दोघा पोलिसांसह अन्य चौघांना अटक

0
12

>> ‘फास्टफूड’चालकावर हल्ला प्रकरण; 3 पोलिसांचे निलंबन

माशेल येथील ‘फास्टफूड’ चालक विराज माशेलकर यांच्यावर रविवारी रात्री केलेल्या हल्ल्या प्रकरणी समीर फडते (46, रा. गावकरवाडा-बेतकी), मितेश गाड (27, रा. नावेली) या दोघा पोलिसांसह मोहित गाड (26, रा. नावेली), सुप्रेश सावर्डेकर (31, रा. हरवळे), विवेक देसाई (23, रा. साखळी) आणि अस्मित साळुंखे (27, रा. आमोणा) यांना म्हार्दोळ पोलिसांनी काल अटक केली. पोलीस कर्मचारी आकाश नावेलकर (27, रा. नावेली) याने तपासाला सर्व प्रकारचे सहकार्य केल्याने त्याला पोलिसांनी 41 अ कलमाखाली नोटीस पाठविली आहे. या हल्ला प्रकरणात सहभाग असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विराज माशेलकर यांच्यावर समीर फडते व अन्य 4 जणांनी हल्ला चढवून जखमी केले होते, तर अन्य तिघे जण फास्ट फूडच्या बाहेर उभे होते. जखमी झालेल्या विराज माशेलकर यांच्यावर गोमेकोत उपचार केल्यानंतर पहाटे 4 वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
सोमवारी दुपारी जखमी झालेल्या विराज माशेलकर यांनी रितसर पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सर्व प्रथम पोलिसांनी आकाश नावेलकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. आकाश नावेलकर याने पोलिसांना संशयितांचा शोध घेण्यात सहकार्य केल्याने त्याला अटक न करता 41 अ कलमा खाली नोटीस पाठविली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार समीर फडते याचे वरिष्ठ पोलिसांसह राजकारण्यांकडे जवळचे संबंध आहेत. त्याच राजकीय संबंधाचा लाभ उठविण्याच्या प्रयत्नात समीर फडते स्वतःच जाळ्यात
अडकला आहे.

तिघेही पोलीस निलंबित
हवालदार समीर फडते, अमलीपदार्थविरोधी पथकाचा कर्मचारी आकाश नावेलकर व भारतीय राखीव पोलीस दलाचा कर्मचारी मितेश गाड यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांनी तसा आदेश जारी केला आहे. यापूर्वी मार्च 2022 मध्ये जुने गोवे पोलीस स्थानकात हाणामारी केल्याप्रकरणी समीर फडते याला निलंबित करण्यात आले होते.

आधीच रचला हल्ल्याचा कट
माशेल येथील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार समीर फडते हा फोंडा पोलीस स्थानकात हवालदार म्हणून काम करीत आहे; परंतु हल्ला घडण्याच्या काही दिवस अगोदर त्याने 45 दिवस रजा घेतली होती. त्यामुळे विराज माशेलकर यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतूनेच त्याने रजा घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.