- पौर्णिमा केरकर
सर्प सरपटतो ते वेगाचे प्रतीक. त्याची ती सळसळ निसर्ग आणि मानवाच्या नसानसांत भिनलेली आहे. लोकजीवन, निसर्ग आणि त्याला जोडून असलेली श्रद्धा यांचे प्रतीक म्हणजे नाग. सर्प तर सळसळत्या सर्जकतेचे प्रतीक आहे. त्याला ‘नागपंचमी’च्या रूपाने लोकमनाने श्रद्धेने जतन केलेले आहे.
श्रावण महिना आणि नागपंचमीचा सण यांचे अतूट बंध लोकमनात पक्के रुतलेले आहेत. नागपंचमीचा सण संपूर्ण देशात वैविध्यपूर्णतेने साजरा करण्याची परंपरा आहे. मुळात आपले सगळेच सण-उत्सव हे निसर्गाशी नाते असलेले आहेत. नाग, सर्प, साप हा सृष्टीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. तसाच तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. उंदीर जेव्हा शेतीची नासधूस करतात तेव्हा त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम साप करतात, आणि म्हणूनच त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागाची पूजा करण्याची पद्धत रूढ झाली असावी.
लोकसंस्कृतीतील लोकमानसांनी- खासकरून स्त्रियांनी- नागाला आपला भाऊ मानलेले आहे. गोव्यात नागाचे व्रत बहीण करते तेव्हा तिनेही नागाला आपला भाऊ मानलेले असते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहिणी ‘उपास’ करतात. वारुळाची पूजा करतात. दूध-लाह्यांचा प्रसाद चढवतात आणि नागपंचमीच्या दिवशी ‘उपास’ सोडतात.
अशा या नागाची कहाणी लोकमनात प्रचलित आहे ती अशी- आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला पाच मुलगे व पाच सुना होत्या. चातुर्मासात श्रावण महिन्यात चार सुना आपापल्या मुलाबाळांना घेऊन माहेरी गेल्या. पाचव्या सुनेला मात्र माहेर नव्हते. ती काहीशी उदास झाली. मनातल्या मनात म्हणू लागली, ‘माझा नागोबा देव आहे. तो माझा भाऊ, तोच मला न्यायला येईल.’ शेषशायी भगवानाला तिची दया आली. त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले. पाचव्या सुनेला तो माहेरपणाला न्यायला आला. तिच्या सासऱ्याच्या मनात शंका निर्माण झाली की इतकी वर्षं हा ब्राह्मण होता तरी कुठे? तरीही ते गप्प राहिले. सुनेला त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली. वाटेत ब्राह्मणवेश धारण केलेल्या नागाने तिला खरी हकिगत सांगितली. त्याने तिला पाताळात नेले व आपल्या बायको-मुलांना सांगितले, ‘ही माझी बहीण आहे. तिला अजिबात त्रास करायचा नाही.’ एके दिवशी नागिणीला पिल्ले होत होती तेव्हा तिने या सुनेला हातात दिवा धरून राहायला सांगितले. एका बाजूला तिच्या मनात भीतीही दाटून आली होती. तिने थरथरत्या हाताने दिवा धरला. पिल्ले जन्माला आली त्याच वेळेला नेमका तिच्या हातातील दिवा पिल्लांच्या शेपटीवर पडला. शेपट्या भाजून गेल्या. काही दिवसांनी सून आपल्या सासरी यायला निघाली. इकडे ही नागाचे पिल्ले मोठी झाली तेव्हा त्यांना आपल्या शेपटीची लाज वाटू लागली. त्यांनी आपल्या आईला म्हणजे नागिणीला विचारले तेव्हा तिने खरी हकिगत त्यांना सांगितली. या पिलांना त्या सुनेचा प्रचंड राग आला. त्यांच्या मनात त्या सुनेचा सूड घेण्याचे विचार घोळू लागले. ती त्या सुनेच्या घरी गेली. तिथे जाऊन पाहतात तर काय? त्या सुनेने पाटावर भिंतीवर नागाचे चित्र काढले होते. तिथे शेजारीच पूजेचे सगळे साहित्य, प्रसाद ठेवला आणि ती आपल्या भावांची वाट बघू लागली. जेव्हा हे भाऊ तिथे आले तेव्हा त्यांना आपण मनात ठरवलेल्या कृत्याचे खूप वाईट वाटले. सून प्रार्थना करीत होती- ‘माझे लांडोबा-पुंडोबा जिथे असतील तिथे त्यांना सुखात ठेव.’ त्यांच्या शेपट्या जळल्या होत्या म्हणून त्यांना हे नाव तिने लाडाने ठेवले होते. आल्या पावली ही दोन्ही पिल्ले माघारी वळली. पण त्यापूर्वी ज्या पाटावर तिने नागांची चित्रे काढली होती, तिथे त्यांनी तिच्यासाठी नवरत्न हार ठेवला होता.
