ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना टाळे ठोका

0
20

पेडणे व हणजूण किनाऱ्यावर कर्णकर्कश संगीत वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना टाळे ठोकावे व त्यांचे सगळे साहित्य जप्त करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला. त्यासाठी आकस्मिक तपासणी मोहीम हाती घेण्याची सूचना न्यायालयाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा न्यायदंडाधिकारी, पोलीस व ध्वनी प्रदूषणाशी संबंधित अन्य अधिकारिणींना केली.

हणजूण किनारा व पेडणे येथे संबंधित अधिकारिणींनी संयुक्तपणे तपासणी करावी. हणजूण व पेडणे पोलिसांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा व आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत रात्रीच्यावेळी हे छापे मारावेत, अशी सूचना खंडपीठाने केली. या परिसरातील हॉटेलचालकांकडून, तसेच रात्रीच्यावेळी पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांकडून कर्णकर्कश संगीत वाजवून ध्वनिप्रदूषण केले जात असल्याप्रकरणी स्थानिक लोकांनी केलेल्या तक्रारींवरुन खंडपीठाने हा आदेश दिला.