निराधार महिलांचा आधार ‘महिलाश्रम’

0
3958

अनुराधा गानू  (आल्त सांताक्रूझ-बांबोळी)

 

गेली २५ वर्षे समाजातील दुर्बल, निराधार, समस्याग्रस्त घटकांसाठी ‘गोमंतक लोकसेवा ट्रस्ट’ काम करत आहे. १३ वर्षे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी बालवाडी चालवत आहेत. १० वर्षांपासून निराधार महिलांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत परित्यक्ता, घटस्फोटिता, विधवा, समस्याग्रस्त-निराधार महिला, कुमारी माता अशा जवळ जवळ २१५ महिलांना आधार देण्यात आला आहे. 

२००७ साली मातृछायेच्या रुग्णाश्रयाचं काम सुरू झालं होतं. श्री. कोरगावकर सर अध्यक्ष व मी सेक्रेटरी म्हणून काम बघत होतो. २००८ सालची गोष्ट असेल. एक दिवशी सरांनी म्हटलं, ‘‘ताई, एक काम होतं. २६ जानेवारीला गोमंतक लोकसेवा ट्रस्टने आसगाव-हणजूण येथे निराधार, समस्याग्रस्त महिलांसाठी एक आश्रम सुरू केलाय. सध्या तिथे काम बघायला कोणी नाहीयेय. काही महिने किंवा त्यांना कोणी मिळेपर्यंत एक दिवसाआड जाल तुम्ही?’’
मी ‘‘होे’’ म्हटलं खरं, पण… इतक्या लांब, तीन-तीन बस करून जाणं आणि संध्याकाळी परत येणं… हे जमेल का आपल्याला असं वाटत होतं. पण एकदा एखादं काम करायचं आपल्या मनानं ठरवलं, की कोणतंच काम अवघड वाटेनासं होतं. मग एक दिवस मी आणि एक दिवस बस्तोड्याच्या नीलाताई कलंगुटकर अशा दोघी तिथे जाऊ लागलो.
एकदा तिथे जायला लागल्यावर आम्ही तिथल्या महिलांच्या मध्ये मिसळून गेलो खर्‍या. पण माझ्या मनाला मात्र एक प्रश्‍न सतावत राहिला. समाजात स्वतःच्याच आईवर, आजीवर, बायकोवर, बहिणीवर म्हणजे एकंदरच स्त्री-जातीवर… जिला आपल्या संस्कृतीमध्ये आपण देवीसमान मानतो, त्या स्त्रीवर अशी अनाथ व्हायची वेळ का यावी? एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसेल कदाचित, पण बहीण, भाऊ कोणीतरी असतीलच ना! लहानपणी ती आणि तिची भावंड एकमेकांबरोबर खेळली असतील, रुसवे-फुगवे असतील. एकमेकांच्या ताटातला घास एकमेकांना भरवला असेल. एकाला लागलं तर दुसर्‍याच्या डोळ्यांत पाणी आलं असेल. एकमेकावर जिवापाड प्रेम केलं असेल. पण मग शेवटी तिला असं निराधार का व्हावं लागतं? एखाद्या स्त्रीने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, प्रसंगी हाल-अपेष्टा सोसून आपला नवरा, आपलं घर जपलं असेल मग तेच घर सोडायची वेळ तिच्यावर का आली असेल? एखाद्या स्त्रीनं कष्ट करून आपल्या मुलांना वाढवलं असेल, त्यांची दुखणी काढली असतील रात्र-रात्र जागून, मग तिच्या मुलांनी तिच्यावर अशी वेळ का आणावी? तिला असं जिणं का जगावं लागतं आहे… याचा कोणीच विचार करत नाही का? मग शेवटी वाटतं, मनुष्य हे नाव मिळालं म्हणून काय झालं? शेवटी प्राणीच ना! मनुष्य प्राणी असाच तर शब्द रूढ झालाय. का ही प्राण्यांची वृत्ती कुठेतरी जागी होतेय?
पण तरीही समाजात या गोष्टींचा विचार करणारी काही मंडळी असतात. अशीच म्हापशातील काही समविचारी, सेवाभावी वृत्तीची माणसं एकत्र आली. समाजातील दुर्बल, निराधार घटक – विशेषतः महिला, तसेच ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांच्यासाठी काहीतरी सेवा कार्य करण्याचा विचार झाला. शिवाय समाजाची गरज लक्षात घेऊन आरोग्य, शिक्षण, संस्कृती या क्षेत्रातही काम करण्याची गरज लक्षांत आली, आणि या सगळ्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘‘गोेमंतक लोकसेवा ट्रस्ट’’ची स्थापना केली व १९९० मध्ये तिची कायदेशीर नोंदणीही झाली. पण… काय करायचं… कुठून सुरुवात करायची, हे समजत नव्हतं. सुरुवातीच्या काळात एक छोटंसं घरकुल बांधून तिथे शाळेतील मुलांसाठी संस्कार वर्ग आणि महिलांसाठी शिवण