नदीत बस कोसळू सात जवानांचा मृत्यू

0
25

>> लडाखमधील घटनेत १९ जवान जखमी; अपघाताचे कारण अस्पष्ट

लडाखमध्ये झालेल्या वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या ७ जवानांना आपला जीव गमवावा लागला. लष्कराच्या २६ जवानांना घेऊन जाणारी बस काल सकाळी श्योक नदीत कोसळली. या दुर्घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला असून, १९ जवान जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य राबवत जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२६ जवानांचे पथक परतापूरच्या ट्रांझिस्ट कॅम्पहून उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होते. थोइसपासून २५ किलोमीटर अंतरावर लष्करी जवानांच्या बसला अपघात झाला. जवानांची बस काल सकाळी ९च्या सुमारास श्योक नदीत कोसळली. या बसमधून २६ जवान प्रवास करत होते. रस्त्यापासून नदीची खोली सुमारे ५०-६० फूट आहे. त्यामुळे वाहनातील सर्व जवान गंभीर जखमी झाले. आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहे. १९ जखमी जवानांना उपचारांसाठी परतापूर येथील ४०३ फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्जिकल टीमला लेहहून परतापूरला पाठवण्यात आले आहे. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांना उपचारांसाठी वेस्टर्न कमांडला पाठवले जाऊ शकते.

लष्कराची बस कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीत कशी पडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार सैनिकांची बस ट्रांझिस्ट कॅम्पमधून सब सेक्टर हनीफच्या पुढे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
या दुर्दैवी अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. लडाखमधील वाहन दुर्घटनेने आपण दुखावलो आहे. या अपघातात आपण आपल्या लष्कराच्या शूर जवानांना गमावले आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. मला आशा आहे की, या अपघातात जे जखमी झाले आहेत, त्याना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या घटनेबद्दल राजनाथ सिंह, अमित शहा यांनीही दुःख व्यक्त केले आहे.