पंचसूत्री राबवा; कोरोना संसर्ग रोखा

0
18

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना पत्र

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवले असून, या पत्रातून राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पाच कलमी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितले आहे.

आगामी काळात आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहेत. या सणांसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रमांतर्गत कोरोनाविरुद्ध लढणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.

काय आहे पाच कलमी कार्यक्रम?
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पाच कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यांनी कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, उपचार, संसर्ग टाळणे आणि लसीकरण या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.