलेल्या षटकातच अश्‍विनने वॉर्नरचा काटा काढला. परंतु, तोपर्यंत हैदराबादने मोठी मजल मारली होती. नबी (१० चेंडूंत २०) व विल्यमसन (७ चेंडूंत १४) या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये आपली कामगिरी सुधारली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबकडून रविचंद्रन अश्‍विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. त्यांना अर्शदीप सिंग आणि मुरुगन अश्‍विनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. मुजीब गो. रविचंद्रन अश्‍विन ८१, वृध्दिमान साहा झे. सिमरन सिंग गो. मुरुगन अश्‍विन २८, मनीष पांडे झे. शमी गो. रविचंद्रन अश्‍विन ३६, मोहम्मद नबी त्रि. गो. शमी २०, केन विल्यमसन झे. मुरुगन अश्‍विन गो. शमी १४, राशिद खान त्रि. गो. अर्शदीप १, विजय शंकर नाबाद ७, अभिषेक शर्मा नाबाद ५, अवांतर २०, एकूण २० षटकांत ६ बाद २१२
गोलंदाजी ः अर्शदीप सिंग ४-०-४२-१, मुजीब रहमान ४-०-६६-०, मोहम्मद शमी ४-०-३६-२, रविचंद्रन अश्‍विन ४-०-३०-२, मुरुगन अश्‍विन ४-०-३२-१
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. विल्यमसन गो. खलिल ७९, ख्रिस गेल झे. पांडे गो. खलिल ४, मयंक अगरवाल झे. शंकर गो. राशिद २७, निकोलस पूरन झे. कुमार गो. खलिल २१, डेव्हिड मिलर झे. शंकर गो. राशिद ११, रविचंद्रन अश्‍विन झे. पांडे गो. राशिद ०, प्रभसिमरन सिंग पायचीत गो. संदीप १६, मुरुगन अश्‍विन नाबाद १, मुजीब रहमान त्रि. गो. संदीप ०, मोहम्मद शमी नाबाद १, अवांतर ७, एकूण २० षटकांत ८ बाद १६७
गोलंदाजी ः खलिल अहमद ४-०-४०-३, भुवनेश्‍वर कुमार ४-०-३४-०, संदीप शर्मा ४-०-३३-२, राशिद खान ४-०-२१-३, अभिषेक शर्मा १-०-११-०, मोहम्मद नबी ३-०-२८-०

प्ले ऑफ’ लढतींच्या वेळेत बदल

इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ‘प्ले ऑफ’च्या लढतींची वेळ बदलण्यात आली आहे. नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी हे सामने सुरू होणार आहे. सध्या रात्रीचे ८ वाजता सुरू होतात. परंतु प्ले ऑफचे सामने ८ ऐवजी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत. या सामन्यासाठी नाणेफेक ७ वाजता होईल. पहिला ‘प्ले ऑफ’चा सामना चेन्नईमध्ये ७ मे रोजी खेळला जाईल, तर दुसरा सामना ८ मे रोजी होईल. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि दुसर्‍या सामन्यातील विजयी संघात १० मे रोजी विशाखापट्टणम येथे सामना होईल. यानंतर १२ मे रोजी अंतिम सामना खेळविला जाईल. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्येही प्ले ऑफच्या सामन्यांची वेळ बदलली होती. प्ले ऑफच्या लढतींदरम्यान महिलांचे चार टी-२० सामने खेळले जाणार आहे. हे सामने ७.३० वाजता सुरू होणार आहेत. तसेच प्रत्येक संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात येत असलेले अपयश व दवामुळे गोलंदाजीवर होणारा परिणाम या सर्व बाबी लक्षात घेऊनच वेळेत बदल करण्यात आला आहे. याआधी स्टार स्पोटर्‌‌सने देखील प्ले ऑफच्या सामन्यांची वेळ बदलण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. परंतु, संघमालकांच्या आग्रहास्तव बीसीसीआयने त्यावेळी याकडे दुर्लक्ष केले होते.