दिल्ली, महाराष्ट्रात आजपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक

0
113

आता दिल्लीमधील परिस्थिती बदलत असून येत्या सोमवारपासून म्हणजेच आज दि. ७ जूनपासून दिल्ली सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मॉल, बाजारपेठा आणि कॉम्प्लेक्समधील दुकाने सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुली राहतील. संबंधित मार्केट असोसिएशनकडून दुकानांना देण्यात आलेल्या तारखांनुसार ही दुकाने खुली राहतील. तसेच, दिल्ली मेट्रो आणि प्रवासी बससेवादेखील ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. सर्व खासगी कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी क्षमतेने काम करण्याची मुभा असेल.

महाराष्ट्रात अनलॉकचे
आजपासून ५ टप्पे

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांसाठी वेगवेगळे नियम असतील. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्‌यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्‌यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असणारे जिल्हे किंवा महानगर पालिका पहिल्या टप्प्यात असतील. या टप्प्यासाठी लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट असेल. पुढे अशाच प्रकारे पाचव्या टप्प्यापर्यंत हे निर्बंध कठोर होत जातील. पाचवा टप्पा हा रेड झोन असून सध्याच्या घडीला राज्यात एकही जिल्हा किंवा महानगर पालिका पाचव्या टप्प्यात नाही.

गुजरातमध्ये ४ पासून
निर्बंध हटवले

गुजरातमध्ये अनलॉकची प्रक्रियेला शुक्रवार दि. ४ जूनपासूनच सुरूझाली असून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानुसार, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या कालावधीमध्ये दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, हॉटेलमधून रात्री १० वाजेपर्यंत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय, ७ जूनपासून गुजरातमधील सर्व कार्यालयांना नियमित वेळेनुसार काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तामिळनाडूत १४ जूनपर्यंत
लॉकडाऊनमध्ये वाढ

तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन १४ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, तिथे रुग्णसंख्या कमी असणार्‍या एकूण २७ जिल्ह्यांमधील निर्बंध कमी केलेआहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्यात आले आहेत, तिथे भाजीपाला, फळ आणि मांसविक्रीसाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

बिहारमध्ये ८ पर्यंत
लॉकडाऊनचे निर्बंध

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील लॉकडाऊन ८ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र तिथे निर्बंध कमी केलेअसून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील.