निर्भय हो मना रे …

0
143
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

आकाश- धरित्री आहे. फुलाफळांनी निसर्ग बहरला आहे. कुहू कुहू कोकीळ साद देत आहे. पण त्यात कुठेतरी स्मशान शांतता दडल्याचे जाणवते. कदाचित् वादळापूर्वीची तर नसेल ना? माणसे माणसांना पारखी होत आहेत. एकमेकांना भेटणे नाही. संवाद नाही. या कोरोना महामारीमुळे मनात जीवन-मरणाचे भय निर्माण होऊन जगण्याचा आत्मविश्‍वास हरवत तर नाही ना?

संध्याकाळचे साडेपाच वाजले; उन्हें कलून सूर्यास्ताचा समय येत होता. बाहेर ‘कोरोना’ घरात ‘कोरोना’ अशी माझी स्थिती. आमच्या संकुलातील बागेत घटकाभर बसावे या विचाराने बागेत आले. कुंड्यांमधील सुंदर फुलांचे ताटवे या प्रहरीही उदास दिसले. छोटासा पण छान बगीचा बागडणार्‍या मुलांची वाट पाहता पाहता निराश झालेला दिसला. समोरचा आम्रवृक्ष शांत तटस्थ उभा होता. पानांची सळसळ नाही. कैर्‍यांनी लगडलेला. कैर्‍या पाडायला मुलांचा शिरकाव नाही ना!
बागेत एकही मूल नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या खेळण्याने बागेला जिवंतपणा यायचा. आता मुलं तर बिचारी विसरलीच असतील बागेतील मुक्त निसर्गातील मजा. सदाबहार बाग मुलांविना सुनी सुनी वाटली.
लॉकडाऊनपूर्वी काही तरुण मुले इथे बॅडमिंटन कोर्टवर खेळत होती तर काही शाळकरी मुलं पारंपरिक खेळ खेळताना दिसायची. नेहमी मुलांच्या किलबिलाटात पक्ष्यांच्या चिवचिवाटात बागेचा परिसर खुलून दिसायचा.

आजपावेतो दोन महिने झाले बागेवर शोककळा पसरली आहे. फुलांवर फुलपाखरे उडताना दिसत होती पण बागडत नव्हती. संकुलातील ही मुलास्त्रियांनी गजबजणारी बाग भकास वाटू लागली. उदास जाणवू लागली. घराबाहेर मी आले खरी, पण एक प्रकारची अनामिक भीती ग्रासून राहिली.
संवाद साधणार्‍या स्त्रिया नव्हत्या. चेहर्‍यावर मास्क बांधून वयस्कर जोशी सर उसने अवसान आणून दबकत फेरफटका मारत होते. नेहमी परिवाराची वर्दळ असलेल्या या बागेची रयाच गेलेली जाणवत होती.

बागेत फुलं आहेत. फुलपाखरं आहेत. पण त्यांच्याबरोबर खेळणारी आपली मुलं कुठे? आपात्कालीन परिस्थितीत चार भिंतींआड त्यांना बंदिस्त तर केली नाहीत ना? काय करत असतील बिच्चारी! खिडकीतून डोकावून पाहत असतील का? सुट्टीतील मुलांच्या आनंदावर लॉकडाऊनने विरजणच टाकलं. या बागेत ती सुट्टीत मनमुराद आनंद लुटत होती. त्यांच्या मनाची कुचंबणा तर होत नसेल ना? मनात नाना प्रश्‍न उभारी घेत होते. सगळाच परिसर भकास, उदास दिसत होता. माणसाविना ओकाबोका.
काही क्षणापूर्वी फुलं हालत डोलत वाकुल्या दाखवत होती. एकही मूल न भेटल्याने जणु हिरमुसली होऊन आता अगदी चिडीचूप झाली. बाजूला कुत्रं मुलांबरोबर खेळायचं ते गप्प बसून होतं. काय ही विषण्ण स्थिती! खिन्न बाग, सुन्न सगळा परिसर.
एरवी बागेतील संध्याकाळ प्रसन्न वाटत होती. आज जणू डसायला लागली. एक प्रकारच्या अनामिक भीतिचं सावट पसरलेलं पुन्हा जाणवत होतं. बाग न्याहाळताना काहीतरी विपरीत घडल्याची ती साक्ष देत होती. विरंगुळा म्हणून बागेत आले होते. पण कुठे काय? मी एकटीच… हितगुज नाही. राहवलं नाही जास्त वेळ. आता परत फिरायचं मनानं घेतलं.

