नवरात्रोत्सव

0
86
  • लक्ष्मण कृष्ण पित्रे

देवी ही तामसरूपात महाकाली, राजसरूपात महालक्ष्मी आणि सात्त्विक रूपात महासरस्वती अशी ती आदिशक्ती आपल्यापुढे आविर्भूत होते. तिच्याकडून सामर्थ्य, संपत्ती आणि विद्या यांची आपण प्रार्थना करायची असते. यानिमित्ताने स्त्रीच्या सामर्थ्यसंपन्न रूपाचे दर्शन आपणास घडते व ती एक अखंड ऊर्जास्रोत आहे याची खात्री पटते. आणि हा विचार मनात ठेवूनच आपण दुसर्‍या दिवशी सीमोल्लंघन करून विजयाकडे कूच करतो.

आपल्या संस्कृतीमध्ये उत्सवांना फार महत्त्व आहे. धर्मसंकल्पनेतील मूलभूत कार्य ते पार पाडतात. धर्म म्हणजे काय? भगवान व्यासांनी धर्माची व्याख्या अत्यंत वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक केलेली आहे. ‘धारणात् धर्म इत्याहुः धर्मो धारयति प्रजाः|’ -धारण करतो तो धर्म. धर्म हा समाजधारणेला एका सूत्रात बांधून सुसंघटित ठेवण्याचे कार्य करतो. आपले धार्मिक उत्सव नेमके तेच कार्य करीत असतात. कारण उपासनेच्या विधानाबरोबरच त्यांना सामाजिक अंगही असते; आणि त्यामुळेच समाजातील विविध घटक एकत्र येतात. धर्माचे उद्दिष्ट साध्य होते.

नवरात्रोत्सव हाही असाच एक महत्त्वाचा उत्सव आहे. ‘नवरात्र’ म्हणजे नऊ रात्रींचा समुदाय. (नवानां रात्रीणां समाहारः|) अर्थात रात्रीसह दिवसही आले. पण रात्रींना महत्त्व का? तर दिवसा घडणार्‍या पूजा, आरती इत्यादी कार्यक्रमांबरोबरच रात्री संपन्न होणार्‍या कीर्तन, प्रवचन, भजन वा इतर रंजक कार्यक्रमांनाही महत्त्व असते.

आपल्या प्रस्तुत नवरात्राला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. शारदीय म्हणजे शरद ऋतूतील. आश्‍विन महिन्यापासून शरद ऋतू सुरू होतो आणि त्याच्या प्रतिपदेपासूनच या नवरात्राला प्रारंभ होतो. दुसरे म्हणजे शारदेला या उत्सवात महत्त्व असते, म्हणून शारदीय अशीही व्युत्पत्ती संभवते. हे मुख्य नवरात्र आहे. तशी पांडुरंग, दत्त, राम, कृष्ण, खंडोबा इत्यादी देवतांची नवरात्रेही साजरी केली जातात. ती वैशाख वा इतर महिन्यात असतात. परंतु शारदीय नवरात्र हे एकच व महत्त्वाचे आहे.

दुर्गा ही या उत्सवाची देवता असून घटस्थापना हा मुख्य विधी आहे. पवित्र स्थानी मातीची वेदी तयार करून तिच्यावर मातीचा वा धातूचा कलश (घट) पाण्याने भरून ठेवतात. त्यावर आंब्याच्या पानांचा टाळा, तांदूळ भरलेले ताट आणि त्यावर देवीची मूर्ती ठेवतात आणि नऊ दिवस त्या घटस्थापित दुर्गेची पूजा करतात. नवरात्राच्या पहिल्या दिवशी स्थापन केल्या जाणार्‍या घटाला प्रतीकात्मक महत्त्व आहे. हा उत्सव दुर्गेचा, आदिशक्तीचा म्हणजेच मातृदेवतेचा आहे. प्रजनन हे त्या शक्तीचे मोठे आणि मुख्य कार्य आहे. तेव्हा सर्जनशक्तीचे प्रतीक, गर्भाशयाचे प्रतीक या रूपात घटाची पूजा होते असे मला वाटते. म्हणूनच उदकपूर्ण घट हा नेहमीच मंगल मानला जातो.