प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी शिशुविकास केंद्र सुरू केलं. स्थानिक व परिसरातील परप्रांतियांच्या मुलांसाठी बालवाडी सुरू करण्यात आली. गावातील लोकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आयुर्वेदिक वैद्यकीय केंद्र सुरू करण्यात आलं. ही कार्ये सुरू असताना निराधार, वृद्ध, समस्याग्रस्त महिलांसाठी आश्रम सुरू करण्याचा विचार पक्का झाला. पण जागा आणि पैसा हे दोन मुख्य प्रश्‍न उपस्थित झाले. श्री. अशोक पावसकर व श्री. परशुराम फळगावकर यांनी सलग ४ वर्षे सरकार दरबारी पाठपुरावा केल्यानंतर २००६ मध्ये सध्या आश्रम असलेली तेव्हाची नियोजित जागा अधिकृतरीत्या संस्थेच्या ट्रस्टच्या ताब्यात आली.
२००७ साली श्रीमती नीलाताई धेंपे यांच्या हस्ते भाड्याने मिळालेल्या एका मठात प्रायोगिक स्वरूपात वृद्ध, परित्यक्ता, विधवा, कुमारी माता, निराधार महिलांसाठी आश्रम सुरू करण्यात आला. एका वर्षांत दानदात्यांच्या आधारावर या महिलांसाठी चार सुसज्ज कुटीरे बांधून झाली आणि या महिलाश्रमाचे स्वतःच्या वास्तूत स्थलांतर झाले. उत्तर गोव्याचे खासदार श्री. मा. श्रीपाद नाईक, खाणमालक श्री. नाना बांदेकर, उद्योजक श्री. गोरखनाथ फुलारी यांनी पूर्णपणे आर्थिक सहाय्य केल्यामुळे २००८ ते २०१२ पर्यंत आणखी तीन कुटीरे बांधून झालीत. सध्या आश्रमाकडे ७ निवासी कुटीरे, मोठे प्रार्थनागृह, १सभागृह आहे. शिवाय सर्व सोयींनी युक्त असे प्रशस्त स्वयंपाकघर अर्थात अन्नपूर्णागृह आणि एक शुश्रुषालयसुद्धा आहे. या शुश्रुषालयात एक आयुर्वेदिक वैद्यकीय उपचार केंद्र, फिजिओथेरपी केंद्र, योगकेंद्र शिवाय निसर्गोपचार केंद्राचीही योजना केलेली आहे.
आश्रमात उद्योग प्रशिक्षण केंद्र चालते. गायन-वादनाची आवड व शिकण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी खास संगीत शिक्षक नेमण्यात आला आहे. आश्रमाच्या आवारात सुंदर बाग आहे आणि विशेष म्हणजे आश्रमात एक गाय व तिची दोन वासरेसुद्धा आहेत. यांची देखभाल करण्यासाठी एका जोडप्याची नियुक्ती केलेली आहे. ही बाग बघितल्यावर आणि वासरांचे हंबरणे ऐकल्यावर तिथे गेलेल्या कोणत्याही माणसाचा शीण निश्‍चितच नाहीसा होऊन जाईल. तिथल्या प्रसन्न वातावरणात आपण निराधार आहोत ही भावनाच मुळी गळून पडते.
गेली २५ वर्षे समाजातील दुर्बल, निराधार, समस्याग्रस्त घटकांसाठी गोमंतक लोकसेवा ट्रस्ट काम करत आहे. १३ वर्षे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी बालवाडी चालवत आहेत. १० वर्षांपासून निराधार महिलांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत परित्यक्ता, घटस्फोटिता, विधवा, समस्याग्रस्त-निराधार महिला, कुमारी माता अशा जवळ जवळ २१५ महिलांना आधार देण्यात आला आहे. आश्रमातील कौटुंबिक वातावरण, सुयोग्य समुपदेशन, उद्योग प्रशिक्षण यांच्या आधारे मानसिक परिवर्तन होऊन काही महिला पुन्हा स्वतःच्या कुटुंबात गेल्या. काहींनी स्वतःचा उद्योेग सुरू करून त्या आपल्या पायांवर उभ्या राहिल्या. उद्योग केंद्रातून भगवे ध्वज, लहान मुलांचे कपडे, दुपटी, लोकरीचे विणकाम, रद्दी कागदाच्या पिशव्या, कापसाच्या वाती, पायपुसणी, गोधड्या अशा वस्तू तयार करून मागणीनुसार पुरवल्या जातात. काहींना त्यांच्या कुवतीनुसार नोकर्‍या मिळाल्या आणि त्या स्वावलंबी झाल्या. चार जणींचे विवाह जुळवून देण्यात आले. अशा प्रकारे निराधार महिलांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. पण कोणीही नातेवाईक हयात नसलेल्या महिलांना जीवनाच्या अंतापर्यंत महिलाश्रम हाच आधार आहे.
