निरोगी विश्‍वनिर्माण हेच ध्येय

0
203
  • डॉ. सीताकांत घाणेकर

‘‘फक्त व्याधिमुक्त होणे म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक- मानसिक- सामाजिक- आध्यात्मिक स्तरांवर संपूर्णपणे स्वस्थ असणे म्हणजे आरोग्य.’’
आपण योगसाधनेचे ध्येय जर आचरणात आणले तर जागतिक आरोग्यदिनाचे ध्येय सहज साध्य होईल.

७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्यसंस्थेचा स्थापना दिन असून अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. दर वर्षी एक नवे घोषवाक्य समोर ठेवून सर्वजण सुंदर कार्य करतात. या वर्षीचे घोषवाक्य आहे – * सुरेख व निरोगी विश्‍वनिर्माण.
खरेच, हे घोषवाक्य अत्यंत विलोभनीय व हृदयगम्य असेच आहे. आज विश्‍वात जी विचित्र व भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावेळी या घोषणेचे महत्त्व कळते.
आज संपूर्ण जगात हरएक क्षेत्रात विविध प्रकारच्या समस्या आहेत. सगळीकडे अनारोग्यच आहे म्हणा ना! ही क्षेत्रे आहेत – आर्थिक; शैक्षणिक; सामाजिक; वैद्यकीय; नोकरी-व्यवसाय; वातावरण; लिंगभेद; भांडण-तंटे-लढाया; आतंकवाद आणि हे सर्व कमी आहेत म्हणूनच आताचे हे नवीन संकट सार्‍या विश्‍वासमोर उभे ठाकले आहे ते म्हणजे कोविड विषाणूचे आक्रमण. या विषाणूने कुणालाही, कुठेही सोडले नाही- ना राष्ट्र, ना लिंग, ना गरीब ना श्रीमंत, ना अशिक्षित ना सुशिक्षित… आश्‍चर्य म्हणजे मानव सोडून इतर जीव, जंतू, पशु, पक्षी यांतील कुणालाही कोविडने स्पर्श केलेला नाही.

या गोष्टीवर चिंतन केले तर एक मुद्दा लक्षात येतो तो हा की कोविड मानवाला त्याच्या महाभयंकर चुकांची, पापांची शिक्षा द्यायला तर आला नाही ना! कुठलेही अस्त्रशस्त्र नाही, रसायन नाही… आणि परिणाम? कोविडचा रोग आणि मृत्यू.
कोविड मानवजातीला धडा शिकवतो आहेच, शहाणपणाची जाणीव करून देतो आहेच. फक्त आपण आपला अहंकार व गर्व बाजूला ठेवून एकत्र येऊन समस्येशी झुंजायला हवे. काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत…

  • हवा, पाणी इ.चे प्रदूषण कमी झाले
  • निसर्ग स्वच्छ झाला. असे सांगतात की हिमालय दर्शन दुरूनदेखील होते आहे कारण हवेचे प्रदूषण कमी झाले.
  • शाळा – कार्यालये बंद झालीत. शिक्षण आणि कार्यालयीन काम घरूनच करावे लागले. त्यामुळे कुटुंबातील सदस्य घरीच राहू लागले. एकमेकांच्या जास्त संपर्कात राहायला लागले. अन्यथा सदैव कामानिमित्त बाहेरच राहात असत.
  • हॉटेलचे जेवणखाण बंद झाले. घरचे चांगले भोजन मिळाले.
  • आपण इंद्रियांचे गुलाम बनलो होतो. इंद्रियसुखातच रमलो होतो. त्यामुळे मधुमेहासारखे रोग बळावले होते. त्यांच्यावर नियंत्रण आले.
  • अनेकांनी योगसाधना करायला सुरुवात केली. त्यामुळे आरोग्य चांगले राहिले. ध्यान-धारणेमुळे मनःशांती मिळतेय. इंद्रियसुखापेक्षा आत्मसुख किती श्रेष्ठ आहे याचा अनुभव मिळाला.
    आता याबरोबरच काही वाईट गोष्टीही घडल्या पण आपला दृष्टिकोन सकारात्मक असल्यामुळे आपण तसा विचार करतो. याचा अर्थ नकारात्मक गोष्टी लक्षात घ्यायच्या नाहीत असे नाही. तर त्यांवरही उपाय शोधायला हवेत.
    कोविडच्या संदर्भातील एक सकारात्मक गोष्ट म्हणजे…
  • वैज्ञानिकांनी संशोधन सुरू करून विविध व्हॅक्सीन्स (लस) विश्‍वाला दिले. भारत देश या क्षेत्रात अग्रेसर आहे.
  • वैद्यकीय आणि इतर सेवाक्षेत्रातील व्यक्ती ‘कोरोना वॉरीयर्स’ झालेत- स्वतःच्या जिवावरील धोका पत्करून!
    पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण बहुतेक वेळा समस्यांना फक्त ठिगळं लावण्याचे कार्य करतो. त्यामुळे तात्पुरता विजय मिळतो, नंतर परत ‘ये रे माझ्या मागल्या..’!
    विश्‍वाच्या इतिहासात प्रथमच निसर्गाने, सृष्टिकर्त्याने, भगवंताने मानवाला एक चांगला धडा शिकवायचा प्रयत्न केला आहे. त्यापासून बोध घेऊन आपण चिरस्थायी उपाय शोधायचा प्रयत्न करायला हवा.

