नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती; प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न
राज्य सरकारने वाढते तापमान आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी राज्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये हिरवळ आणि प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी ‘ग्रीन लंग्स’ हा एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वन तथा नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली. वन आणि नगरविकास खात्याच्या संयुक्त बैठकीनंतर ते बोलत होते.
वन खाते आणि नगरविकास खाते यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात ‘ग्रीन लंग्स’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरी भागात हिरवाई वाढवून प्रदूषण कमी करणे, जैवविविधतेला चालना देण्याचा उद्देश आहे, असे राणे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व नगरपालिकांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे. या उपक्रमावर चर्चेसाठी आयोजित बैठकीला वन खाते, नगरविकास खात्याचे अधिकारी, पणजीचे महापौर, नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरी वृक्षारोपण आणि तापमान नियंत्रण या विषयावर सादरीकरण आणि चर्चा करण्यात आली, अशी माहिती राणे यांनी दिली.
वन खात्याने शहरी भागातील मोकळ्या जागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबविण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सोनसडो भागात मायावाकी पद्धतीने जंगल निर्माण करणे, निवडक भागांमध्ये व्हर्टिकल गार्डन उभारणे अशा संकल्पानांचा समावेश आहे. स्टुडिओ पॉगी संस्था या रचनात्मक कामामध्ये मदत करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ओला कचरा, पावसाचे पाणी आणि नैसर्गिक संसाधने वापरून शहरांमध्ये हिरवळ निर्माण केली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.
‘ग्रीन लंग्स’ म्हणजे काय?
शहरी भागातील हिरवळीच्या जागा, ज्या प्रदूषण कमी करतात, हवामान नियंत्रणास मदत करतात, जैवविविधतेला चालना देतात आणि नागरिकांसाठी शुद्ध वायू, सावली आणि शांतता देणारे स्थान बनतात, त्याला ग्रीन लंग्स असे संबोधले जाते, असे विश्वजीत राणे म्हणाले.

