देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर

0
163

 

>> २४ तासांत ४७ तर एकूण ५९० बळी

देशभरात अद्यापही कोरोनाचा प्रसार वाढतच असून दरम्यान, मागील चोवीस तासांत देशभरात कोरनाने ४७ जणांचा बळी घेतला असून, १ हजार ३३६ नवे बाधित रुग्ण आढळले. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाची रुग्ण संख्या १८ हजार ३३६ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १४ हजार ७५९, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले ३ हजार २५२ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ५९० जणांचा समावेश आहे.

कोरोना व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रूग्णांची देशातील एकूण संख्या १८ हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र याचवेळी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे म्हटले आहे.

आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्यामुळे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.

दरम्यान, जगभरात आतापर्यंत १,६६,१२२ बळी गेले असून एकूण रुग्णांची संख्या २४,२६,७८९ झाली आहे. एकूण १९३ देशात विषाणूचा प्रसार झाला असून बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ६३६७०२ झाली आहे.