- – शंभू भाऊ बांदेकर
‘‘अहो, मी बसमध्ये डारडूर झोपलो होतो. लोकांची आरडाओरड ऐकून जागा झालो. आणि पाहतो तर काय… बसचा मागचा दरवाजा तुटून मी बसच्या बाहेर आडवा झालो होतो. पण मला खरचटलेसुद्धा नाही. जमिनीवरच्या मातीत मी पडलो होतो.’’
एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर मी पुढे शिकावे असे माझ्या दादाचे म्हणणे होते. तसे पाहता शिक्षणासाठी पूर्वनियोजन करणे मध्यमवर्गीय पालकांना त्यावेळी माहीत नव्हते, मग विद्यार्थ्यांना ती समज कशी असणार? आम्ही मॅट्रिकमध्ये असताना कोण काय होणार, यावर चर्चा रंगत असे. मी तर डॉक्टर होणार असे छातीठोकपणे सांगत होतो. पण त्यासाठी सायन्स या विषयात पारंगत असावे लागते हेसुद्धा मला माहीत नव्हते. मी सर्व भाषा विषयांत उत्तम, गणितात चांगला, तर विज्ञानात मध्यम दर्जाचा होतो. मग पूर्ण विचारांती आपण मराठीचे प्राध्यापक व्हायचे असे ठरवून टाकले.
दादा पुढील शिक्षणासाठी आग्रह करीत होता. मा. यशवंतराव चौगुलेही पुढे शिकत असशील तर बघ, मी मदत करीन असे म्हणत होते. पण घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. कमवता फक्त दादाच होता. खाणारी तोंडे वाढली होती. शिवाय दोन बहिणींची लग्ने व्हायची होती. मी मग दादाला गळ घालून नोकरी करायचे ठरवले. मी पहिल्यांदा मा. यशवंतराव चौगुलेंना भेटलो. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे तुला केव्हाही नोकरी मिळेल. तू निर्धास्त रहा. पण त्याआधी तू स्वतः धडपड कर. नंतर पाहू!’’ त्यावेळी मी वास्कोच्या मराठी वाङ्मय मंडळाचा वसूलदार म्हणून कार्यरत होतो. भलीमोठी यादी घेऊन दरमहा मराठी माणसांकडून वर्गणी घेऊन, माझ्या सहीची पावती त्यांच्याकडे देत असे. त्यावेळी साळगावकर उद्योगसमूहामध्ये बी. बी. कर्णिक नावाचे चिफ अकौंटंट होते. फार प्रेमळ व्यक्ती होती ती. प्रत्येक मराठी कार्यक्रमास सपत्नीक येत असे. एकदा मी पावती फाडताना मला त्यांनी विचारलं, ‘‘एस.एस.सी. झालास, पुढे काय?’’ मी म्हटले, ‘‘साहेब, नोकरीच्या शोधात आहे.’’ ‘‘असं का, मग मी बघतो. पण एक अट आहे. नोकरी करता करता शिकायचे!’’ मी आनंदाने मान डोलावली. त्यावेळी साळगावकर उद्योगसमूहामध्ये श्री. फर्रांव नावाचे करारी लेबर ऑफिसर होते. कर्णिक साहेबांनी त्यांना फोन करून मला उद्या पाठवतो म्हणून सांगितले. मुलाखतीच्या वेळी श्री. फेर्रांव यांनी काही जुजबी प्रश्न विचारले. म्हणाले, ‘‘तू हुशार आहेस, आणि कर्णिक साहेबांकडून आला आहेस. तुझे काम झाले. केव्हा कामावर रूजू होतोस?’’ मी मनात विचार केला. शुभस्य शीघ्रम! म्हणालो, ‘‘उद्याच!’’ ‘ठीक आहे’ म्हणाले. आणि मी साळगावकर कंपनीच्या अकौंट्स डिपार्टमेंटमध्ये रुजू झालो. ही माझी आयुष्यातील पहिली नोकरी.
