‘धिंग एक्स्प्रेस’चा धडाका…

0
112
  • सुधाकर नाईक

 

आसामची किशोरवयीन ‘धावराणी’ हिमा दासने गत महिन्यात युरोपमधील ट्रॅक प्रतियोगितांत केवळ तीन आठवड्यांत पाच सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. जुलै २०१८ मध्ये टेम्पेरे- फिनलँड येथे झालेल्या वर्ल्ड अंडर-२० चॅम्पियनशीपमध्ये ४०० मीटर्स प्रतियोगितेत सुवर्णपदक पटकावीत हिमाने इंटरनॅशनल ट्रॅक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय धावपटू बनण्याचा मान मिळविला होता.

 

आसामची किशोरवयीन ‘धावराणी’ हिमा दासने गत महिन्यात युरोपमधील ट्रॅक प्रतियोगितांत केवळ तीन आठवड्यांत पाच सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. जुलै २०१८ मध्ये टेम्पेरे, फिनलँड येथे झालेल्या वर्ल्ड अंडर-२० चॅम्पियनशीपमध्ये ४०० मीटर्स प्रतियोगितेत सुवर्णपदक पटकावीत हिमाने इंटरनॅशनल ट्रॅक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय धावपटू बनण्याचा मान मिळविला होता.

जुलै महिना हा हिमासाठी भाग्यदायी ठरला असून पोलंड आणि झेक प्रजासत्ताकमधील स्पर्धांत तिने चक्क पाच सुवर्णपदकांना गवसणी घातली. ९ जानेवारी २००० मध्ये आसामच्या नागाव जिल्ह्यातील धिंग या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली हिमा प्रारंभी शाळेमध्ये फुटबॉल खेळायची. हिमामधील गुणवत्ता जाणून शालेय क्रीडा प्रशिक्षकांनी तिला धावण्याकडे (ट्रॅक) लक्ष केंद्रित करण्याचा गुरुमंत्र दिला. ‘चॅम्पियन्स’ची इच्छाशक्ती अलौकिक असते आणि तिला योग्य दिशा लाभली की नवा इतिहास घडतो याची प्रचिती १९ वर्षीय हिमाच्या एकंदर वाटचालीवरून दिसून येते.
१०० मीटर्स, २०० मीटर्स, ४०० मीटर्स, ४४०० रिले अशा प्रतियोगितांत हिमाने कठोर परिश्रम केले आणि केवळ १८ व्या वर्षी ती आंतरराष्ट्रीय ट्रॅक प्रतियोगितांत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय ऍथलेट बनली. गतवर्षीच्या एशियन गेम्समधील कामगिरीने हिमाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि ‘धिंग एक्स्प्रेस’ नावाने तिची ओळख सुरू झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारी हिमा ही भोगेश्‍वर बरुआ यांच्यानंतरची आसामची दुसरी ऍथलेट होय.
२०१८ मधील आशियाई मेळ्यात हिमाने ४४०० मीटर्स मिश्र रिलेमध्ये रौप्यपदक मिळविलेले होते. पण नंतर सुवर्णपदक विजेत्यांवर बंदी आल्याने हिमा आणि साथीच्या रौप्यपदकाचे सुवर्णात रूपांतर झाले. या वर्षी जकार्ता एशियन गेम्समध्येही हिमाने ४४०० मीटर्स मिश्र स्पर्धेचे सुवर्णपदक मिळविले.
निपॉन दास, नवजीत मालाकार, गॅलिना बुखारिन आदी नामवंत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभलेल्या हिमाने गतमहिन्यात पोलंड आणि झेक प्रजासत्ताकमधील ऍथलेटिक मेळ्यात २०० आणि ४०० मीटर्समधील पाच प्रतियोगिता जिंकत आपला धडाका कायम राखला.

