नवीन मनोर्‍यांना मान्यता देणार : मुख्यमंत्री

0
180

राज्यातील मोबाईल कनेक्टिव्हीटी समस्या दूर करण्यासाठी येत्या महिनाभरात विविध ठिकाणी मोबाईल मनोरे उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील विविध भागात मोबाईल कनेक्टिव्हीटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्यास मान्यता दिली होती. तथापि, कनेक्टिव्हीटी समस्येमुळे विविध अडचणी निर्माण होत आहेत. राज्यात मोबाईलसाठी योग्य कनेक्टिव्हीटीसाठी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यापूर्वी मान्य केले आहे.

नागरिकांकडून मोबाईल टॉवर्स उभारण्यास विरोध केला जात असल्याने अनेक भागात मोबाईल टॉवर्स उभारण्याचे काम रेंगाळत पडलेले आहे. मोबाईल मनोरे उभारण्यासाठी सरकार दरबारी अर्ज प्रलंबित आहेत. राज्यातील मोबाईल कनेक्टिव्हीटी वाढविण्यासाठी नवीन साधन सुविधा उभारण्यावर विचारविनिमय सुरू आहे. साधन सुविधा धोरण २०२० निश्‍चित केले जात आहे. येत्या महिनाभरात योग्य निर्णय घेऊन मनोरे उभारण्यास मान्यता दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.