धरणाच्या फाटकाची दुरुस्ती 30 जुलैपर्यंत पूर्ण : शिरोडकर

0
3

आमठाणे धरणाच्या फाटकाच्या (गेट) दुरुस्तीचे काम सुरू असून, येत्या 30 जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली. आमठाणे येथील धरणाचे मुख्य फाटक नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सध्या आमठाणे धरणामध्ये पाण्याचा साठा केले जात नाही. साळ येथून पाणी खेचून आमठाणे धरणात साठविले जाते. त्या धरणातून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा केला जातो. आमठाणे धरणाला एक फाटक होते. ते फाटक जुने झाल्याने दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. आता, या आमठाणे धरणासाठी दोन फाटके तयार केली जात आहेत. फाटकाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा साठा केला जाणार आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने पाण्याच्या टंचाईचा प्रश्न निर्माण होत नाही, असेही शिरोडकर यांनी नमूद केले.