दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघेजण ठार

0
6

राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून, काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांना आपले प्राण गमवावे लागले. म्हापसा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या पहिल्या अपघातात एक ५० वर्षीय इसम ठार झाला, तर कुरपावाडा-केळशी येथे बस व दुचाकी यांच्यातील अपघातात ३५ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. म्हापशातील अन्य एक जण गंभीर जखमी झाला, त्याला बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय तिस्क-उसगाव येथील एमआरएफ कंपनीजवळ झालेल्या एका अपघातात ३९ वर्षीय तरुण जखमी झाला. धारबांदोडा येथील आपल्या बहिणीकडे भाऊबीज साजरी करून ताळगाव येथे घरी परतताना हनुमंत कवळेकर हे जखमी झाले. त्यांची दुचाकी कंटेनरच्या चाकाखाली आली.

म्हापशात दोन दुचाकींचा अपघात

म्हापसा येथील हिंदू स्मशानभूमीजवळ काल दुपारी १२. ४५ च्या दरम्यान दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. दर्शन सीमेपुरुषकर (५०, रा. घुबलावाडा-ओशेल, शिवोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जस्टीन जेम्स (रा. केरळ) हा गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जस्टीन जेम्स हा आपल्या दुचाकीने (क्र. केएल-४६-एन-२२१९) झेवियर महाविद्यालयासमोरून भरधाव वेगाने येत होता, त्याचवेळी दर्शन सीमेपुरुषकर आपल्या दुचाकीने (क्र. जीए-०३-एएल-४४९२) म्हापशाहून झेवियर महाविद्यालयाच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने म्हापसा येथील हिंदू स्मशानभूमीकडे पोहचली असता, जस्टीस जैन याच्या दुचाकीची जोरदार धडक दर्शन सीमेपुरुषकर यांच्या दुचाकीला बसली. त्यात ते रस्त्यावर कोसळून रक्तबंबाळ झाले. यावेळी काहींनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला असता, ती हळदोण्यात असल्याने ती यायला अर्धातास उशीर झाला. त्याचवेळी म्हापसा पालिकेचे नगरसेवक ऍड. शशांक नार्वेकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपल्या वाहनात दर्शन सीमेपुरुषकर यांना घालून येथील जिल्हा इस्पितळात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत जस्टीन जेम्स याच्या तोंडाला, हाताला डोक्याला मार लागला असून, त्याला सुरुवातीला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारांसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच हवालदार तुळशीदास नारोजी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांच्यासमवेत इतर पोलीस व वाहतूकपोलीस उपस्थित होते. या प्रकरणी जस्टीन जेम्सविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केळशीत बस-दुचाकीमध्ये धडक

कुरपावाडा-केळशी येथे काल दुपारी २.४५ च्या सुमारास बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात आडपई-फोंडा येथील दुचाकीचालक संतोष सुरेश नाईक (३५) यांचा मृत्यू झाला. संतोष नाईक हे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नोकरी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नाईक हे आपल्या काही कामानिमित्त केळशी येथे आले होते. दुचाकीवरून जात असताना केळशी येथे त्यांची दुचाकी आणि बस यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही वेळातच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिलेल्या माहितीनुसार कुठ्ठाळी येथून बोरीमार्गे आपल्या घरी आडपई येथे जाताना संतोष नाईक यांच्या दुचाकीला समोरून येणार्‍या बसची धडक बसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत बांबोळी येथीलगोमेकॉत दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपनिरीक्षक प्रवीण सीमेपुरुषकर हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.