नाईक हल्ला प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे

0
106

सांकवाळ येथील सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास काल संध्याकाळी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित करिया याला काल न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नारायण नाईक यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी रविवारी राम गोपाल यादव उर्फ करिया याला अटक केली होती. नारायण नाईक यांच्यावर हल्ला केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर एका दुचाकीवरून पसार झाले होते. त्या हल्लेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवल्याने त्यांचा पाठलाग करणेही शक्य झाले नव्हते. मात्र पळताना त्यातील एकाचा फोन तेथे पडला होता. तो पोलिसांच्या हाती लागल्याने हल्लेखोरांचे बिंग फुटले. हा मोबाईल फोन बायणातील कब्बू उर्फ कबूतर याचा असल्याचे समोर आले. त्याच्या फोनमध्ये झुआरी नगर येथील राम गोपाल यादव उर्फ करिया सोबत संभाषण झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी आपली तपासाची चक्रे करिया याच्या दिशेने फिरवली. त्यानंतर वेर्णा पोलिसांनी रविवारी सकाळी करिया याला अटक केली होती.