नॅशनल थिएटरच्या मालमत्तेवरून पणजी मनपा बैठकीत खडाजंगी

0
37

पणजी महापालिकेच्या काल झालेल्या बैठकीत पणजी शहरातील मध्यभागी असलेल्या नॅशनल थिएटरच्या मालमत्तेच्या प्रश्‍नावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात मोठी खडाजंगी झाली. त्यावेळी महापिलेकेचे दोघे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर व सुरेंद्र फुर्तादो यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह वरील प्रश्‍नावरून सभात्याग केला. त्यांच्याबरोबर सभात्याग केलेल्या अन्य नगरसेवकांमध्ये रूथ फुर्तादो व जुवेल आंद्राद यांचा समावेश होता.

ज्याठिकाणी नॅशनल थिएटरची इमारती उभी आहे, ती जमीन पणजी महापालिकेची असून ज्या राव यांना ही जमीन लीजवर दिलेली आहे त्यांचा करार संपलेला आहे. महापौर रोहित मोन्सेरात हे त्यांच्याशी समझोता करून त्यांना मालमत्तेचा काही भाग देऊ पाहत असल्याचा व करोडो रुपये किंमतीची महापालिकेची ही जमीन एका बिल्डरला विकू पाहत असल्याचा आरोप सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर, रुथ फुर्तादो व जुवेल आंद्राद यांनी यावेळी केला. यावेळी विरोधकांनी हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप केल्यामुळे शाब्दिक चकमकी झाल्या. शेवटी विरोधकांनी सत्ताधारी मंडळाचा निषेध करीत सभात्याग केला.