नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय

0
219

>> मुख्यमंत्री ः लॉकडाऊनबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषदेत माहिती

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी लॉकडाऊननंतरच्या वाटचालीबाबत विविध सूचना काल मांडल्या आहेत. मंत्र्यानी लॉकआऊटचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे. तथापि, राज्यातील नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य सरकारच्या लॉकडाऊननंतरच्या पुढील वाटचालीबाबत सूचना प्रथम कळविण्यात येणार आहेत. त्यानंतर १३ एप्रिल रोजी लॉकडाऊननंतरच्या वाटचालीबाबत  राज्य सरकारचा निर्णय जाहीर केला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

राज्यातील नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आरोग्य सर्वेक्षण करणार्‍यांना आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आरोग्य सर्वेक्षण करणारे सरकारी कर्मचारी, शिक्षक यांना योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरोना विषाणू संशयित घरी निगराणीसाठी ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या घराचे सर्वेक्षण केले जाणार नाही.  या घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण विषयाचे कुणीही राजकारण करू नये, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

येत्या ११ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड १९ या विषयावर चर्चा केली जाणार आहे. राज्यातील भाजप आमदार आणि अपक्ष आमदार गोविंद गावडे यांच्या एक वर्षाच्या पगारातील ३० टक्के रक्कम मुख्यमंत्री कोविड निधीत जमा केली जाणार आहे. विरोधी आमदार आपल्या पगारातील रक्कम कोविड निधीसाठी देत असतील तर तिचा स्वीकार केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

काजूला योग्य दरासाठी

प्रयत्न सुरू

राज्यातील काजू बागायतदारांना चांगला दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गोवा बागायतदार, कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून काजू खरेदी करण्यात येणार आहे. काजू बागायतदारांनी थोडासा संयम बाळगावा. राज्यातील शिधापत्रक धारकांना सरकारी योजनेतून तांदूळ, गहू आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शेतीच्या कापणीच्या कामासाठी बाहेरून कामगार आणू नये. राज्यात उपलब्ध असलेल्या कामगारांचा कापणीच्या कामासाठी वापर करावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळातील कामगाराचा पगार कपात प्रकरणाच्या तक्रारीची मजूर आयुक्तांकडून चौकशी केली जाणार आहे. राज्यातील खासगी कंपन्यांनी पगार कपात करू नये. कामगारांनी सुध्दा कंपन्याना योग्य सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दरवाढ करणार्‍यांवर

कारवाई सुरू

बाजारपेठेत मास्कची जास्त दराने करण्यात येत असलेल्या विक्रीची दखल घेण्यात आली असून आतापर्यंत ४-५ विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूची जास्त दराने विक्री करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.