>> यंदाच्या हंगामास प्रारंभ; पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांची भेट
गोव्याच्या किनाऱ्यांबरोबरच देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ पाडतो तो दूधसागर धबधबा. या धबधब्याचे विहंगम दृश्य प्रत्यक्ष नजरेत सामावण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात; मात्र गेले काही महिने या धबधब्यावर पर्यटकांसाठी प्रवेश निषिद्ध होता. आता कालपासून हा धबधबा पर्यटक आणि नागरिकांसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांनी जीपगाड्यांतून धबधब्याच्या ठिकाणी पोहोचत त्याचे दृश्य डोळ्यात सामावले.
कुळे येथील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीप गाड्याच्या हंगामाला स्थानिक आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. दूधसागरावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांशी जीपगाड्याच्या चालकांनी आणि व्यापाऱ्यांनी चांगले वर्तन करावे. तसेच, पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध द्याव्यात, असे आवाहन आमदार डॉ. गावकर यांनी केले.
जीपचालकांनी प्रत्येक पर्यटकांची काळजी घेण्याची गरज आहे. पर्यटकांना चांगली वागणूक दिल्यास भविष्यात दूधसागरावरील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. वन खात्याच्या नियमांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, असेही गावकर यांनी सांगितले.
दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपगाड्यांच्या भाड्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भाडेवाढीच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे, असेही गावकर यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी किती पर्यटकांनी दिली भेट?
पहिल्या दिवशी सुमारे 385 पर्यटकांनी दुधसागर पर्यटनाचा आनंद लुटला. तर, स्थानिक 55 जीप व्यावसायिकांना दुधसागरवर जीपगाड्या नेण्याची संधी मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.