दुबईची राजकन्या गोव्यात येणार होती, पण…

0
155

>> तीन वर्षांनी उलगडला पलायनाचा थरार

दुबईची राजकन्या आपल्या पित्यापासून सुटका करून घेण्यासाठी कार, डिंगी, जेट स्की अशा नानाविध साधनांची मदत घेऊन दुबईहून पळाली खरी, परंतु मार्च २०१८ मध्ये गोव्याच्या वाटेवर असतानाच तिला अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाने व एका विशेष कमांडो पथकाने रोखले आणि परत पाठवले..! एखाद्या थरारक चित्रपटातच शोभेल अशी ही कहाणी तीन वर्षांपूर्वी घडली, परंतु त्या पलायनाच्या असफल प्रयत्नाचा सगळा थरार आता उघड झाला आहे.
दुबईचे सत्ताधीश शेख महंमद बिन राशीद अल मख्तुम यांनी आपल्या शेख लतिफा या कन्येला ब्रिटनमधून पळवून नेऊन अमानवी वागणूक दिल्याचा ठपका आता ब्रिटीश न्यायालयाने ठेवला आहे.
दुबईहून पलायनाचा बेत लतिफाने अत्यंत काळजीपूर्वक आखला. त्यासाठी आपल्या मैत्रिणीला त्यात समील करून घेतले. सर्व प्रकारची जय्यत तयारी केली आणि एक दिवस दुबईतून ती आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन शिताफीने निसटली. टीना जौहिनेन ही मैत्रीणही यावेळी तिच्यासोबत होती. कारने त्या दोघी सहा तास प्रवास करून थेट मस्कतच्या समुद्रकिनार्‍यावर आल्या. तेथे त्यांनी डिंगी म्हणजे शिडाची नौका मिळवली आणि जेट स्कीतून समुद्रात तिच्यासाठी उभ्या असलेल्या जहाजापर्यंत त्या दोघी पोहोचल्या. समुद्रमार्गे पलायनाचा हा बेत जवळजवळ यशस्वी ठरलाच होता, परंतु गोव्यात येऊन येथून अमेरिकेला राजनैतिक आश्रय घेण्यासाठी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या राजकन्येला गोव्याजवळच्या अरबी समुद्रात तटरक्षक दलाने रोखले आणि हा बेत फसला.

‘‘ती ओरडत होती, स्वतःची सुटका करून घेऊ पाहात होती, राजाश्रय मागत होती, परंतु तिच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून तिला बोटीवरून खेचून घेण्यात आले व परत पाठवण्यात आले’’ अशी माहिती त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या जौहिनेनने लंडनमध्ये पत्रकारांना सांगितले.

दुबईच्या राजाने आपल्या शमसा नामक मुलीला इंग्लंडमधून दोन दशकांआधी पळवून नेले होते आणि लतिफा या राजकन्येला देखील अशाच प्रकारे पळवण्यात आले असा निवाडा ब्रिटीश न्यायालयाने नुकताच दिला आहे. जौहिनेनने त्या खटल्यात स्वतः साक्ष दिली आहे.
जौहिनेन ही फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे. मार्शल आर्ट शिकवण्यासाठी तिची लतिफाशी २०१० मध्ये भेट झाली. आठवड्यातून पाच वेळा ती तिला शिकवायची. बघता बघता दोघीही जिवलग मैत्रिणी बनल्या. लतिफाने पित्याच्या जाचाला कंटाळून २००२ मध्येही दुबईहून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल तिला साडे तीन वर्षे तुरुंगवास सोसावा लागला होता.

आपली बहीण शमसा आणि आपण कसे पळून गेलो होतो व पकडले गेल्यानंतर आपल्याला तुुरुंगवास कसा सोसावा लागला त्याची माहिती लतिफाने आपल्याला दिली असे जौहिनेनने सांगितले.
लतिफाला दुबईबाहेर पळायचे होते, परंतु आपण पुन्हा पकडले जाऊ याची तिला भीती होती. तिच्यापाशी पासपोर्टही नव्हता. २०१७ च्या उन्हाळ्यात तिला ‘एस्केप फ्रॉम दुबई’ हे पुस्तक वाचायला मिळाले. माजी फ्रेंच नौदल अधिकारी आणि गुप्तचर हर्व जॉबर्ट याचे हे पुस्तक वाचून तिच्या मनात पलायनाचा बेत पुन्हा आला. त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जौहिनेन स्वतः फिलीपीन्सला जाऊन जॉबर्टला भेटली. तिघांनी मिळून तिच्या सुटकेचा बेत आखला.
२४ फेब्रुवारी २०१८ रोजी लतिफाला तिच्या कार चालकाने दुबई डाऊनटाऊनमधील तिच्या नेहमीच्या रेस्तरॉंमध्ये नाश्त्यासाठी जौहिनेनशी भेट व्हायची तिथे सोडले. बाथरुममध्ये जाऊन तिने कपडे बदलले. मोबाईल तिथेच टाकला आणि दोघीही दुबईहून कारने सहा तास प्रवास करून ओमानमार्गे मस्कतपर्यंत पोहोचल्या. मस्कतला जौहिनेनच्या एका मित्राने त्यांना शिडाची नौका मिळवून दिली. वादळी हवामानात खवळलेल्या समुद्रात पोहोचताच त्यांनी जेट स्की घेऊन अमेरिकेचा झेंडा लावलेल्या नोस्ट्रोमो ह्या जहाजावर प्रवेश मिळवला.
हे जहाज गोव्याला निघाले होते. गोव्याहून अमेरिकेत जाऊन राजाश्रय मिळवण्याचा तिचा बेत होता, परंतु ४ मार्चला भारत व संयुक्त अरब अमिरातीच्या विशेष कमांडो पथकाने त्यांना अरबी समुद्रात रोखले. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी त्यांच्या जहाजाला वेढले. हेलिकॉप्टर, विमाने वर घिरट्या घालू लागली असे जौहानेनने त्या प्रसंगाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले. लतिफाला व इतरांना पकडून थेट संयुक्त अरब अमिरातीत नेण्यात आले. जॉबर्ट हा स्वतः या जहाजाचा कप्तान बनला होता व तोही या कारवाईचा साक्षीदार होता. लतिफाला एका एमिराती अधिकार्‍याने ताब्यात घेतल्याचे त्याने सांगितले. आपल्यालाही पाऊण तास मारहाण झाली असे त्याने सांगितले. जौहिनेनलाही दुबईला नेण्यात आले व ती विदेशी नागरिक असल्याने तीन आठवड्यानंतर सोडून देण्यात आले.
पलायनाचा हा प्रयत्न करण्याच्या दोन आठवडे आध लतिफाने एक पाऊण तासांचा व्हिडिओ बनवून दुबईबाहेरील मित्रांना पाठवला होता. त्या व्हिडिओत तिने आपल्या पित्यावर अनेक आरोप केले आहेत.