दिवा

0
233
  • पौर्णिमा केरकर

अंधारातून उजेडाकडे, विकारातून विवेकाकडे असा त्याचा प्रवास जगण्याची मोठी प्रेरणा आहे. ती प्रेरणा… ती आत्मनुभूती… तो आत्मप्रकाश… तो अंतरीचा ज्ञानदीवा जेव्हा कोणत्या क्षणी प्रकाशमान होतो… स्वतः प्रकाशित होतो, तेव्हा सहवासातील सर्वांनाच उजळून टाकतो…

दिवा… या शब्दाचा नुसता उच्चार केला तरी तनामनाला ऊब प्राप्त होते. दिवाळीत दिव्यांचा उत्सव ही कल्पनाच किती रम्य आणि आल्हाददायकता प्रदान करणारी आहे, हे या दीपोत्सवात अनुभवता येतं. ‘साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा’ असं म्हटलं गेलंय. आणि ते खरंही आहे. घराचे लावण्य हे त्या-त्या घरात येणार्‍या माणसांचे आदरातिथ्य कशा प्रकारे केले जाते यावर अवलंबून असते. घराला माणसं मानवतात की नाही हे या आदरातिथ्याच्या माध्यमातून जाणून घेता येतं. हृदयमंदिरात जर मानवतेचा दीप अखंडित तेजाळत राहिला तरच हे शक्य होते.

माझ्या लहानपणी आमच्या घराच्या मागे मुस्लिम बांधवांचे पिराचे थडगे होते. घराच्या बाजूला सोडाच, वाड्यावरही मुस्लिम बांधवांची वस्ती नव्हती. मिर्झल वाडा, बावाखान वाडा यांसारखी वाड्यांची नावे असली तरी तिथेही मुस्लिम वस्ती नजरेत भरावी एवढी नव्हतीच. या नावावरून कोणे एके काळी ही माणसे इथे नांदत होती; नुसती नांदतच होती असं नाही तर गुण्यागोविंदाने राहात होती, याचीच प्रचिती येते. आज शेकडो वर्षे झाली तरीही या स्मृती या नावांवरून जाग्या होतात. एवढेच नाही तर पिराच्या थडग्यावर न चुकता तिन्हीसांजेला पणती तेवत ठेवायची हा तर वाड्याच्या परंपरेचा अविभाज्य भागच बनून राहिला होता, आणि आहेही! आई सांगायची, दिवा लाव! आम्ही लावायचो! ते मुसलमानांचे थडगे, आम्ही कशाला दिवा पेटवायचा? हा विचारही कधी मनात आला नाही, आजही तो कोणी करीत नाही.

हा सर्वधर्मसमभावाचा दिवा परंपरेने आणि घराच्या संस्काराने प्रदीप्त झालेला होता… तो अखंडित तेवता राहिला म्हणून रोजचीच विचारांची दिवाळी साजरी करता आली, जी थकल्याभागल्या जीवाला ऊर्जा पुरविते, आयुष्य नव्याने जगण्याची प्रेरणा देते. घराच्या शेजारीच मराठी प्राथमिक शाळा आहे, आणि त्या शाळेच्या मागच्या बाजूला संपूर्ण वाड्याची स्मशानभूमी असून त्याच परिसरात एखाद्या जुन्याजाणत्या व्यक्तीसारखा वड स्थितप्रज्ञ स्थितीत कित्येक शतकांपासून उभा आहे. स्मशानभूमीत प्रेत नेताना त्या वडाखालूनच ते न्यावे लागते. तिन्हीसांजेला तर किर्रर्र काळोख भीतीची लहर अंगअंगात पसरवतो. अशा वेळीसुध्दा त्याच्या मुळात वाड्यावरील प्रत्येक घरांची पणती तेवतीच राहिली. माझ्या लहानपणी तिथं दगडात कोरून ठेवलेली दगडाची पणती होती. ती काजळीने दाटून दाटून पुरून गेली. त्या जागेवर पुढे मातीची पणती आली… वड विस्तारत गेला, पणती तेवत राहिली… लोकमानसांनी आपल्या जगण्यात या पणतीच्या तेवत्या ज्योतीची स्निग्धता अनुभवली. ती स्नेहाळ ऊब संकटात, समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मनाला जगण्याचे वास्तव दाखवायची. दिवाळीची पणती मला अशी ठिकठिकाणी भेटत राहिली. ‘ती पणती असली तरीही दिवा लाव, दिवेलगाण’ असेच संबोधन ओठांवर रुळलेले होते. आश्विन कार्तिकात आकाशात नक्षत्रोत्सव सुरू असतो तर धरित्रीवर कातयोंचा उत्सव महिला मुलींच्या सोबतीने सुर्ला, उदळशे, ओकामे सारख्या गांवानी जपून ठेवलेला आहे. तुळसी विवाहाच्या आगेमागे जणू काही आकाशातील नक्षत्रे अंगणात अवतीर्ण होतात आणि निराशलेल्या मनाला नवचेतना बहाल करतात! याच दिवसांत सत्तरीतील सुर्ला, कर्नाटकातील आमटे गावात गीती गायन केले जाते. रात्रीची चांदणी
शांततेत… सर्व कामधाम आटोपून रिकापणाला सोबतीला घेऊन पाच-सात घरातील बायका एकत्रित एखादीच्या अंगणात घोळक्याने जमा होतात… आणि मग रात्र जगविणारे, नक्षत्रांना आवाहन करणारे गायन समरसतेने केले जाते. आमटे सुर्ला गावातील या मंतरलेल्या रात्रीची मी साक्षीदार होते. दोन दशकांचा कालावधी लोटला आहे, पण त्या रात्री नाही विसरता येत! आमटे गावात तर तोपर्यंत वीजही पोहोचली नव्हती. अज्ञान, दारिद्य्र, मूलभूत शिक्षण, जीवनावश्यक वस्तू या सगळ्यांचीच या गावाला वानवा होती. मात्र निसर्गाचा वरदहस्त आणि लोकमनाचे निरागसपण अनुभवताना मनाची श्रीमंती ठायी ठायी दिसत होती. पारंपरिक गीती गायनाची ते दिवस असले तरी ती वेळ मात्र नव्हती. मिट्ट काळोखात गाव ओळखताच येत नव्हता. आम्ही तर गावाला अनोळखीच होतो. दायच्या रूपातील ओळखीचा दुवा सोबतीला घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो. संध्याकाळची साडेसातची वेळ. रस्त्यावर तर कोणीही चिटपाखरू नव्हते.. सगळी घरे एकसारखीच… चिडीचूप काळोखात उभी. येणार्‍या-जाणार्‍यांची तरी ही घरे जाग घेत असावीत का? हीच शंका मनात होती. दरवाजे बंद… छोट्याशा खिडकीतून आत डोकावले तरी काळोखाशिवाय काहीच दिसत नव्हते. इतक्या लांबून येऊन जर हाती काहीच गवसले नाही तर ही शंका मनाला स्पर्शून गेली. शंका मनात आली खरी; दुसर्‍याच क्षणी घराघरांतील खिडकीत दरवाजाच्या फटीतून लकाकणारे डोळे दिसू लागले. इतका वेळ मला चांदणे दिसलेच नव्हते. आता तर चक्क दरवाजे, खिडक्यांमधून लहानांपासून थोरांपर्यंतच्या नयनज्योती दारांआडून न्याहाळत होत्या. झकपक पोशाखात चारचाकी व हातात कॅमेरा घेऊन ही मंडळी गीती ऐकण्यासाठी आलेली आहे हे त्यांना कळले होते, पण त्यांच्यासमोर आम्ही फाटक्या कपड्यात जायचे कसे? ही त्यांची चिंता होती. जगाची रीतच अशी आहे. कपड्यांवरून, बाह्यांगावरून स्टेटस ठरविले जाते त्यात त्यांची तरी काय चूक होती? दाराआडून आम्हाला कौतुकाने न्याहाळणारे ते लुकलूकणारे
डोळे त्या क्षणी तरी मला मिणमिणणारे दिवेच भासले.

