नवभारत निर्मितीसाठी तरुणांचे योगदान मोलाचे

0
54

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

>> राष्ट्रीय युवा संसदेचे दोनापावला येथे उद्घाटन

भविष्यात नवभारत निर्मितीसाठी देशातील तरूणांचे योगदान अत्यंत मोलाचे असणार आहे. मेक इन इंडियाबरोबरच गोवा सरकार अंत्योदयाच्या तत्वावर कार्य करीत आहे. राज्य विकासासाठी राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन ही एक सुवर्ण संधी असून युवकांनी दोन दिवस त्या संधी लाभ घ्यावा असे ावाहनव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा विधानसभा, गोवा सरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, दोनापावला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय युवा संसदे’च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष, मिटसॉगचे संस्थापक व संसदेचे निमंत्रक राहुल कराड, सभापती राजेश पाटणेकर, मराठी अभिनेते शरद पोंक्षे, युवा नेते नुपूर शर्मा, हरियाणाच्या खासदार सुनिता दुग्गल, राष्ट्रीय विचारवंत जयंत सहस्त्रबुद्धे आणि आमदार प्रवीण साठे उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, अखंडित भारताचे धोरण आखणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न या देशातील नवयुवक पूर्ण करणार आहेत. त्यासाठी युवकांना समोर येणे गरजचे आहे. सातत्याने समाज कार्य करीत असल्यामुळे आज गोव्याची धुरा माझ्याकडे आली आहे. त्यामुळे पुढील काळातही समाजकार्य हेच प्राथमिक ध्येय असेल.

जनकल्याणासाठी २१० सरकारी योजना
गोवा सरकारने जनकल्याणासाठी २१० सरकारी योजना आखल्या. त्याचा लाभ खूप मोठ्या प्रमाणात उचलला जात आहे. तसेच ऑनलाइनद्वारे १५७ सेवा देण्यात येत आहेत. येथे शिक्षणाची गंगा आणण्यासाठी केजी टू पीजीबरोबरच आयआयटी, आयआयएमसारखे दर्जेदार व सर्व वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील तिसरी फॉरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटीचे नुकतेच उद्घाटन झाले. तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ५० टक्के फी माफ केली आहे. करियरबरोबरच युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला आहे. सीएम फेलोशीप व सीएम रोजगार योजना सुरू केली. आयटी सेलच्या माध्यमातून स्टार्टअप ही सुरू केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळासाठी अनेक सवलती व योजना सुरू केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्यासाठी चांगले प्रशिक्षण केंद्र सुरू करून स्पोर्टस पॉलिसी तयार केली आहे. याचा लाभ राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे सांगितले.
राहुल कराड यांनी, देशात राजकारणाचे प्रशिक्षण देणारी संस्था एमआयटीने २००५ मध्ये सुरू केली. त्या माध्यमातून देशाला जवळपास ५०० विद्यार्थी नेते देऊन ते वेगवेगळ्या पक्षांबरोबर कार्य करीत असल्याचे सांगितले. तरूणांनी लोकशाहीचा श्वास बनून सहभागी झाले पाहिजे, त्यातूनच देशाची लोकशाही मजबूत होईल. सुशिक्षित तरूणांनी राजकारणात येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे. युवकांनी कल्पनेला साकार करण्याच्या दिशेने पाऊले उचलावे. इंडियाचे नाव भारत असे संबोधले जावे त्यासाठी युवकांची ऊर्जा आवश्यक असून वसाहवादी मानसिकता बदलण्यासाठी ते महत्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्‍वास पुढे बोलताना श्री. कराड यांनी व्यक्त केला.

जयंत सहस्त्रबुद्धे म्हणाले, सूंपूर्ण जगावर आलेले ग्लोबल वार्मिंग संकट संपविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वस्तरावरील मंचावर पंचामृत म्हणजेच ५ गोष्टी जगाला सांगितले. कार्बन उत्सर्जन आणि जल वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. या पंचामृतमुळे देशाची प्रगती होईल असेही पुढे सांगितले.

सभापती पाटणेकर यांनी, एमआयटी व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांसाठी राष्ट्रीय युवा संसद हे देशाचे भविष्य घडविणारे आहे. ही संसद देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी व भविष्यासाठी सर्वोत्तम आहे. देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी युवा शक्ती अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात असे सांगितले.

यावेळी गोव्याचे नाव उंचावणार्‍या युवकांचा सत्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.