नरेंद्र मोदी लोकशाही मानणारे नेते ः शहा

0
31

>> विरोधकांच्या हुकूमशाहीच्या आरोपाचे खंडन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मानणारे नेते आहेत. नरेंद्र मोदींसारखा समजून आणि ऐकून घेणारा नेता आपण पाहिलेला नाही. मोदी छोट्यातल्या छोट्या कामगाराचेही धीराने ऐकतात. त्यामुळे मोदी हुकूमशाही वृत्तीचे असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘संसद टीव्ही’ चॅनेलना मुलाखत दिली. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते.

अनेक जण हा आरोप आमच्यावर करतात. पण हे सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. मी आतापर्यंत पंतप्रधान मोदींसारखा श्रोता बघितलेला नाही. कुठल्याही मुद्द्यावर बैठक असल्यावर ते कमी बोलतात आणि इतरांचे ऐकून घेतात. त्यानंतर ते निर्णय घेतात. ते इतका का विचार करतात? हा आम्हाला प्रश्न पडतो. ते २-३ बैठकांनंतर धैर्याने निर्णय घेतात, असे शहा यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक व्यक्तीच्या सूचनेला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर पंतप्रधान मोदींनी महत्त्व दिले आहे, ती व्यक्ती कोण आहे याच्या आधारावर नाही. यामुळे पंतप्रधान म्हणून ते आपले निर्णय लादतात, असे म्हणण्यात अजिबात तथ्य नसल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.