दोन जलदगती न्यायालये सुरू करण्यास मान्यता द्या ः राणे

0
104

>> दिल्लीत मंत्री स्मृती इराणींकडे मागणी

गोव्यात मुलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे जलद गतीने निकालात काढण्यासाठी दोन जलदगती न्यायालये आणि १०० नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे नवी दिल्ली येथे काल केली.
नवी दिल्ली दौर्‍यावर असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री राणे यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री इराणी यांची बुधवारी भेट घेतली. यापूर्वी मंत्री राणे यांनी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री इराणी यांची भेट घेऊन महिला व बालकल्याण खात्याच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच निर्भया निधी वापर, युनिव्हर्सल महिला हेल्पलाईन (१८१) या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

महिला व बाल कल्याण खात्याचे महिलांच्या विकासाबाबत ध्येय, ग्रामीण भागातील महिला उद्योजकांच्या आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, पोषण महिना साजरा करण्यासाठी आयोजित उपक्रमांची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

कौशल्य प्रशिक्षणसंस्थेचा प्रस्ताव
कौशल्य विकास मंत्री विश्‍वजित राणे यांनी केंद्रीय कौशल्य विकास मंत्री एम. एन. पांडे यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यासमोर गोव्यात जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली जाणार आहे.

ही समिती कौशल्य प्रशिक्षण संस्थेचा आराखडा तयार करणार आहे. ही संस्था पीपीपी तत्त्वावर सुरू केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.