देशातील ८० टक्के शिक्षकांचे लसीकरण

0
65

>> शिक्षकेतर कर्मचार्‍यांचाही समावेश, केंद्र सरकारची माहिती

देशातील सुमारे ८० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने काल जाहीर केली. केंद्र सरकारने गुगल ट्रॅकरच्या आधारे ही माहिती जाहीर केली आहे. देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ही दिलासादायक बातमी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या तसेच मृत्यूदेखील वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशातील जवळपास २० राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत, तर इतर राज्यांमध्ये त्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. शाळा सुरू होत असल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण अत्यावश्यक असून याबाबत केंद्र सरकारने गुगल ट्रॅकरद्वारे माहिती शोधली. त्यातून देशातील एकूण ८० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर आली. या ८० टक्क्यांमध्ये बहुतेकजणांची एक लस झालेली आहे. सप्टेंबर महिना संपेपर्यंत देशातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची सूचनाही केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.

शिक्षकांच्या लसीकरणाला वेग
ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना तातडीने लस देण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. तर ज्या शिक्षकांना पहिला डोस देण्यात आला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यात यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शिक्षकाने किमान १ डोस घेतलेला असणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने राज्य सरकारना सांगितले आहे.

केंद्राचे लसीकरणासाठीे
नागरिकांना आवाहन

दरम्यान, आता भारत देशात गणेश चतुर्थी तसेच त्यानंतर दसरा व दिवाळी हे सण येणार आहेत. हे सण साजरे करण्याच्या मनःस्थितीत नागरिक आहेत. खरेदीसाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अजून दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नसून तिसर्‍या लाटेचे संकट समोर उभे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देताना जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.