धक्कादायक

0
62

आसाम आणि मिझोरम यांच्यातील सीमावादाची परिणती सोमवारी दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांनी एकमेकांवर गोळीबार करण्यात झाली आणि आसामचे सहा पोलीस त्यात ठार झाले. भारताच्या दोन राज्यांदरम्यान अशा प्रकारचा सशस्त्र संघर्ष झडण्याची ही घटना अतिशय धक्कादायक आहे. भारत आणि पाकिस्तान अथवा भारत आणि चीनदरम्यान अशा प्रकारचा सशस्त्र संघर्ष आंतरराष्ट्रीय सीमेवर झडण्याचे प्रकार सतत घडत असतात, देशातील अनेक राज्यांदरम्यान बेळगावसारखे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले सीमावादही आहेत. अनेकदा राज्या – राज्यांत पाण्यासारख्या प्रश्नावरून संघर्षही कितीतरी वेळा उद्भवत असतात, परंतु दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर अशा रीतीने गोळ्या चालवणे हा जो काही प्रकार सोमवारी घडला तो अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे.
मिझोरमही ७२ साली स्वतंत्र संघप्रदेश बनला आणि ८७ साली गोव्याबरोबर ते घटक राज्यही बनले. नागालँड, मिझोरम, मेघालय ही सगळी राज्ये एकेकाळच्या अखंड आसाममधूनच वेगळी काढण्यात आलेली आहेत. सध्याच्या आसामच्या सीमा ह्या तिन्ही राज्यांना आणि अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आदी इतर राज्यांना भिडतात. आसाम – मेघालय किंवा आसाम – अरुणाचल प्रदेश ह्या सीमा आठशेहून अधिक कि. मी. लांबीच्या आहेत आणि त्यातही अनेक विवाद आहेत. आसाम – नागालँड सीमेबाबतीतही वाद आहेत. मिझोरमचा तिढा तर ब्रिटीशकालीन आहे. ब्रिटिशांनी १८७५ साली अधिसूचना काढून आखलेली सीमारेषा आणि नंतर मिझो जमातींच्या नेतृत्वाला विश्वासात न घेता १९३३ मध्ये नव्याने आखली गेलेली सीमारेषा यांच्या अंमलबजावणीवरून हा विवाद आहे. आसाम १९३३ ची पुनर्रचना गृहित धरतो, तर मिझोरमचा आग्रह १८७५ च्या सीमारेषेच्या अंमलबजावणीचा आहे. त्यामुळे त्यातून उद्भवलेला हा सीमाप्रश्न अधूनमधून डोके वर काढत असतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही ह्या प्रश्नावरून हिंसाचार उफाळला होता. अधूनमधून ह्या विवादित सीमाभागातील घरे, बागायती यांची जाळपोळ होत आली आहे. सोमवारी जे घडले तो मात्र कडेलोट होता. आसाम आणि मिझोरम पोलिसांनी एकमेकांवर गोळ्या चालवल्या. वास्तविक केंद्रीय गृहमंत्रालयाने ह्या सीमाविवादासंदर्भात दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची आणि पोलीस प्रमुखांची बैठक बोलावून मध्यस्थीचा प्रयत्न चालवला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली होती. दोन्ही राज्यांत भाजप सत्तेवर आहे. आसाममध्ये भाजपची स्वबळाची सत्ता आहे, तर मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट सरकारमध्ये भाजप सहभागी आहे. केंद्रात आणि दोन्ही राज्यांतही भाजप सत्तेत असूनही अशा प्रकारे दोन राज्यांमध्ये सशस्त्र संघर्ष झडणे ही नामुष्की आहे.
वास्तविक, अशा प्रकारचा विवाद जेव्हा असतो, तेव्हा त्या विवादित जागेला ‘नो मॅन्स लँड’ संबोधून जैसे थे स्थिती राखणेच शहाणपणाचे असते. दोन्ही राज्यांनी जर हिंसाचार टाळण्यासाठी ही जैसे थे स्थिती कायम राखण्याचा प्रयत्न केला असता तर हे टोक निश्‍चितच गाठले गेले नसते. परंतु येथे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री – आसामचे हिमंत बिस्वसर्मा आणि मिझोरमचे झोरमथांगा यांनी ट्वीटरवरून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. आपापल्या जनतेला खूश करण्यासाठी राजकीय कारणांखातर हे भले केले गेले असेल, परंतु यातून दोन भारतीय राज्ये एकमेकांच्या जिवावर उठली आहेत हे जे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे त्याचे काय? आजवर ईशान्य भारतातील विविध बंडखोर संघटना, आक्रमक विद्यार्थी संघटना, विविध जातीजमातींचे नेते आदींकडून हिंसाचाराला चिथावणी दिली जात आली. वेळोवेळी त्यातून प्रचंड हिंसाचार झाला. महत्प्रयासाने त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागली. ही सगळी पार्श्वभूमी असताना अशा प्रकारे दोन राज्यांच्या यंत्रणांतच हिंसक रक्तरंजित संघर्षाला तोंड फुटणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना योग्य ती समज देऊन परिस्थिती लवकरात लवकर निवळणे अत्यंत गरजेचे आहे. प्रांतिक भावना भडकावून मते जरूर मिळवता येतात, परंतु त्यातून जी तेढ निर्माण होते ती सांधण्यास मग युगे लागतात. त्याचे परिणाम भारताला वेळोवेळी भोगावे लागले आहेत. त्यामुळे आसाम – मिझोरम सीमेवर जे काही घडले त्याची पुनरावृत्ती कधीही होऊ नये आणि राष्ट्रद्रोही शक्तींना डोके वर काढण्याची संधी मिळू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने तत्पर हस्तक्षेप करण्याची नितांत आवश्यकता आहे.