‘नाटू नाटू’ गाण्यासह भारतातून ऑस्करसाठी तीन नामांकने

0
5

एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची भुरळ अद्यापही कायम आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला आता ऑस्करमध्ये ओरिजनल साँग्स या गटात नामांकन मिळाले आहे. ‘नाटू नाटू च्या बरोबरीने ‘होल्ड माय हॅन्ड’, ‘लिफ्ट मी अप’, ‘अप्लॉझ’ ही गीते देखील शर्यतीत आहेत. याशिवाय डॉक्युमेंट्री फिचर फिल्म विभागात ‘ऑल दॅट ब्रेथस्‌‍’ आणि डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात ‘एलिफंट व्हिस्पर्स’ या भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे.
‘ऑल दॅट ब्रेथस्‌‍’चे दिग्दर्शन शौनक सेन, अमन मान व टेड्डी लैफर यांनी केले आहे, तर ‘एलिफंट व्हिस्पर्स’चे दिग्दर्शन कार्तिकी गोझाल्व्हीस व गुनीत मोंगा यांनी केले आहे.
नाटू नाटू हे गाणे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. आता या गाण्याला ओरिजनल साँग्स या गटात ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्याने चाहत्यांना पुरस्काराची उत्सुकता लागली आहे. राजामौली यांचा आरआरआर चित्रपट 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी 1920 मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाची भूरळ पाहायला मिळाली होती. त्यातील गाण्यांनी सर्वांची मने जिंकली होती. अवतार चित्रपटाचे निर्माते जेम्स कॅमरुन यांनाही हा चित्रपट आवडला होता. जागतिक पातळीवर या चित्रपटाने 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.