>> मुख्यमंत्री, पंचायत मंत्र्यांची आज अधिकार्यांसोबत महत्त्वाची बैठक
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. १६ मे रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि अधिकार्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील पंचायत निवडणुकीचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यातील १८६ ग्रामपंचायतीची मुदत येत्या १९ जून रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. तथापि, ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग राखीवतेच्या प्रश्नावरून निवडणूक वेळेत होण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राखीवतेबाबत निर्देश दिलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग फेररचना पूर्ण केली; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयामुळे प्रभाग राखीवता जाहीर करण्यास विलंब होत आहे. राज्य सरकारने प्रभाग राखीवतेबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. पंचायत प्रभाग राखीवता योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आणखी कालावधीची गरज आहे. त्यामुळे पंचायत निवडणूक पाच-सहा महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चार पंचायतींच्या प्रभागांमध्ये वाढ
पंचायतींच्या प्रभाग फेररचनेमध्ये सहा नवीन पंचायत प्रभागांची निर्मिती झाली आहे. आता, १८६ पंचायतींच्या प्रभागाची संख्या १५२८ झाली आहे. राज्यातील चार पंचायतींच्या प्रभागांची संख्येत वाढ झाली आहे, तर एका पंचायतीच्या प्रभागांत घट झाली आहे. रुमडामळ दवर्ली पंचायतीच्या प्रभागांची संख्या ७ वरून ९ झाली आहे. शेल्डे पंचायतीच्या प्रभागांची संख्या ९ वरून ११, बार्शे-केपे पंचायतीच्या प्रभागांची संख्या ७ वरून ९ आणि श्रीस्थळ पंचायतीच्या प्रभागांची संख्या ७ वरून ९ झाली आहे. सुर्ला पंचायतीच्या ९ प्रभागांची संख्या आता ७ वर आली आहे.