दुहेरी क्रमांकपट्टीच्या वाहनामुळे खळबळ

0
13

>> कर्नाटकसह गोव्यात वाहनाची नोंदणी; क्रमांकपट्टीचे छायाचित्र व्हायरल

पणजी शहरात वाहतूक करणार्‍या एका दुहेरी क्रमांकपट्टी असलेल्या एका वाहनाचे छायाचित्र सोशल मीडियावर काल व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले. तथापि, वाहतूक पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर वाहन कर्नाटकातून गोव्यात रितसर हस्तांतरित केल्याचे आढळून आले. असे असले तरी सदर वाहनावर दोन क्रमांकपट्‌ट्या असल्याचे आढळून आले. कर्नाटक राज्यात नोंदणी असल्याच्या क्रमांकपट्टीवरच गोवा राज्यात नोंदणीची क्रमांकपट्टी लावण्यात आली होती; मात्र ती खाली सरकल्याने दोन क्रमांकपट्‌ट्या दिसून येत होत्या. वाहतूक पोलिसांनी सदर वाहनाच्या चालकाला नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्याची प्रक्रिया सुरू केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पणजी शहरात गोवा आणि कर्नाटक अशी दुहेरी क्रमांकपट्टी असलेले वाहन फिरत असल्याचे छायाचित्र काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर वाहतूक पोलीस विभागाने सदर वाहनाच्या मालकाला पणजी वाहतूक विभागात कार्यालयात बोलावून घेतले. त्याच्याकडून वाहनाबाबत कागदपत्रे घेऊन तपासणी केली. सदर कागदपत्रे वैध असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर पोलीस स्थानकावर सदर वाहन आणून तपासणी करण्यात आली. सदर वाहन कर्नाटकातून मे २०२२ मध्ये गोव्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. सदर वाहनाला हल्लीच झालेल्या एका अपघातामुळे गोवा राज्यात नोंदणी केल्याची क्रमांकपट्टी खाली लटकत होती, तर त्यामागील कर्नाटक राज्यात वाहन नोंदणी केल्याची क्रमांकपट्टी देखील दिसत होती. या क्रमांकपट्टीची तात्काळ दुरुस्ती केली जाईल, असे वाहनमालकाने पोलिसांना सांगितले.