मनावरची मरगळ झटकून टाकावी या विचाराने आले होते. परंतु झालं भलतंच. बाग साफसुथरी, शांत नि स्तब्ध. काय करायची अशी खायला उठणारी भयाण शांतता? आज माणसाला जीवनाचं महत्त्व खर्‍या अर्थाने कळते आहे. कधी, केव्हा, काय होईल हे कल्पनेपलीकडचे झाले आहे.

जीवन हे पुलावातील खड्याप्रमाणे झाले आहे. एका नावाजलेल्या रेस्टॉरेंटमध्ये पुलावाचा सुगंध पसरला आहे. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. सगळ्यांनाच पुलाव खाण्याची घाई. जवळजवळ तीस-पस्तीस लोकांना रेस्टॉरंटमधील वेटरने पुलाव वाढला. प्रत्येकाने पहिला घास हातात घेतला आणि तोंडात घालणार त्या क्षणी…. शेफने येऊन सांगितले यात गारेचा खडा पडलाय, तो तांदळासारखाच पांढरा असल्याने मला सापडला नाही. काळजी घ्या. कुणाच्या दाढेखाली आला तर इजा होऊ शकते. आता सगळ्यांच्या जेवणातली मजा गेली. प्रत्येक घासागणिक चवीकडे लक्ष न जाता घास खड्याच्या भीतिने खाल्ला जाऊ लागला.
पुलावाचा स्वाद चांगला आहे. चव उत्तम आहे. तरीपण खाण्याची गंमत निघून गेली. पुलाव चवीष्ट आहे. पण एखादा बारीकसा खडासुद्धा आयुष्याची चव घालवतो, हे कळले.
सध्या कोरोनामुळे आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कुणाला हा खडा येईल, हे सांगता येत नाही. ‘जीवनातील सहजता’ गेलीय.

जीवनात एक एक नवा दिवस पाहण्यास मिळणे महत्‌भाग्याचे झाले आहे. आकाश- धरित्री आहे. फुलाफळांनी निसर्ग बहरला आहे. कुहू कुहू कोकीळ साद देत आहे. पण त्यात कुठेतरी स्मशान शांतता दडल्याचे जाणवते. कदाचित वादळापूर्वीची तर नसेल ना? पक्षी, पाखरे निसर्गाची शोभा वृद्धिंगत करतात. त्यांच्या अस्तित्वातही भीषण पोकळी जाणवते. माणसे माणसांना पारखी होत आहेत. एकमेकांना भेटणे नाही. संवाद नाही. ‘कोरोना’ संशयाच्या भूताने पछाडल्यासारखी. सामाजिक अंतराचे रुपांतर मनामनातील दुरीत होऊ पाहात आहे.

या रिकामटेकड्या वेळात एखादी कला जोपासावी हा विचार येतो खरा; परंतु कलेत चित्त गुंतता भयाण सावटाचे विचार पुसट होत नाहीत. अदृश्य, अद्भुत विषाणूच्या दंशाचा विचार लुप्त होत नाही. ‘हेही दिवस जातील. उद्या आशेचा किरण दिसेल’, अशी मनाची समजूत घालून संयम साधू पाहते. मनाचं चाक रुळावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत असते. पण मन ते चंचल- विचारांच्या या प्रवाहात नियोजित संकल्प वार्‍यावर उडून जातात. कधी वाटतं असंख्य विचारांच्या या काहूरात विश्‍वासाला तडा जाईल.
या कोरोना महामारीमुळे मनात जीवन-मरणाचे भय निर्माण होऊन जगण्याचा आत्मविश्‍वास हरवत तर नाही ना? ईश्‍वरावर श्रद्धायुक्त विश्‍वास असला म्हणजे त्याची फारशी झळ लागत नाही. व्हायरसपासून बचाव सोपा आहे, परंतु व्हायरसची मनातील भीति अशांतीला कारणीभूत ठरते.

.