दृष्टीकोन महत्त्वाचा!

0
293

योगसाधना – ४८७
अंतरंग योग – ७२

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आजचा मानव- स्त्रीपुरुष मायेच्या मादक प्रभावामुळे गाढ निद्रेत आहेत. ते बेसावध आहेत. दुर्भाग्यवश त्यांनी आध्यात्मिक दृष्टिकोनाबद्दल ऐकण्यासाठी स्वतःच कान बंद केले आहेत. ते कुंभकर्णासारखे झाले आहेत. त्यांना या दयनीय स्थितीतून जागे करण्यासाठी हे सर्व उत्सव साजरे करायचे असतात.

विश्‍वात अनेक छोटे-मोठे देश आहेत. प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे. पुष्कळ वेळा विशिष्ट संदेश, तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोचवायचे असेल तर विविध पद्धती वापरल्या जातात… कथा- गोष्टी, कविता, लेख, नाटकं, सिनेमे… मग त्यांच्यावर आधारित उत्सव साजरे केले जातात.
भारतात या सर्व पद्धती आहेतच- सर्वांपर्यंत संस्कृती पोचवण्याची. त्यात एक प्रमुख पद्धत म्हणजे विविध उत्सव. शेवटी सृष्टिकर्ता – ज्याला अनेक व्यक्ती परमेश्‍वर मानतात, तो एकच असला तरी त्याची रूपे अनंत आहेत. नावे विविध आहेत. त्यामुळे सणदेखील पुष्कळ आहेत… वर्षभर चालणारे.
आपला भारत देश उत्सवप्रेमी आहे. आपण सर्वजण हे उत्सव कर्मकांडात्मक साजरे करतोच. पण त्यामागील तत्त्वज्ञान व आध्यात्मिक दृष्टिकोन समजला तर विविध फायदे आपोआपच होतात.

  • त्या विशिष्ट उत्सवाचे तत्त्वज्ञान समजले तर समजूतदार व्यक्ती स्वतःच्या व इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.
  • सर्व उत्सव एकत्र येऊन साजरे केले जातात. विविध स्तरांवर- कुटुंब, समाज, तालुका, गाव, देश, विश्‍व… तत्त्वज्ञान समजले तर त्यामागील भाव आपोआप वाढीस लागून समाजात सुखशांती येते, एकोपा वाढतो.
  • त्या त्या उत्सवातील आदर्श व्यक्तीचे विशिष्ट, वेगळे असे व्यक्तिमत्त्व समजले तर ज्यांना स्वतःचा जीवविकास साधायचा आहे त्या व्यक्ती त्यांचे आदर्श आपल्या जीवनात आणू शकतात. तसेच इतरांपर्यंत पोहोचू शकतात.
  • या सर्व आदर्श व्यक्तींची नीतिमत्ता उच्च स्तराची होती. ती जर अनेकांकडे पोचली, त्याप्रमाणे आचरण झाले तर समाजाचा विकास, उन्नती आपोआप होते.
    योगसाधनेमध्ये आपण हाच अभ्यास, विचार व चिंतन करीत आहोत. आचरणही अपेक्षित आहे. नाहीतर कुणालाही- व्यक्ती, कुटुंब, समाज, विश्‍व… कसलाही फायदा आध्यात्मिक पातळीवर होणार नाही.
    सध्या आपला विचार – विजयादशमी – दसरा या उत्सवावर चालू आहे.
    राजस्थानातील आबूपर्वतावर स्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय यांचा दिव्य दृष्टिकोन समजून घेऊया.
  • पुण्यभूमी भारतवर्ष परमपिता परमात्म्याची अवतरण भूमी आहे. इथेच कल्याणकारी परमात्म्याने मानवाला तमोप्रधान वृत्तीपासून सतोप्रधान बनवण्याचे दिव्य अलौकिक कार्य केले. त्या स्मृतीतच विविध उत्सव साजरे केले जातात.
  • अज्ञानामुळे आपण ईश्‍वरीय संदेश विसरून गेलो आहोत. फक्त रीतिरिवाज- या रूपाने उत्सव मनवतो. अनेकजण त्यांना सामाजिक मनोविनोदाचे साधनच मानतात. यामुळे क्षणोक्षणी आपले आध्यात्मिक पतन होत आहे. आध्यात्मिक जीवनपद्धती सोडून आपण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत आहोत. भौतिकतेकडे वेगाने वाटचाल करीत आहोत.
  • त्यामुळे अत्यावश्यक पायरी म्हणजे उत्सवामागील आध्यात्मिक संदेश आपण संपूर्ण समजून त्याप्रमाणे आचरण करणे अत्यावश्यक आहे.
    आजचा मानव- स्त्रीपुरुष मायेच्या मादक प्रभावामुळे गाढ निद्रेत आहेत. ते बेसावध आहेत. दुर्भाग्यवश त्यांनी आध्यात्मिक दृष्टिकोनाबद्दल ऐकण्यासाठी स्वतःच कान बंद केले आहेत. ते कुंभकर्णासारखे झाले आहेत. त्यांना या दयनीय स्थितीतून जागे करण्यासाठी हे सर्व उत्सव साजरे करायचे असतात.

