कोरोनामुळे देश चिंताजनक अवस्थेत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. त्यानुसार देशात आतापर्यंत ११७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०५६ लोकांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२५३३ इतकी झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर देशातील दिवसभरातील स्थिती आणि रुग्णांची संख्या याविषयी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज जाहीर केली जात आहे. त्यानुसार काल सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. आजपर्यंत एकाच दिवशी बरे होऊन घरी परतणार्या रुग्णांची ही सगळ्या मोठी संख्या आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या २७.५२ टक्के आहे.
लॉकडाऊनच्या काळात काही व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात वावरताना सुरक्षित अंतराचे भान न ठेवल्यास कोरोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला.