पंचायत निवडणुकीसाठी ५०३८ उमेदवार रिंगणात

0
13

>> ६२१ उमेदवारांनी घेतली माघार

>> एकूण ६४ जणांची बिनविरोध निवड

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या येत्या १० ऑगस्ट २०२२ रोजी होणार्‍या निवडणुकीचे चित्र काल अर्जांच्या छाननीनंतर स्पष्ट झाले. पंचायत निवडणुकीसाठी एकूण ५०३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील ६२१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर निवडणुकीत एकूण ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

राज्यातील १८६ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५२८ प्रभाग असून उत्तर गोव्यातील ९७ आणि दक्षिण गोव्यातील ८९ पंचायतींचा समावेश आहे. या १५२८ प्रभागांतील ६४ प्रभागांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५७२३ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६२१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ग्रामपंचायत निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण केले. निवडणुकीत प्रभागांतून दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.

बार्देशमधून सर्वाधिक उमेदवार
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार बार्देश तालुक्यातून रिंगणात आहेत. तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमधून ९९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पेडण्यातील १७ ग्रामपंचायतींमधून ४५० उमेदवार, डिचोलीत १७ ग्रामपंचायतींमधून ३८० उमेदवार, सत्तरीतील १२ ग्रामपंचायतीमधून २५९ उमेदवार, तिसवाडीतील १८ ग्रामपंचायतीमधून ५८३ उमेदवार, फोंड्यातील १९ ग्रामपंचायतीतून ६०१ उमेदवार, धारबांदोड्यातील ५ ग्रामपंचायतींतून १२३ उमेदवार, सांगेतील ७ ग्रामपंचायतींमधून १५६ उमेदवार, सासष्टीतील ३३ ग्रामपंचायतींमधून ८६३ उमेदवार, मुरगावातील ७ ग्रामपंचायतींमधून २१९ उमेदवार, केपेतील ११ ग्रामपंचायतीमध्ये २४० उमेदवार आणि काणकोणातील ७ ग्रामपंचायतीमध्ये १६९ उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. एकूण ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यात बार्देश तालुक्यात सर्वाधिक १३ उमेदवारांचा समावेश आहे. पेडणे तालुक्यात ४ बिनविरोध, डिचोली तालुक्यात ९ उमेदवार बिनविरोध, सत्तरी तालुक्यात ११, तिसवाडी तालुक्यातून ४ जण बिनविरोध, फोंडा तालुक्यातून १, धारबांदोडा तालुक्यातून १ उमेदवार, सांगे तालुक्यातून २ जण बिनविरोध, सासष्टी तालुक्यातून ११ उमेदवार, केपे तालुक्यात ४, काणकोण तालुक्यातून ३ आणि मुरगाव तालुक्यातून १ उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
निवडणूक रिंगणातील ६२१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यात पेडण्यात ३५, डिचोलीत ६३, सत्तरीत ६३, बार्देशात १३४, तिसवाडीत ५६, फोंड्यात ५८, धारबांदोड्यात १९, सांगेत ३३, सासष्टीत ६४, मुरगावात २८, केपेत ३९ आणि काणकोणात २९ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.

मद्यालये बंदीचा आदेश

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ९ ऑगस्ट, १० ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील सर्व मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काल जारी करण्यात आला आहे.
पंचायत निवडणुकीसाठी मतदान १० ऑगस्टला घेण्यात येणार आहे. तर, १२ ऑगस्टला मतमोजणी करण्यात येणार आहे. बार ऍण्ड रेस्टॉरंटचा परवाना असलेले दुकान चालक केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवून शकतात. जेवणाची सुविधा उपलब्ध करू शकतात. त्यांनी मद्यविक्री बंद असल्याचा फलक लावला पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.

‘त्या’ रेस्टॉरंटवर कारवाईचे
पंचायत संचालकाचे आदेश

पंचायत संचालकांनी काल बार्देशच्या केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीच्या सीली सोल्स कॅफे ऍण्ड बारवर पंचायतराज कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली आहे.
ऍड्. आयरीश रॉड्रिग्ज यांनी माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्या रेस्ट्रॉरंटला बांधकाम परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीच्या आधारे ऍड. रॉड्रिग्ज यांनी आसगाव येथील या रेस्ट्रॉरंटविरुद्ध पंचायत संचालयाकडे एक तक्रार नोंदवून या बेकायदा रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर काल पंचायत संचालकांनी बार्देशच्या गटविकास अधिकार्‍यांना एका आदेशाद्वारे सीली सोल्स कॅफे ऍण्ड बारवर आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली.