नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार

0
8

>> ऐनवेळी परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारीच म्हणजे 11 ऑगस्टला घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हल्ली लोक केवळ परीक्षा स्थगित करण्याची मागणी करतात; परंतु 5 याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही 2 लाख उमेदवारांच्या भविष्याशी खेळू शकत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी आम्ही ही परीक्षा स्थगित करून त्यांच्यासमोर नव्या अडचणी निर्माण करू इच्छित नाही. तसे केल्यास त्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ही परीक्षा नियोजित वेळेत घेतली जावी, असे न्यायालयाने नमूद केले.

11 ऑगस्ट रोजी 170 शहरांमधील 416 परीक्षा केंद्रांवर नीट पीजी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. यावर्षी 2,28,542 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. दरम्यान, यापूर्वी नीट पीजी परीक्षा 23 जून रोजी घेतली जाणार होती. यूजीसी नेट व नीट यूजी परीक्षेतील अनियमिततेमुळे नीट पीजी परीक्षा स्थगित केली होती. त्यानंतर ही परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेतली जाईल असे जाहीर करण्यात आले होते.