भारतात आदिशक्तीची, मातृदेवतेची पूजा आदिम कालापासून प्रचलित होती. देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी तिची पूजा केली जात असे. पण पुराणकारांनी त्या सर्व देवींना एकत्र आणून ‘दुर्गा’ या देवतेची कल्पना केली. वेदात महालक्ष्मी आहे, सरस्वती आहे; पण दुर्गा या स्वरूपात आपणास दिसत नाही. पण रामायणात आणि महाभारतात दुर्गेचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. पुराणकाळात शिवपत्नी या रूपात ती आपल्यासमोर येते. उमा, गौरी, पार्वती, चंडा, चामुंडा, काली कपालिनी, भवानी ही सारी तिचीच नवे आहेत. गौरी, पार्वती, उमा इत्यादी सौम्यरूपात ती आमचे कल्याण करते, तर चंडी, चामुंडा, काली इत्यादी रौद्ररूपात ती आमच्यावर संकट आणणार्‍या असुरांचा विनाश करते आणि पर्यायाने मानवजातीचे कल्याणच करते. पुराणात देवीच्या दुर्गा या नावाची व्युत्पत्ती अशी आहे-
दैत्यनाशार्थवचनो दकारः परिकीर्तिंतः|
उकारो विघ्ननाशश्‍च वाचको वेदसंमतः|
रेफो रोगघ्नवचनो गश्‍च पापघ्नवाचकः|
भयशत्रुघ्नवचनः आकारः परिकीर्तितः॥

  • दकार हा दैत्यनाशवाचक, उकार विघ्ननाशवाचक, रेफ हा रोगनाशक, गकार पापनाशक आणि आकार हा भय आणि शत्रू यांचा नाश दर्शविणारा असे वेदांना संमत आहे.
    दुर्ग नामक दैत्याचा वध केला म्हणून तिला ‘दुर्गा’ म्हणतात अशीही एक व्युत्पत्ती आहे. दुर्गा ही सर्व देवांचे तेज घेऊन निर्माण झाली असे मार्कंडेय पुराणात सांगितले आहे.

‘सप्तशती’ या नावाने प्रसिद्ध ग्रंथ मार्कंडेयपुराणाचाच भाग आहे. त्याच्या ८१ ते ९२ या अध्यायातील सातशे श्‍लोकांनाच ‘सप्तशती’ म्हणतात. तिच्यात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही तीन दुर्गेचीच रूपे आहेत असे सांगितले आहे. ही तीन रूपे त्रिगुणात्मक आहेत. महाकाली ही तमोगुणी असून ती शिवाशी संबद्ध आहे. दुसरी महालक्ष्मी ही सत्त्वगुणी असून ती सत्त्वगुणी विष्णूशी संबद्ध आहे, तर महासरस्वती ही रजोगुणी असून त्याच गुणाच्या ब्रह्मदेवाशी संबद्ध आहे. या तिन्ही रूपांच्या उत्पत्तिकथाही सप्तशतीत दिलेल्या आहेत. प्रलयकाली विष्णू योगनिद्रेत असताना त्याच्या कानातून मधु आणि कैटभ हे दोन दैत्य बाहेर आले व ब्रह्मदेवाच्या मागे लागले. त्यांना महाकालीचे रूप घेऊन योगनिद्रेने मोहीत केले आणि विष्णूने त्यांचा वध केला.

महिषासुर नामक दैत्य महाबली बनला. इंद्राचा पराभव करून स्वतः इंद्रपदावर बसला. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन विष्णू व शंकर यांच्याकडे गेले. महिषासुराचे अत्याचार ऐकून दोघांच्या भुवया वक्र बनल्या. त्यांच्या व इतर देवांच्या शरीरातून तेजाचा झोत बाहेर पडला व ते सर्व तेज पुंजीभूत होऊन त्यातून महालक्ष्मी निर्माण झाली. देवांनी तिची स्तुती करून आपापली शस्त्रे तिला दिली. तिने प्रचंड गर्जना केली. महिषासुर धावून आला, पण तिने त्याच्याशी घनघोर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला. शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी देवांना पराभूत केले आणि यज्ञातील हविर्भाग स्वतः घेऊ लागले. मग देवांनी पार्वतीची स्तुती केली, तेव्हा तिच्या शरीरकोशातून प्रकट झालेली देवी म्हणजेच महासरस्वती होय. तिने शुंभ-निशुंभाशी युद्ध करून त्यांचा वध केला. ही दुर्गेची तीन प्रमुख रूपे होत. मग या प्रत्येक रूपात आणखी दोन रूपे मिळून त्रिवृत्करण झाले. मग त्या नवरूपात्मक देवीला नवदुर्गा नाव मिळाले. शक्तितंत्रात त्यामुळेच ‘नऊ’ या अंकाला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘नऊ’ हा श्रीशक्तीचे स्वरूप दाखविणारा अद्भुत अंक आहे. दशमानातील तो सर्वात मोठा अंक आहे, तसाच तो परिपूर्णही आहे. त्याची बेरीज, गुणाकार इ. केले तरी उत्तर नऊच येते. त्यामुळे शक्तिउपासनेत नऊ हे शक्तीचे अंक प्रतीक ठरले आहे. ‘नवरात्रा’चे महत्त्व याही दृष्टीने आहे.

