धेंपो-साळगावकर लढत बरोबरीत

0
96

धेंपो स्पोर्टस् क्लब आणि साळगावकर एफसी यांच्यात काल सोमवारी धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेली सेलवेल गोवा प्रो-लीग स्पर्धेतील लढत गोलशून्य बरोबरीत संपली.
दोन्ही संघांनी सावध प्रारंभ केला. साळगावकरने पहिले आक्रमणे केले. त्यांच्या रॉलविन आल्मेदाने उजव्या विंगेतून चढाई करीत गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने घेतलेला फटका थोडक्यात गोलपोस्टच्या बाहेर गेला. त्यानंतर साळगावकरने गोल करण्याची सोपी संधी गमावली. सेल्विन मिरांडाने दोन बचावपटूंना चकवित घेतलेला जोरकर फटका धेंपोच्या गोलपोस्टच्या आडव्या बारवर आदळून परत आला.

दुसर्‍या बाजूने धेंपोच्या खेळाडूंनी काही संधी गमावल्या. बीवन डिमोलोने सामन्यात प्रभावी खेळ केला. त्याने बचावपटू रिचर्डला दिलेल्या एका पासवर धेंपोला गोल करण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु रिचर्ड गोल नोेंदविणार एवढ्यात साळगावकरच्या डॅनियल गोम्सने चेंडूवर नियंत्रण मिळवित संघावरील संकट टाळले. धेंपोला आणखी एक गोल करण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु लतेश मांद्रेकरने घेतलेला जोरकस फटका बीवन डिमेलोच्या पायाला लागल्याने गोल होऊ शकला नाही. त्यानंतर ६४व्या मिनिटाला धेंपोला आणखी एक सोपी संधी मिळाली होती. रिचर्डने उजव्या विंगेतून चेंडू कर्णधार बीवनडे पास केला. त्यावेळी बीवनच्या समोर केवळ प्रतिस्पर्धी गोलरक्षक होता. परंतु बीवनने स्वतः गोल करण्याचा प्रयत्न न करताना चेंडू किर्तिकेश गडेकरकडे पास गेला आणि किर्तिकेशला गोलरक्षकाला चतविता आले नाही. त्याने घेतलेला फटका थोडक्यात बाहेर गेल्याने धेंपोला पूर्ण गुण मिळवून देण्याची संधी वाया गेली.

दरम्यान, सेलवेल गोवा प्रो-लीग फुटबॉॅल स्पर्धेतील सेझा फुटबॉल अकादमी आणि यूथ क्लब ऑफ मनोरा यांच्यात धुळेर स्टेडियमवर आज मंगळवार दि. २ मार्च रोजी होणारा सामना काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.