नव्या जिल्हा इस्पितळातील शवागार २४ तासांत खुले करा : विजय

0
121

>> कोरोनाने मृत होणार्‍यांची परवड

कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांच्या कुटुंबियांची परवड थांबवण्यासाठी मडगावच्या नवीन जिल्हा इस्पितळातील शवागार येत्या २४ तासांत सुरू करण्याची व्यवस्था करावी व त्यातील एक तृतीयांश कक्ष कोरोनाने मृत्यू आलेल्यांच्या मृतदेहांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी फातोर्डा मतदारसंघाचे आमदार व गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल केली.

फातोर्डा येथील एका ५१ वर्षीय कोरोना रुग्णाचे मंगळवारी निधन झाले होते. मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात शवचिकित्सा केल्यानंतर तो कोविड रुग्ण असल्याचे आढळून आले होते. पहाटे ३.३० च्या सुमारास त्याचा अहवाल हाती आल्यानंतर हॉस्पिसियोच्या शवागारात जागा नसल्याने त्याचा मृतदेह त्वरित घेऊन जाण्यासाठी त्याच्या मुलावर हॉस्पिसियोच्या कर्मचार्‍यांनी दबाव आणण्याचा प्रकार घडल्याचे सांगून सरदेसाई यांनी त्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला.