देशातील लसीकरणाचा आलेख घसरला

0
74

>> उद्दिष्टाच्या तुलनेत निम्म्याहून कमी लसीकरण; दररोज सरासरी ६१ लाखांवरून ३४ लाखांवर घसरण

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने २१ जूनपासून लस धोरणात बदल केल्याने लसीकरण मोहीम गतिमान होण्याची आशा होती; मात्र धोरण बदलाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २१ जूनला सर्वाधिक लसीकरण झाल्यानंतर आता ही मोहीम थंडावली असून, लसीकरण आलेखाची घसरण सुरू आहे.

देशात २१ जूनपासून सर्वांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी देशात ८८ लाख नागरिकांचे लसीकरण झाले; परंतु पहिल्या आठवड्यातील लसीकरणाची गती पुढे राखता आली नाही. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर उत्तरोत्तर लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक असताना ते घटत गेल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या कोविन संकेतस्थळावरील माहितीतून निदर्शनास आले आहे.

६१ लाखांवरून ३४ लाखांवर घसरण
कोविन संकेतस्थळावरील माहितीनुसार १४ ते २० जून या आठवड्यात दररोज सरासरी ३३ लाख ९७ हजार लसमात्रा देण्यात येत होत्या. पुढच्या आठवड्यात हे प्रमाण वाढले. २१ ते २७ जून या आठवडाभरात दररोज सरासरी ६१ लाख १४ हजार लसमात्रा देण्यात आल्या; परंतु त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे २८ जून ते ४ जुलै दरम्यान दिल्या गेलेल्या लसमात्रांची दैनंदिन संख्या ४१ लाख ९२ हजार होती. त्यापुढील आठवड्यात लसीकरणाची गती आणखी मंदावली आणि ५ जुलै ते ११ जुलैच्या या कालावधीत प्रतिदिन ३४ लाख ३२ हजार लसमात्रा देण्यात आल्या.

काही राज्यांत संमिश्र स्थिती
लसीकरणाच्या वेगाबाबतीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत संमिश्र स्थिती आढळते. हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये २१ ते २७ जून या आठवड्यात लसीकरणाच्या दैनंदिन सरासरीत घट होत गेल्याचे दिसून आले आहे, तर केरळसह अंदमान-निकोबार, दादरा-नगर हवेली आणि जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांत मात्र लसीकरणाची दैनंदिन संख्या संमिश्र असल्याचे आढळते. आसाम आणि त्रिपुरामध्येही लसीकरणात घट झाली आहे.

काही राज्यांत लसींचा अपुरा पुरवठा
महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने तेथील लसीकरणाला वेग देण्याची गरज अधोरेखित झाली आहे; परंतु पुरेशा लसमात्रा नसल्याने त्या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प तरी आहे किंवा संथगतीने तरी सुरू आहे. गुजरातने मात्र आपल्याकडे पुरेशा मात्रा असल्याचे म्हटले आहे.

३७.०७ लाख नागरिकांना लाभ
देशात सोमवारी दिवसभरात ३७.०७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. डिसेंबरअखेपर्यंत १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी दररोज याच्या दुपटीहून अधिक लसीकरण होणे आवश्यक आहे.

आठवडानिहाय घसरण
आठवडा सरासरी लसीकरण
१४ ते २० जून – ३३ लाख ९७ हजार
२१ ते २७ जून – ६१ लाख १४ हजार
२८ जून ते ४ जुलै – ४१ लाख ९२ हजार
५ जुलै ते ११ जुलै – ३४ लाख ३२ हजार

१ कोटी ५४ लाख लसी शिल्लक
केंद्र सरकारने राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी वैद्यकीय संस्थांकडे शिल्लक असलेल्या लसमात्रांची माहिती जाहीर केली. त्यानुसार एक कोटी ५४ लाख लसमात्रा शिल्लक आहेत. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३८ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.