‘देवीभागवत’ हेही एक देविमाहात्म्य सांगणारे उपपुराण आहे. त्यात बारा स्कंधात अठरा हजार श्‍लोक आहेत. आदिशक्ती अशा दुर्गेचे माहात्म्य आणि तिच्या उपासनेच्या विधिविधानांचे सांगोपांग विवरण हा या पुराणाचा विषय आहे. दुर्गा हेच परमतत्त्व असून ब्रह्मा, विष्णू व महेश हेही तिच्या प्रभावाखाली आहेत, असे हे पुराण सांगते. सातव्या स्कंधात ‘देवीगीता’ आहे. तिथे ती आश्‍वासन देते की, ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, तदा वेषान् विभर्म्यहम्‌|’ देव्युपनिषद या ग्रंथात तर तिला ब्रह्मरूपिणी मानले आहे.

अशा या आदिशक्ती दुर्गेच्या उपासनारूप उत्सवामध्ये घटस्थापना हा मुख्य विधी असून त्याला प्रतीकात्मक महत्त्व आहे हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. तसे पाहिले तर हे एक काम्य व्रत आहे, पण कित्येक कुटुंबांत ते कुलाचार म्हणून पाळले जाते. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला हे सुरू होते. सोळा हात लांब-रुंद प्रशस्त मंडप घालावा. त्यात मातीची प्रशस्त वेदी बनवावी. पांढर्‍या तिळांसह स्नान करून, स्वस्तिवाचन करून त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा दुर्गेची मूर्ती स्थापन करावी असे विधान आहे. मूर्ती उपलब्ध नसल्यास ‘नवार्ण यंत्र’ स्थापन करावे. ‘ऐं हृीं क्लीं चामुण्डायै विच्चै’ या अत्यंत प्रभावी मंत्राने नवार्णयंत्र सिद्ध होते. या नवार्णमंत्राने कामिनी वश होते. राजाची मर्जी प्राप्त होते. हत्ती, चोर, सर्प, शत्रू यांचे भय नष्ट होते असे सांगितले आहे. या मंत्राच्या पुरश्‍चरणाने चंडिकेची पूर्ण कृपा होते. मूर्तीच्या वा यंत्राच्या बाजूला घटस्थापना करावी आणि नऊ दिवस उपवास करून सांग पूजा करावी. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवावा. घटावर रोज एक याप्रमाणे नऊ दिवस नऊ माळा किंवा चढत्या क्रमाने म्हणजे आज एक, उद्या दोन अशा रीतीने माळा घालाव्यात. पहिल्या दिवशी मातीच्या वेदीवर विविध धान्यांचे रुजवण घालावे. नऊ दिवस कुमारीपूजन करून त्यांना भोजन द्यावे, अशा प्रकारे विधिविधान या उत्सवाचे केलेले आहे. नऊ दिवसांनंतर दुर्गेचे विसर्जन करायचे म्हणजे नवरात्रोत्सवाची सांगता होते असे या उत्सवाचे धार्मिक स्वरूप आहे.

या उत्सवाच्या धार्मिक अंगाचे अधिक तपशील सांगायचे तर पाचव्या दिवशी ललितापंचमी साजरी केली जाते. ललिता हे दुर्गेचेच एक रूप आहे. त्या दिवशी या रूपात तिची पूजा करतात. ‘उपांगललिताव्रत’ नावाचे एक काम्य व्रतही आहे. करंडकाचे झाकण हे तिची प्रतीक म्हणून पूजतात. तिच्या ध्यानाचा श्‍लोक असा आहे-
नीलकौशेयवसनां हेमाभां कमलासनाम्‌|
भक्तानां वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्‌॥
तिला दुर्वा आणि घागरींचे वायन अर्पण करतात. आठव्या दिवशीच सरस्वतीचे पूजन करतात. तसेच महालक्ष्मीचे पूजन करून ‘घागरी फुंकणे’ हा फुगडीस्वरूप कार्यक्रम असतो. हा विशेषतः कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये प्रचलित आहे. नवव्या दिवशी कुमारीपूजन केले जाते. खरं म्हणजे नऊ दिवस नेहमीच कुमारीपूजन करावे असे सांगितले आहे. पण नवव्या दिवशी विशेषकरून केले जाते. कुमारी म्हणजे दोन ते दहा वर्षांपर्यंत वयाची मुलगी. एकेका दिवशी एक-एक किंवा चढत्या क्रमाने (एक-दोन-तीन अशा) कुमारिकांचे पूजन, भोजन असे विहित आहे. तिचा आवाहनमंत्र पुढीलप्रमाणे आहे-
मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूपधारिणीम्‌|
नवदुर्गात्मिकां साक्षात् कन्यामावाहयाम्यहम्‌॥
विधी पूजा म्हणजे पाय धुणे, चौरंगावर बसवून गंध, फुले देणे, गळ्यात फुलमाळा घालून पंचामृत आणि मिष्टान्न देणे अशा स्वरूपाची असते.
नऊ दिवस नऊ रात्री अखंड दीप प्रज्वलित ठेवणे हे या उत्सवाचे एक वैशिष्ट्य आहे. दिव्याला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही आपली वैदिक प्रार्थना आहे. अग्नी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. वणव्याच्या दाहक, संहारक रूपात आणि दीपाच्या कल्याणकारक रूपात ते आपल्यासमोर येते. आपल्या प्रत्येक धर्मकार्यात स्थापितदीप असतो. दिव्यांनी ओवाळणी असते, दीपदान असते, दीपपूजन असते. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवण्याचे कारण म्हणजे उपासनेची अखंडता, प्रयत्नांचे सातत्य आणि मांगल्याचा निवास अधोरेखित करणे हेच असते.