खरंतर ही एक काल्पनिक कथा, तरीसुद्धा मानव आणि प्राणी यांच्या नात्याचा एक अनोखा संगम येथे जाणवतो. नागाला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. अगदी पार महाभारत कालखंडामध्येसुद्धा डोकावून बघितले तरी महाभारताचे पहिले पर्व- आदिपर्वात- सर्पसत्राच्या माध्यमातून नागांची कथा पुढे सरकत जाते. सर्पसत्र म्हणजेच दीर्घकाळ चालणारा यज्ञ. एका सुडाच्या प्रवासातून सर्पाची आहुती देऊन एकूणच सर्पजात नष्ट व्हावी या हेतूने हा यज्ञ आरंभलेला होता.
कुरुवंशांचा राजा परीक्षित यांचा मृत्यू सर्पदंशाने होतो. तक्षक नावाचा सर्प त्यांचा चावा घेतो. त्यात त्यांचा मृत्यू होतो. परीक्षित राजा जेव्हा रानात गेलेले असतात तेथे त्यांना शमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले दिसतात. ते त्याच अवस्थेत असताना राजा त्यांना विविध प्रश्न विचारतो. ते शांतच राहतात. राजाला राग येतो. तिथे जवळच एक साप मरून पडलेला असतो तो उचलून ते शमिक ऋषींच्या गळ्यात घालतात. ऋषींच्या मुलाला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो रागाने तक्षक सापाला परीक्षित राजाला दंश करण्याचा आदेश देतो. महाभारतात असंख्य कथा एकमेकांत सापाप्रमाणेच वेटोळे घालून बसलेल्या आहेत. नाग सापांनी आमच्या जीवनाला कसं व्यापून टाकलेलं आहे हे कळून चुकते.
जैन तीर्थंकर असू दे किंवा बौद्ध धर्मातसुद्धा वेगवेगळ्या पाषाणांत नागाच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. आपल्या देव-देवतांच्या सान्निध्यात नागांच्या प्रतिमा येतात. काही ठिकाणी नागदेवतेची स्वतंत्र मंदिरे आहेत. आपली पृथ्वी शेषशाही नागावर विराजमान झालेली आहे असे लोक मानतात. नाग पातळात राहतात. त्यांचा वावर जिथे असतो तिथे सोन्या-नाण्यांनी भरलेले खजिनेच्या खजिने असतात. ते त्याचे शासक मानले जातात. हिमाचल प्रदेशात नागांना अनेक ठिकाणी दैवीशासकही मानले गेले आहे. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये विराजमान असलेला, त्याचबरोबर समुद्रमंथनात दोरीरूपाने कार्य करून भगवान शंकराला प्रिय झालेला वासुकी नाग भक्तगणांचा प्रिय ठरला. कर्नाटकाच्या बऱ्याच भागात नागाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. नाग स्वप्नात येणे म्हणजे आपण काहीतरी चूक केलेली आहे, त्याच्यासाठी मग पूजा आरंभली जाते. नागाची मंदिरे, नागाच्या प्रतिमा कोरलेली पाषाणे हमखास आढळतात. आपल्या इथे वारूळ पूजनाची परंपरा आहे. नागा वंश म्हणून स्वतंत्र वंश आपल्या देशात आहे. नागांचे लोकमनात असलेले अढळपद आजही आहे.