शिकण्याची बौद्धिक कुवत आणि इच्छा असूनही पालकांची गरिबी, वडील किंवा आईचे निधन, वडिलांची व्यसनं किंवा अन्य काही कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना शिक्षण घेता यावे या उद्देशाने २०१४ साली ‘‘बालिका कल्याण आश्रम’’ सुरू करण्यात आला आहे.
महिलाश्रमात गुढीपाडवा, रामनवमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, नवरात्र, दत्तजयंती, गणेश उत्सव, मकर संक्रांत असे सगळे सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. वर्षातून दोन वेळा त्यांच्या सहलीही काढल्या जातात, जेणे करून त्या महिलांना आपण निराधार आहोत असे वाटू नये!
आश्रयदाते, दानदाते, हितचिंतक आणि निःस्वार्थीपणे स्वतःला झोकून देऊन निरलसपणे काम करणारे कार्यकर्ते या सर्वांनीच या सेवाकार्याचे शिवधनुष्य पेलल्यामुळे आणि या सर्वांच्या आर्थिक मदत आणि सहकार्यामुळेच या संस्थेच्या ईश्‍वरी कार्याची वाटचाल आज २५ वर्षे कोणतीही अडचण न येता अखंडपणे चालू आहे. या सगळ्यांच्या नावांची यादी दिली तर संपता संपणार नाही. तरीपण एका नावाचा उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटतो. या विधायक कार्याला श्री. हरीष जानी यांनी कोमुनीदाद जागेची वार्षिक भाडेपट्टी रु.७५००/- सुरुवातीची सहाही वर्षे दिली आणि २०१३ मध्ये ही जागा विकत घेण्यासाठी म्हणून मोठी रक्कमही उपलब्ध करून दिली. अशी माणसं, असे कार्यकर्ते समाजात फार अभावानेच आढळतात. कदाचित या ईश्‍वरी कार्यासाठीच त्यांचा जन्म असावा. ती माणसे निःस्वार्थी, निरलस असतात म्हणूनच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीत.
आता हे सगळे वाचल्यावर तुमच्याही मनाच्या कोपर्‍यात एखादी संवेदना जागी झाली असेल. तुम्हालाही नक्कीच वाटलं असेल की या पवित्र कार्यात कुठेतरी खारीचा नाहीतर मुंगीचा तरी आपला वाटा असावा. मनापासून तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा वाटा उचलू शकता. मग तुम्ही काय करू शकाल?…
१) महिलाश्रमाच्या दैनंदिन खर्चासाठी, नवीन उपक्रमांसाठी आर्थिक मदत.
२) बालिका कल्याण आश्रमातील एका बालिकेचे पालकत्व स्विकारून किंवा तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
३) महिलाश्रमाला गरजेच्या वस्तूंची भेट.
४) महिलाश्रमाला सदिच्छाभेट देऊन, तिथल्या महिलांमध्ये थोडा वेळ घालवून, त्यांची चौकशी करावी. त्यांच्याशी गप्पा-गोष्टी कराव्या. त्यांनी नवीन काहीतरी शिकवावे. त्यांच्या चेहर्‍यांवर आनंद फुलवावा.
५) त्यांना तुमच्या बरोबर एखाद्या सहलीला घेऊन जावे.
६) तुमचे किंवा तुमच्या मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा करा किंवा कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या त्या दिवशी अन्नदान करावे.
आणि हो, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे- आयकर खात्याच्या ‘‘८०जी’ नियमाखाली या संस्थेला दिलेल्या देणग्यांसाठी आयकर सूट मिळते.
मग… येताय का माझ्याबरोबर आश्रम बघायला?
अशा संस्था ही आता सामाजिक-काळाची गरज आहे असं म्हणताना… ‘‘माझ्या आईला, बहिणीला, पत्नीला, आजीला इथं ठेवलंय, तिचं काही झालं तरी आम्हाला कळवू नका.’’ किंवा माझी आई निराधार आहे असं लिहून देतो’’ म्हणणार्‍यांना आपल्या आई-बहीण-पत्नी यांना निराधार करणार्‍यांना सद्बुद्धी दे, त्यांना सन्मार्गाकडे वळव म्हणजे कोणी निराधार असणारच नाही असं मनाच्या एका कोपर्‍यात वाटतं. हाही दानाचाच एक प्रकार समजा. हेच पसायदान त्या जगनिर्मात्या परमेश्‍वराकडे मागत हा लेख संपवते.
२६ जानेवारी २०१७ रोजी संस्थेचा वर्धापन दिन. त्यानिमित्त या लेखाचे विशेष प्रयोजन. संपर्कासाठी (०८३२)-२९१२०१५ किंवा मो. पावसकर गुरुजी – ९४२३८८२४११.