भारतात सर्वत्र हा उत्सव साजरा केला जातो. बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इत्यादी प्रांतांत हा उत्सव आपल्या प्रादेशिक भिन्नतेसह उत्साहात साजरा केला जातो. बंगालात दुर्गापूजेचे विशेष प्रस्थ असते. तिथे दुर्गेची मृण्मयी दशभुजा मूर्ती करतात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूला कार्तिकेय, गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती केल्या जातात. तिथे वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपात हा उत्सव साजरा होतो. गुजरातेत दुर्गापूजेवेळी गर्बा आणि दांडिया नृत्याचे कार्यक्रम असतात. गर्बा याचा मूळ शब्द ‘गर्भ’ असा आहे. मातीच्या सच्छिद्र घटात दिवा ठेवतात, त्याला ‘गर्भदीप’ म्हणतात आणि त्याच्याभोवती केले जाणारे नृत्य ते ‘गर्भानृत्य’ होय. या उत्सवाचा आदिशक्ती आणि सर्जनाशी जो संबंध आहे, तो या गर्भदीपामुळे अधिकच स्पष्ट होतो आणि हा सृजनोत्सवाचाच प्रकार असल्याचे आपणास पटते. नृत्यातून उत्साहाला वाट मिळते. आनंदाचे आदान-प्रदान घडते आणि बंधुभाव वाढतो, हे खरेच आहे.
गोव्यातही हा उत्सव वैयक्तिकरीत्या आणि देवस्थानांतून सार्वजनिकरीत्या साजरा होतो. ठिकठिकाणी मंदिरांतून नऊ दिवस भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विशेष म्हणजे काही देवळांतून ‘मखरोत्सव’ होतो. म्हणजे लाकडाची मखरे बनवून, त्यात देवमूर्ती ठेवून त्यांना झोके दिले जातात. फारच प्रेक्षणीय असतो तो कार्यक्रम. या नवरात्रोत्सवानंतर येतो तो दसर्‍याचा सण, ज्या दिवशी आपण सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितादेवीचे पूजन आणि शस्त्रपूजन करतो. प्रतीकात्मक सोनेही लुटतो आणि विजयोत्सव साजरा करतो.

आतापर्यंत विवेचन केलेला नवरात्रोत्सव वस्तुतः आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव असतो हे आपण पाहिले. दुर्गेच्या प्रतिमेत आम्ही स्त्रीशक्तीची विविध रूपेच पाहतो. तिच्या ओजस्वी चरित्र्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे उग्ररूप, हवे ते प्राप्त करून घेण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे निश्‍चयी रूप, विविध प्राप्त सामर्थ्याचा भूतमात्रांच्या कल्याणासाठी उपयोग करण्याचे ‘योजकरूप’, सदैव समाजघटकांच्या कल्याणाची कामना करणारे वत्सलरूप अशी विविध रूपे आपल्यासमोर मूर्त होतात.

सप्तशतीत सांगितल्याप्रमाणे ती देवी तामसरूपात महाकाली, राजसरूपात महालक्ष्मी आणि सात्त्विक रूपात महासरस्वती अशी ती आदिशक्ती आपल्यापुढे आविर्भूत होते. तिच्याकडून सामर्थ्य, संपत्ती आणि विद्या यांची आपण प्रार्थना करायची असते. यानिमित्ताने स्त्रीच्या सामर्थ्यसंपन्न रूपाचे दर्शन आपणास घडते आणि ती एक भोगवस्तू नसून अखंड ऊर्जास्रोत आहे याची खात्री पटते. आणि हा विचार मनात ठेवूनच आपण दुसर्‍या दिवशी सीमोल्लंघन करून विजयाकडे कूच करतो.