मी माझा पहिला पगार दादाच्या हातावर ठेवला. दादा म्हणाला, ‘‘ही तुझी कमाई आहे. तुझ्याकडेच ठेव.’’ पण दादाचा लग्नानंतरचा वाढता संसार लक्षात घेऊन मग मीच घरात काय हवे-नको ते वहिनीला विचारून घेऊन येऊ लागलो. आम्ही वास्कोला ज्या नॉन मॉन या खारवीवाड्यावर राहत होतो तेथे तुलनेने ख्रिश्चन वस्ती जास्त होती व मी हिंदीमध्ये फार हुशार आहे असा त्यांचा समज होता. काही हिंदी भाषेत कच्च्या असलेल्या ख्रिश्चन विद्यार्थिनींच्या हे कानावर गेले होते. त्याचा मला फायदा होऊन मी हिंदी विषयाचे ट्यूशन देऊन वरकमाई करायला लागलो. नोकरी, ट्यूशन्स वगैरे चालू असताना मी पुढे शिकायचे विसरलो नव्हतो. मी शिवाजी विद्यापीठाचा बहिःस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन अभ्यासाला लागलो. कर्णिक साहेब मला घरी बोलावून कठीण विषयांच्या अभ्यासात मार्गदर्शन करीत. आणखी एक फायदा झाला तो म्हणजे, माझ्याच ऑफिसात वरच्या पोस्टवर असलेले श्री. विष्णू राजाराम गावकर (ज्यांचा आमच्या समाजोन्नती संघटनेने पंधरा वर्षांपूर्वी ‘दलितमित्र’ म्हणून सन्मान केला) हेही बहिःस्थ विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठात दाखल झाले होते. त्यांचेही सहकार्य मला लाभले. आम्ही दोघेही सावंतवाडी केंद्रात परीक्षेनिमित्त जात असू.
या गावकर महाराजांचा एक गमतीदार किस्सा सांगण्यासारखा आहे. त्यांनी शेवटचा पेपर देऊन गोव्याची वाट धरली. माझे अजून दोन पेपर होते म्हणून मी मागे राहिलो. मी त्यांना पोचवायला सावंतवाडी बसस्टॉपवर गेलो. तेथे कदंब बस पकडून ते गोव्याकडे निघाले व मी खोलीवर आलो. दुसर्या दिवशी त्या कदंबला इन्सुली-शेर्ले भागात अपघात होऊन काहीजण जखमी झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले. मला गावकरांची चिंता लागून राहिली. गोव्यात पोचल्या पोचल्या आधी मी त्यांना गाठले व अपघाताबाबत विचारले. तेव्हा ते हसत म्हणाले, ‘‘अहो, मी बसमध्ये डारडूर झोपलो होतो. लोकांची आरडाओरड ऐकून जागा झालो. आणि पाहतो तर काय… बसचा मागचा दरवाजा तुटून मी बसच्या बाहेर आडवा झालो होतो. पण मला खरचटलेसुद्धा नाही. जमिनीवरच्या मातीत मी पडलो होतो.’’
मी इतिहास विषय घेऊन शिवाजी विद्यापीठातून बी.एड्. उत्तीर्ण झालो. शेवटची दोन वर्षे परीक्षेला कोल्हापूरला जावे लागले. तेथे विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख काणकोणचे सुपुत्र प्रा. स. शं. देसाई यांची ओळख झाली व नंतर मराठी चळवळीत ती अनेकांशी वाढत गेली.
त्याकाळी वास्कोच्या बायणा येथील अंजुमन हायस्कूलमध्ये शेख मुल्ला नावाचे अत्यंत मनमिळावू शिक्षक रा. भा. सभा- पुण्याच्या प्रबोध, प्रवीण, पंडित परीक्षांचे वर्ग घेत असत. मडगावचे माननीय माधव पंडित गोवाप्रमुख होते. मुल्लांच्या मार्गदर्शनाखाली मी ‘पंडित’ झालो. विशेष म्हणजे त्या साली ‘पंडित’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये पहिल्या श्रेणीत फक्त मी एकटा होतो. मग माझी मित्रमंडळी कौतुकाने आणि थट्टेने मला ‘शंभू पंडित’ म्हणू लागली.