२०१८ मधील हिमाच्या गौरवशाली कामगिरीची दखल घेत भारत सरकारतर्फे तिला ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. ‘यूएनआयसीइए- इंडिया’ची भारताची पहिलीवहिली युथ अँबॅसेडर म्हणून नियुक्तीचा मानही हिमाला मिळाला. आसाम सरकारनेही हिमाच्या धवल कामगिरीची दखल घेत आसामची ‘स्पोटर्‌‌स अँबॅसेडर’ म्हणून तिची नियुक्ती केली.
‘आदिदास’ या स्पोर्ट्‌स जायंट आस्थापनाने हिमाच्या कामगिरीचा गौरव करताना सप्टेंबर २०१८ मध्येही हिमाला पुरस्कृत- करारबद्ध केले असून तिला या जगद्विख्यात आस्थापनातर्फे अत्याधुनिक क्रीडासुविधा तथा अन्य सर्वती मदत मिळत आहे.

पंजाब, केरळ, हरयाना, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांत प्रामुख्याने ऍथलेट्‌स निर्माण होतात, पण फारशी ऍथलेट्‌समधील विशेेष सुविधा नसलेल्या आसाम राज्यात हिमा उदय पावली हे कौतुकास्पद आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय ऍथलेट बनण्याचा पराक्रमही या आसामी कन्येने केला.
‘धिंग एक्स्प्रेस’च्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक ऍण्ड फिल्डमधील उदयाने पी. टी. उषाच्या पर्वाच्या स्मृतीला उजाळा लाभला आहे. ‘पायोली एक्स्प्रेस’ या नावाने ख्यात असलेल्या केरळीय उषाने ४०० मीटर्समध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. पी. टी. उषाने काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. एकदा तर तिला ऑलिंपिकपदक थोडक्याने हुकले होते. हिमाच्या कामगिरीचा आलेख पाहता अत्याधुनिक सुविधा आणि पाठबळामुळे ही आसामी कन्या असामान्य कर्तृत्व गाजवील अशी अपेक्षा आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जागतिक ऍथलेटिक स्पर्धा होत असून त्यासाठी पात्र ठरणे हे हिमापुढील मोठे आव्हान असेल.

२०२० मधील टोकियो ऑलिंपिकमध्ये हिमा भारताचे ट्रॅक ऍण्ड फिल्डमधील सुवर्णस्वप्न साकारील अशीही तिच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. आदिदास आस्थापनाने हिमाला मदतीचा हात दिला आहे. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अथक प्रयत्नांद्वारे कामगिरीचा आलेख उंचावणार्‍या हिमाला पुढील प्रवासात गरज पडल्यास परदेशी प्रशिक्षण, साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऍथलेटिक संघटना, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि नामवंत आस्थापनांनी पुढाकार घेऊन या सुवर्णकन्येच्या पंखांचे बळ वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.
‘पायोली एक्स्प्रेस’ पी. टी. उषाचे ऑलिंपिक पदकाचे स्वप्न ‘धिंग एक्स्प्रेस’ साकारील, तसेच आसामच्या या असामान्य कन्येकडून भविष्यात मोठमोठी कीर्तीशिखरे पादाक्रांत होतील, अशी अपेक्षा करूया.

चौकट
जुलै महिन्यात हिमाने अवघ्या तीन आठवड्यांत पाच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके मिळविली.
१) २ जुलै ः पोलंड येथील पोझनान ऍथलेटिक ग्रॅण्ड प्रिक्समध्ये २३.६५ सेकंद या वेळेसह २०० मीटर्समध्ये सुवर्ण.
२) ७ जुलै ः पोलंडमधील कुटनो ऍथलेटिक मेळ्यात २३.९७ सेकंद या वेळेसह २०० मीटर्समध्ये सुवर्ण.
१३ जुलै ः झेक रिपब्लिक येथील क्लांदो ऍथलेटिक्स मेळ्यात २३.४३ सेकंद या वेळेसह २०० मीटर्समध्ये सुवर्ण.
४) १७ जुलै ः झेक रिपब्लिक येथील टॅक्वेर ऍथलेटिक मेळ्यात २३.२५ सेकंद या वेळेसह २०० मीटर्समध्ये सुवर्ण.
५) २० जुलै ः झेक रिपब्लिक येथील नोणे मेस्टो प्रतियोगिता ५२.०९ या वेळेसह ४०० मीटर्समध्ये सुवर्ण.
हिमाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी अशी-
१०० मीटर्स- ११.७४ सेकंद (२०१८)
२०० मीटर्स- २३.१० सेकंद (२०१८)
४०० मीटर्स- ५०.७९ सेकंद (२०१८)