दुवा माणसा- माणसामधला…

0
386
  • अनुराधा गानू

 

माणसांना जोडून ठेवणार्‍या जोडाला दुवा म्हणतात. पण हा दुवा जर निखळला तर नाती नुसती संपूनच जात नाहीत तर तुटून पडतात. वस्तूंना दुसरा जोड मिळू शकतो पण माणसांना दुसरा दुवा मिळत नाही आणि मग नाती कायमची तुटतात.

 

दुवा म्हणजे ‘दुवा’ मागणे यातला दुवा नव्हे किंवा एखाद्याला मदत केल्यावर तो आपल्याला ‘दुवा’ देतो तो दुवाही नव्हे! इथे मला अपेक्षित असलेला दुवा म्हणजे एकमेकांना जोडून ठेवणारा जोड म्हणजे दुवा. या दुव्यामुळे माणसं एकमेकांना जोडली जातात. हा दुवा जर निखळला तर नाती संपूनच जातील. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये माणसं आपोआपच एकमेकाला़ जोडलेली असायची. लहानपणापासून म्हणजे जन्मापासूनच म्हणा ना, एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या आधाराने वाढलेली असायची. पण आता परिस्थिती बदलली. एका घराची दोन-तीन घरे झाली.  आणि या प्रत्येक घरातील माणसांना कोणतातरी दुवा असण्याची गरज भासू लागली.

नुकतेच एक जुने ओळखीचे गृहस्थ भेटले होते. मूळचे गोव्याचे नाहीत पण ५० वर्षांपूर्वी कामानिमित्त गोव्यात आले आणि इथेच स्थायिक झाले.  मी गप्पा मारता मारता विचारले, ‘‘गावाकडे घरी कधी गेला होतात? कसे आहेत सगळे? तुमची शेती, बागायती वगैरे आहे ना अजून गावाकडे?’’ तर म्हणाले, ‘‘हो, शेती- घर वगैरे सगळं आहे. शेती सगळी भाऊ बघतो त्यामुळे त्या शेतातलं मला काही मिळेल ही अपेक्षाच मी कधी केली नाही. घर आहे, भाऊ राहतात. पण मला आणि भावांना किंवा मला आणि घराला जोडून ठेवणारा दुवा मात्र नाही. मग मी काय करू घरी जाऊन?  आईवडील होते तोपर्यंत जातही होतो सणासुदीला. तेव्हा आमची वाट पाहणारे कोणीतरी होते. छान होतं सगळं. अपूर्वाई होती. मग वडील गेले आणि नंतर आईपण गेली. हे दोन दुवे निखळल्यानंतर आता भाऊ भाऊ कोणीही कोणाला विचारत नाहीत. बोलवतही नाहीत’’, असं म्हणून तो विषय तेवढ्यावरच संपला.

वाटलं घर, नाती, माणसं जोडून ठेवायला फेविकॉलसारखा एक अजोड जोड म्हणजे दुवा असावा लागतो. मग तो भावाभावामधला असेल, बहीणभावातला असेल किंवा मामा-मामी, काका-काकू, मावशी-आत्या-सगळी भावंडं यांच्यामधला असेल किंवा शेजार्‍या- शेजार्‍यामधला असेल. दुवा हा माणसाच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा भाग. विशेषकरून घरातील आईसारखी व्यक्ती हा फार मोठा दुवा असतो. ही सगळी माणसं सगळी नाती जोडून ठेवण्यासाठी.

पूर्वी माझी मावशी होती आणि आई होती, तेव्हा आमची एकमेकांच्या घरी खूप ये- जा असायची. पूर्वी सुट्टीत मावशीकडे जायचं म्हणजे कोण आनंद असायचा… आम्हाला आणि मावशीच्या मुलांनाही. कारण आमच्या दोन घरांना जोडून ठेवणारी माझी आई होती. आमच्या दोन घरातल्या नात्यांना जोडणारा दुवा – आई गेली आणि आमच्या दोन घरातलं जाणं-येणं कमी झालं.  प्रत्येक जण आपापल्या संसारात, आपापल्या व्यापात दंग. मग उगाचच कोण जाणार कुणाकडे. कधीतरी काही प्रसंगानिमित्त भेटीगाठी होतात तेव्हढ्याच!

