रामलीला मैदानावर भाजपची विराट प्रचारसभा
दिल्लीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून वीजेचा प्रश्न सोडवून ग्राहकांना हव्या त्या कंपनीकडून वीज खरेदी करता येईल अशी व्यवस्था निर्माण करणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ काल नरेंद्र मोदी यांनी फोडला. रामलीला मैदानावर झालेल्या या विराट सभेत त्यांनी दिल्लीकरांवर वेगवेगळ्या आश्वासनांचा पाऊस पाडला. दिल्लीत होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा म्हणजे भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच भाजपने ही सभा अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत मोदी म्हणाले की, देशाच्या राजधानीत अराजक खपवून घेतले जाणार नाही. ज्यांना ते करायचे आहे त्यांनी नक्षलवाद्यांसोबत जंगलात जावे. जे धरणे धरण्यात पटाईत आहेत त्यांना तेच उद्योग करू देत. आम्ही सरकार चालवण्यात निष्णात असून संधी देण्याचे आवाहन त्यांनी दिल्लीतील मतदारांना केले.
‘आप’ला लक्ष्य करताना मोदी म्हणाले, ‘‘दिल्लीत सध्या खोट्याचा कारखाना तेजीत आहे. भाजप सत्तेत आल्यास निवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्यात येईल अशी अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत खोट्याचा पराभव करण्याची क्षमता केवळ मतदारांमध्ये असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या यशाचे पाढे वाचले. कॉंग्रेसने कसे देशाचे नुकसान केले आणि भाजप सरकार कसे देशासाठी चांगले काम करत आहे, याचा लेखाजोखा त्यांनी सांगितला. केजरीवाल यांच्यावरही जोरदार टीका करताना ते म्हणाले की, गेल्यावेळी केजरीवाल रामलीला मैदानावर मेट्रोतून प्रवास करून आले होते. पण त्यानंतर त्यांनी कधी मेट्रोत प्रवास केला का? असा सवाल त्यांनी उपस्थित मतदारांना केला. केजरीवाल केवळ नाटकबाजी करत असल्याची टीकाही शाह यांनी केली.