त्यांची भीड बाजूला सारीत त्यातीलच एका घरात आम्ही शिरलो. आजूबाजूच्या महिला खास आमच्यासाठी एकत्र जमल्या होत्या. सर्वांसाठी ती जागा अपुरी पडत होती. तरीही संकोचमिश्रित उत्साह मात्र दांडगा दिसला. एकच दिवा मधोमध तेवत होता आणि त्याच्याच साक्षीने कौतुकभरल्या नजरेचे दीप गीती गायनाने उजळत गेले. दिवाळीला अजून काही दिवस होते. असे असताना आमटे गावातील महिलांच्या सोबतीने साजरी केलेली. गीतीच्या रसास्वादातील ती चांदणीरात्र मला दिवाळीचा खास आनंदच देऊन गेली.

कर्नाटकातीलच कुंडल गाव. गोव्याच्या सांगे तालुक्यातील नेत्रावळीतील वेरले गावापासून अगदी पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असलेला. तरीही या गावात जाण्यासाठी खानापूरमार्गे शंभर-दीडशे किलोमीटरचा प्रवास करूनच जावे लागते. कार्तिकात येथे तुळसीविवाहाचा दिमाखदार सोहळा समूहिकतेने संपन्न होतो. दारादारांत तुळशीची केलेली सजावट, दिव्यांची रोषणाई आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करते. गावच अभंगात तल्लीन होतो. आश्चर्य वाटले ते एकाच गोष्टीचे… येथे कन्नड भाषेची सक्ती केलेली आहे. शाळेत मुलं कन्नड शिकतात. घरी कोंकणी-मराठी मिश्रित भाषा, तर सण-उत्सव साजरे करताना त्याना मराठी भाषा ही आपली आहे असे वाटते. पूर्णपणे गोव्याशी जोडलेला हा भौगोलिक परिसर कोणी कितीही सक्ती केली, राजकीय दबाव आणला तरीही आमची अभिव्यक्ती आमच्या अंतःकरणातील भाषेमधूनच होणार हे ठामपणे ठरविले गेलेले आहेच .विचारांची ही स्पष्टता जीवनाला उन्नत करते; म्हणून हा दिवा फक्त दिवाळीचाच नाही, त्याचा प्रवास… त्याचे अस्तित्व मर्यादित नाही. तो चिरंतन आहे. अंधारातून उजेडाकडे, विकारातून विवेकाकडे असा त्याचा प्रवास जगण्याची मोठी प्रेरणा आहे. ती प्रेरणा… ती आत्मनुभूती… तो आत्मप्रकाश… तो अंतरीचा ज्ञानदीवा जेव्हा कोणत्या क्षणी प्रकाशमान होतो… स्वतः प्रकाशित होतो, तेव्हा सहवासातील सर्वांनाच उजळून टाकतो… हीच तर दिवाळी…! आशेचा, आनंदाचा दीप मनामनात तेजाळत राहो हीच सदिच्छा!!