पूर्वी कोकणातल्या घरात आजी होती, मामा-मामी होते. सुट्टीत मग नातवंडं जमायची. मामीलाही आपल्या भाचेमंडळींचं कौतुक होतं. आपल्या नणदांचंही मामी अगदी अपूर्वाईनं करायची. काही चुकलं, मस्ती केली की आजी आणि मामी रागवायच्यासुद्धा. पण त्यांचा राग येत नसे. कारण आजी आणि मामी आमच्याच तर होत्या. नंतर मग आजी गेली. मामी गेली. मामाची पुढची पिढी आली आणि आमचं हक्कानं कोकणात जायचं कमी झालं. म्हणजे जवळजवळ बंदच झालं. आजी आणि मामी हे दोन दुवे होते आमच्या नात्यांना जोडून ठेवणारे.

तसंच बहुतेक कुटुंबातून होत असतं. जन्मापासून एकमेकांबरोबर वाढलेली, एकमेकांचा आधार असलेली, एकमेकांना सांभाळणारी, एकमेकांचं कौतुक करणारी भावंडं एकमेकांसाठीच असतात. कारण आई-वडील हा त्यांच्यामधील दुवा असतो. किंबहुना एकटी आईसुद्धा या नात्यांना बांधून ठेवत असते. पण हा दुवा जेव्हा निखळतो तेव्हा मग हीच सख्खी भावंडं एकमेकांपासून दुरावतात. अगदी एका गावात असली तरी नातेसंबंध जेवढ्यास तेवढेच उरतात. काही कार्यक्रम असला तरच एकमेकांच्या घरी जाणं होतं. नाहीतर महिनें-महिने सरतात पण एकमेकांकडे जाण-येणं होत नाही. भावाभावांना एकमेकांच्या घरी जायला किंवा बहिणीला भावाच्या घरी जायला कारणं शोधावी लागतात. कारण या सगळ्या मुलांना जोडून ठेवणारा दुवा ‘आई’ नसते.

तसंच काहीसं शेजार्‍या-शेजार्‍यामध्येही होतं. त्या त्या घरातल्या कर्त्या स्त्रिया जेव्हा असतात तेव्हा ते सख्खे शेजारी असतात. कोणती मुलं कुणाच्या घरातली हेसुद्धा कळतच नाही. जरा काही झालं की एकमेकांसाठी धावून जाणार. कोणी कुठेही जाणार, हक्कानं मागणार, हक्कानं खाणार, कोणाच्याही मुलाचं चुकलं तर हक्कानं धपाटासुद्धा मिळणार. शेजारच्या घरातील मुलांच्या किंवा कोणाच्याही आवडीचा पदार्थ केला की त्यांच्यासाठी राखून ठेवला जाणार पण त्या दोन्ही घरातल्या कर्त्या स्त्रिया नसल्या की आठवणी मात्रा राहतात पण सख्खेपणा राहात नाही. कारण त्या दोन घरांना, त्या दोन शेजार्‍यांना जोडणारे दुवे निखळलेले असतात.

अर्थात कोणाचं काही चुकतंय, असं मुळीच नाही. पण आहे हे असंच आहे एवढं मात्रा खरं. दोन तुकड्यांना जोडून ठेवतो तो जोड. हा जोड जर कमकुवत झाला किंवा तुटला तर वस्तूचे तुकडेच होतात. तसंच माणसांना जोडून ठेवणार्‍या जोडाला दुवा म्हणतात. पण हा दुवा जर निखळला तर नाती नुसती संपूनच जात नाहीत तर तुटून पडतात. वस्तूंना दुसरा जोड मिळू शकतो पण माणसांना दुसरा दुवा मिळत नाही आणि मग नाती कायमची तुटतात.