योगसाधकाला माहीत आहे की एक अत्यंत प्रभावी व चिरकाल टिकणारा उत्तम उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध योगसाधना. हे समजण्यासाठी ‘आरोग्य’ या शब्दाची व्याख्या समजून घ्यायला हवी जी जागतिक आरोग्य संस्थेनेच दिली आहे –
‘‘फक्त व्याधिमुक्त होणे म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक- मानसिक- सामाजिक- आध्यात्मिक स्तरांवर संपूर्णपणे स्वस्थ असणे म्हणजे आरोग्य.’’
आज जगाकडे चौफेर नजर फिरवली तर या प्रत्येक पैलूत अनारोग्यच भरभरून दिसते. योगसाधनेमध्ये हे सर्व पैलू आहेतच. पण त्याशिवाय इतर मुख्य पैलूदेखील आहेत. योगसाधनेमुळे मिळणारे लाभ – शारीरिक- मानसिक- भावनिक- बौद्धिक- आध्यात्मिक- सामाजिक.

याचे कारण म्हणजे योगतत्त्वज्ञान हे पंचकोशांवर आधारित आहे.
१. शरीर – शारीरिक
२. मन – मानसिक, भावनिक (भक्तिमय, मनोमय)
३. बुद्धी – बौद्धिक (विज्ञानमय)
४. आत्मा – आध्यात्मिक (आनंदमय)
५. प्राण – प्राणमय कोश
योगसाधनेचे जे चार मुख्य मार्ग आहेत- ज्ञान, भक्ती, कर्म, अष्टांगयोग.
त्यामधून मानवाच्या सर्व पैलूंचे नैसर्गिकरीत्या पालन होते.
तसेच भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण निसर्गाशी कृतज्ञ राहावे अशी शिकवण आहे. म्हणून आम्ही पंचमहाभूतांना ईश्‍वर मानतो- पृथ्वी, जल, वायु, अग्नी, आकाश. त्याचा उपयोग करून घेतला. पण आजच्या उद्धट मानवाने केला तसा त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्याशी स्पर्धा केली नाही.
जागतिक आरोग्य संस्थेची विविध ध्येयवाक्ये आहेत. अनेक वर्षांपूर्वी …

  • ‘‘वर्ष २००० पर्यंत सर्वांना स्वास्थ्य’’. पण ते साध्य होण्याची आशा दिसेना.
  • ‘‘वर्ष २००० पर्यंत सर्वांना स्वास्थ्य व सर्व स्वास्थ्यासाठी’’.(हेल्थ फॉर ऑल अँड ऑल फॉर हेल्थ)
    म्हणजे प्रत्येकाला या ध्येयापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे अभिप्रेत आहे. आता २१ जून जवळ आहे – आंतरराष्ट्रीय योग दिन. जो सर्व विश्‍वात साजरा केला जातो. त्यावेळी एकत्रित राष्ट्रसंघाचे घोषवाक्य आहे – सद्भाव व शांतीसाठी योग!
    सारांश – आपण योगसाधनेचे ध्येय जर आचरणात आणले तर जागतिक आरोग्यदिनाचे ध्येय सहज साध्य होईल. भारतीयांनी आज आपल्या संस्कारांचे सुंदर व उच्च दर्शन विश्‍वाला घडवलेलेच आहे – ‘‘वसुधैव कुटुंबकम्’’.
    म्हणूनच अनेक देशांना आपण बनवलेले प्रभावी व्हॅक्सीन उपलब्ध करून दिले. अनेक देशांना दानही केले. किती स्तुत्य विचार व कर्म आहे हे. भारतीयांना अभिमान वाटण्यासारखीच कृती आहे ही!
    आपल्या प्रार्थनांचेसुद्धा यावेळी स्मरण करुया….
  • सर्वे भवन्तु सुखिनः| सर्वे सन्तु निरामयाः॥
    सर्वे भद्राणि पश्यन्तु | मा कश्‍चिद्दुःखभाग्भवेत् ॥
  • सर्व लोक सुखी व निरामय (व्याधिमुक्त, रोगमुक्त) व्हावेत. सर्वांचे कल्याण व्हावे. कोणीही दुःखी असू नये.
    अशा प्रार्थनांचा अर्थ समजून त्यानुसार आचरण आवश्यक असते. फक्त सदिच्छेला यश येत नाही. त्यासाठी आपल्या ऋषींनी आणखी एक प्रार्थना सांगितली आहे-
  • ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु, सहवीर्यं करवावहे
    तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै..
    ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
  • हे प्रभो आम्हा दोघांचे (गुरू आणि शिष्य) रक्षण कर. आम्हा दोघांचे पालन कर. आम्ही दोघांनी सोबत राहून सर्व प्रकारची शक्ती प्राप्त करावी. आम्ही केलेले अध्ययन दैवी व तेजस्वी होवो. आम्ही दोघांनी परस्परांचा द्वेष करू नये.