दुर्दैवी दुर्घटना

0
128

कारवारजवळच्या नागरमाडी धबधब्यामध्ये सहा गोमंतकीय पर्यटकांचा पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली हे कन्नड वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या प्रत्यक्ष व्हिडिओतून समोर आले आहे. गुडघ्याएवढ्याच पाण्यात मौजमस्ती करीत हा पर्यटकांचा गट उभा असताना अचानक प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा आला आणि एकमेकांना घट्ट धरून बाहेर कसे पडावे या चिंतेत असलेल्या या पर्यटकांचा घास घेऊन गेला. धबधबे आणि समुद्रकिनारे हे जणू मृत्यूचे जबडे बनलेले आहेत. समुद्रकिनार्‍यांवर किमान जीवरक्षक तरी असतात, परंतु रानावनांतल्या या धबधब्यांवर मदतीला धावून येण्यासाठी ना कोणी असते, ना कोणती सुरक्षात्मक उपकरणे जवळ असतात. नागरमाडीसारख्या अनवट ठिकाणच्या धबधब्यावर तर अशा प्रकारची मदत मिळणे दुरापास्तच होते. हा धबधबा फारसा प्रसिद्ध नाही. एका प्रचंड खडकाखालून तेथे धबधब्याचा प्रवाह वाहून येतो. परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना मोठी गर्दी नसलेल्या अशा अप्रचलित ठिकाणी जावेसे वाटणे स्वाभाविक आहे. पण निसर्ग हा जेवढा विलोभनीय असतो, तेवढाच तो भीतीदायकही ठरू शकतो. पर्यटक म्हणून अशा ठिकाणी जात असताना हे भान सदैव जागे हवे हेच ही दुर्घटना सुचवते आहे. गोव्यात येणार्‍या पर्यटकांना येथील समुद्र वेड लावतो. क्षितिजापर्यंत पसरलेले निळेशार पाणी पाहून ते हरखून जातात, परंतु ह्या निरुपद्रवी वाटणार्‍या लाटांची ताकद काय असू शकते याची जाणीव नसलेले पर्यटक पुढे पुढे जातात आणि शेवटी घात होतो. अनेकजण तर दारूच्या वा मौजमस्तीच्या नशेत असतात आणि आपला जीव गमावून बसतात. समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक तैनात केल्यापासून अशा अतिशहाण्या पर्यटकांना पुन्हा किनार्‍यावर आणण्याचे काम ते अखंड करीत असल्याने दुर्घटना कमी झालेल्या आहेत, परंतु थांबलेल्या मात्र नाहीत. धबधब्यांवर मात्र अशा प्रकारची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तेथे जाणार्‍या पर्यटकांनी किमान स्वतःच्या जिवाची काळजी स्वतःच घेणे अभिप्रेत असते. परंतु अलीकडे धबधबे हे मद्यपींचे दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे अड्डे बनलेले आहेत. मद्यपान करून धबधब्यांवर थैमान घालायचे, बाटल्या फोडायच्या हे प्रकार वाढल्याने अलीकडे कौटुंबिक पर्यटकांना धबधब्यांवर जाणे नकोसे वाटू लागलेले आहे. आंबोलीत अलीकडेच दोघा मद्यधुंद तरुणांनी दरीच्या टोकावर जाण्याचे भलते साहस केल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. गोवा आणि आजूबाजूच्या परिसरांतील धबधब्यांवर छेडछाडीचे, मारामारीचे प्रकार अधूनमधून घडत असतात. नागरमाडीच्या धबधब्यावरही पावसाळ्यात स्थानिक नागरिक फारसे जात नाहीत, कारण तेथे धोका आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा तेथे पन्नास – पंचावन्न तरूण तरूणी होते, परंतु हा गट मुख्यत्वे गोव्याच्या विविध भागांतून आलेला होता. त्यामुळे त्यांना त्या परिसरातील धोक्यांची जाणीव नसावी. यापूर्वीही दोन गोमंतकीयांसह अनेकांचा येथे बळी गेलेला आहे. उन्हाळ्यात शांत, सौम्य वाटणारे धबधबे पावसाळ्यात रौद्र आणि कधी कधी अतिरौद्र रूप धारण करतात हे लक्षात घेतले जात नाही. कोणताही धबधबा म्हणजे शेवटी नदीचा प्रवाह असतो. ती वरून कुठून तरी दूरवरून रानावनांतून वाहत आलेली असते. धबधब्याच्या परिसरात पाऊस जरी नसला तरी माथ्यावर दूरच्या परिसरात अतिवृष्टी वा ढगफुटी झालेली असल्यास पाण्याचे प्रमाण एकाएकी प्रचंड वाढते आणि साहजिकच धबधब्यावरून हे पाणी रोंरावत खाली धाव घेते. ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दक्षिणेतील अनेक धबधब्यांवर बाहुबलीप्रमाणे चढून जाण्याचे फॅड आले. एखादा माणूस स्वतःला कितीही बाहुबली समजत असला तरी पाण्याच्या असल्या रूद्रभीषण प्रवाहात टिकून उरणे त्याच्या हाती नसते. त्यामुळे असे अनेक ‘बाहुबली’ बाहुलीप्रमाणे वाहून गेले. त्यामुळे धबधब्यांसारख्या ठिकाणी तेथील वातावरण कितीही आल्हाददायक जरी वाटले, तरी स्वतःच्या जिवाची काळजी घेणे, कोठे धोका संभवतो याचा विचार करूनच पाण्यात पाय टाकणे हे शेवटी पर्यटकावर अवलंबून असते. स्थानिक माणसांचा सल्ला अशा वेळी महत्त्वाचा ठरत असतो, परंतु अनेकदा तो धुडकावण्याकडे पर्यटकांची प्रवृत्ती असते. त्यातून अशा दुर्घटना घडतात. त्यापासून धडा मात्र घेतला जात नाही! किमान यापुढे गोव्यातील धबधब्यांवर तरी अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी स्थानिक तरूणांच्या समित्या स्थापन करून त्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा विचार सरकारने करायला हरकत नाही. यातून त्या भागातील युवकांना रोजगारही मिळेल आणि निष्पाप पर्यटकांचे हकनाक जाणारे जीवही वाचतील!