नेत्यांच्या तसबिरीविषयक वादग्रस्त परिपत्रक मागे

0
34

सरकारी कार्यालयांमध्ये कुठल्या राजकीय व राष्ट्रीय नेत्यांच्या तसबिरींचा अधिकृत वापर करावा, या संदर्भात ४ दिवसांपूर्वी जारी केलेले वादग्रस्त परिपत्रक काल राज्य सरकारने मागे घेतले.

सरकारी खाती, महामंडळे व स्वायत्ता संस्थांच्या कार्यालयांत महात्मा गांधी यांच्या तसबिरीसह सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या तसबिरींचा अधिकृत वापर करावा, असे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले होते; मात्र या परिपत्रकात भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे दिसून आल्यानंतर सर्व स्तरांतून राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू झाली होती. त्यामुळे काल सरकारने ते वादग्रस्त परिपत्रक मागे घेतले.