नवनिर्वाचित राज्यपालांचा आज शपथविधी

0
81

>> राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचे गोव्यात आगमन

नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई काल बुधवारी दाबोळी विमानतळावर दुपारी दाखल झाले. विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते. आज गुरूवार दि. १५ जुलै रोजी सायंकाळी पिल्लई राज्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत.

गोव्याच्या राज्यपालपदी श्रीधरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा होता. गोव्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, त्रिपुरा, हरियाणा आणि मिझोरम या आठ राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा गेल्या मंगळवारी केली होती.

राज्यपाल श्री. पिल्लई आज १५ जुलै रोजी सायंकाळी राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनावर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांना शपथ देतील, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

राज्यपाल श्री. पिल्लई हे वकील आणि लेखकही आहेत. गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते मिझोरमचे १५ वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

न्यायमूर्ती दिपांकर दत्ता
यांचे आगमन

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचे काल बुधवारी संध्याकाळी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. गोव्याचे नवनिर्वाचित राज्यपाल श्री. पिल्लई यांना ते राज्यपालपदाची शपथ देणार आहेत. त्यासाठी ते काल गोव्यात दाखल झाले. शपथविधी सोहळा राजभवनावर होणार आहे.