अशा या नागाविषयी अनेक लोकसमज आहेत. नाग डाव धरतो आणि मग बरोबर संधी साधून चावा घेतो. डोक्यावर मधोमध चावतो. परंतु या गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या चुकीच्या आहेत. सरपटणारे प्राणी म्हणजे साप असा जेव्हा आपण या प्राण्याचा विचार करतो तेव्हा त्याचे विविध प्रकार आपल्या नजरेसमोर येतात. ते जसे जमिनीवर राहतात तसे पाण्यामध्येही आढळतात. विषारी-बिनविषारी आणि अगदीच निरुपद्रवी असेही साप आपल्याला दिसतात. परंतु बऱ्याच वेळेला समाजमनात सापाविषयी अनाठही भीती असल्याने साप दिसताच क्षणी मारला जातो. त्याचा उपद्रव होता कामा नये म्हणून घराभोवती मंतरलेले तांदूळ शिंपडले जातात. धातूच्या नागाची प्रतिमा करून नागबळी देण्याची परंपरा आहे. पाण्याचे स्रोत ‘नागझर’च्या रूपात लोकमनात आढळपद प्राप्त करून आहेत. अशा या नागाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण सुरू झाला की येणारा हा पहिलाच सण. अळवाच्या पानात मातीपासून तयार केलेली नागाचे मूर्ती ठेवून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला नैवेद म्हणून हळदीच्या पानावर तांदळाच्या पिठापासून केलेल्या पातोळ्या केल्या जातात. या पातोळ्या खमंग आणि तेवढ्याच रुचकर लागतात. पातोळ्यांशी जोडली गेलेली लोककथा ही लोकमनात प्रचलित आहे.
श्रावण म्हटला की सभोवतालचे वातावरण आल्हाददायक असते. देशाच्या विविध भागांत झुले बांधले जातात. झुल्यावरची गाणी म्हणतात. आपल्या लोकमनात ही गाणी ‘आट्यावरची गीते’ म्हणून प्रसिद्ध आहेत. खरंतर नागाची भीती समाजमनाला वेढून आहे. त्यामागे त्याच्यावर असलेली मनःपूर्वक श्रद्धा आहे. स्त्रियांनी त्याला आपला भाऊ मानलेला आहे म्हणून त्याला त्याचे नाव न घेता ‘मामा’ संबोधले जाते. सापांना पाळणारी गावं आपल्या देशात आहेत. तिथे सापांचे अस्तित्व सहजपणे मानले गेले आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. ‘सापही मारायला हवा व काठीही मोडता कामा नये’, ‘सापांना ठेचायलाच हवे’, ‘विषारी साप बाळगलेत आपण’ अशा प्रकारची वक्तव्ये करून त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असे असले तरी लोकपरंपरेने सापांना वंदनीय मानलेले आहे. शंकराच्या पिंडीला वेढा घातलेला, गणपतीच्या पोटाला वेढून राहिलेला, जैन तीर्थंकरांच्या मस्तकावर छत्र धरणारा, बुद्धाचे पावसापासून रक्षण करणारा, एवढेच नाही तर संपूर्ण पृथ्वीचा भार स्वतःच्या डोक्यावर वाहणारा हा नाग शेषशायी अनादी, अनंत आहे. सिंधू संस्कृतीमधल्या एका ताबिजावर एका गरुडाच्या तावडीत सापडलेल्या सर्पाचे प्राचीन चित्र दिसून येते. सर्प सरपटतो ते वेगाचे प्रतीक. त्याची ती सळसळ निसर्ग आणि मानवाच्या नसानसांत भिनलेली आहे. लोकजीवन, निसर्ग आणि त्याला जोडून असलेली श्रद्धा यांचे प्रतीक म्हणजे नाग. सर्प तर सळसळत्या सर्जकतेचे प्रतीक आहे. त्याला लोकमनाने श्रद्धेने जतन केलेले आहे.