विजयादशमी हे असुरत्वावर देवत्वाच्या विजयाचे महान प्रतीक आहे.
या दिवशी एक मुख्य सार्वजनिक सोहळा म्हणजे रावणाच्या पुतळ्याचे दहन करणे,. खरे म्हणजे आपण जिवंत व्यक्तीचा पुतळा जाळतो. पण इथे मेलेल्या शत्रूचा पुतळा जाळला जातो म्हणजे रावण अजूनही मेलेला नाही. तो जिवंतच आहे.
‘रावण’ म्हणजे दुसर्‍यांना रडवणारा. दहा डोक्यांचा कुणी जिवंत माणूस असूच शकत नाही. म्हणून त्याचा गर्भितार्थ समजायला हवा. दहा डोकी म्हणजे दहा * विकार – काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार – पाच
ईर्ष्या. द्वेष, छळ. हठ, आलस्य – पाच.
पुरुषाचे व स्त्रीचे पाच+पाच म्हणजे दहा.
रावणाची दुष्ट हस्तक माया जी सर्वांना रडवते, ती दहा दिशांनी पसरली आहे.

  • पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण, उत्तरपूर्व, उत्तर पश्‍चिम, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्‍चिम, वर आणि खाली.
    तसेच दशमुखी रावण म्हणजे जो काळ – स्थळ- वेळ- परिस्थिती बघून स्वतःच्या स्वार्थापोटी आपले भाषण बदलतो. सकाळी एक बोलेल तर संध्याकाळी उलटेच बोलेल. आज एक म्हणेल तर उद्या भलतेच. म्हणजे काही राजकारणी असे दशमुखी असतात. त्यांच्यावर विश्‍वास ठेवणे फारच कठीण असते. आज सर्व दिशांनी असलेले नर-नारी, जीवप्राणी रावणाच्या मायेच्या या प्रभावात येऊन हीन कर्मं करताहेत. या माणसांत रावणाबरोबर विविध राक्षसांची नावे आहे- कुंभकर्ण ः गाढ निद्रेचे प्रतीक. त्यामुळे त्याची चेतना बधिर झालेली म्हणून ऐकायला येत नव्हते. त्याला उठवण्यासाठी ढोल-नगारे मोठ्याने वाजवावे लागत असत.
  • मेघनाद ः मेघांच्या गर्जनेसारखा सर्वांना भयभीत करणारा.
  • खर – याचा स्वभाव म्हणजे कठोरता, कटुत्व, क्रूरता, रूक्षता.
  • दूषण – दोषारोपण करणारा.
  • मारीच – मिथ्याचारी, धोका देणारा.
  • महोदर – मत्सररूपी दुष्ट
  • देवांतक – क्रोधरूपी, महापापी.
    ‘रामचरितमानस’मध्ये संत तुलसीदास रामरावण युद्धात मायावी रावणाचा वध करण्यासाठी आध्यात्मिक रथाची आवश्यकता वर्णन करतात. तेसुद्धा रावणादी असुरांना विकारांचे प्रतीक मानतात.
    इथे रामसुद्धा भगवान विष्णूचा अवतार- पवित्र प्रवृत्ती मार्गाचे प्रतीक मानतात.
  • श्रीविष्णू म्हणजे श्रीलक्ष्मी व श्रीनारायणाचे संयुक्त रूपच आहे.
  • ‘चतुर्भुज’ विष्णूचे चार हात म्हणजे श्रीलक्ष्मी व श्रीनारायणाच्या दोन-दोन हातांचे प्रतीक आहे.
    विकारांना दूर करून सुखी संसार करण्यासाठी पतीपत्नीचा हातभार कसा आवश्यक आहे हे समजते. दसर्‍याच्या निमित्ताने पतीपत्नीचे पाच-पाच मिळून दहा विकारांचा नाश हेसुद्धा अभिप्रेत आहे.

रावणाला ‘दशानन’ म्हणतात. एक अर्थ म्हणजे मायेची दहा मुखं. प्रजापिता यावर पुढे चिंतन करताना सांगतात –

  • ‘दशानन’चा अर्थ समजण्यासाठी आपण ‘पंचानन’चा अर्थ बघायला हवा.
  • सिंहाला ‘पंचानन’ म्हणतात. त्याला पाच मुखं नसतात. पण ते बळाचे प्रतीक आहे. फार बलिष्ठ आहे. त्यामुळे तो जंगलाचा राजा होण्यास योग्य ठरतो.
  • ‘विद्येचा पंचानन’ – जो विद्या व कलेत निपुण असतो. त्याला विद्येचा पंचानन म्हणतात.
  • ‘तर्क पंचानन’ – तर्क करण्यात कुशल आहे तो.
  • शंकरालासुद्धा पंचानन म्हणून संबोधतात.
    रावणाच्या संदर्भात म्हणता येते की माया अत्यंत बलवान आहे. ती रावणाची हस्तक आहे. तिच्यावर म्हणजे पर्यायाने रावणावर (रावण वृत्ती) विजय प्राप्त करणे फार कठीण होते. त्यासाठी शीलरुपी व विष्णुरूपी शक्तीची अत्यंत आवश्यकता आहे.
    प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाचे अनुयायी प्रातःकाळी (अमृतवेळ/ ब्राह्ममुहूर्त) ध्यान करून शिवपरमात्माकडून सर्व शक्ती मिळवतात. त्यावेळी व सबंध दिवस ते स्वतःला ‘मास्टर शक्तिमान’ मानायला सांगतात. तसेच आत्म्याचे सप्तगुण (सात पवित्र गुण) आहेत त्यांवर ध्यान ठेवून त्याप्रमाणे धारणा करण्याचे सुचवतात. हे सात गुण म्हणजे –
  • ज्ञान, * पवित्रता, * प्रेम, * शांती, * आनंद, * खुशी, * शक्ती.
    हे गुण स्वतःमध्ये तसेच इतर सर्व आत्म्यांमध्ये पाहायचे असतात.
    आपले योगसाधक तर याच मार्गावर अनेक वर्षांपासून मार्गक्रमण करीत आहेत.
    ( संदर्भ ः भारत के त्यौहार – प्रजापिता विश्‍वविद्यालयाचे पुस्तक)