दामोदर भजनी सप्ताहाला लोटला भाविकांचा जनसागर

0
16

>> कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर दिमाखात प्रारंभ; मंत्री-आमदारांचीही उपस्थिती

श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण आणि जय जय राम कृष्ण हरीच्या गजराने वास्कोच्या प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला दिमाखात सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक स्वरूपात साजरा होणार्‍या अखंड २४ तास भजनी सप्ताहाला प्रचंड जनसागर लोटला. भजन आणि भाविकांची रेलचेल यामुळे भक्तिमय व उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळाले.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे सार्वजनिकरित्या साजरा न होऊ शकलेल्या वास्कोच्या प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला काल उद्योगक प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्री चरणी श्रीफळ अर्पण करून प्रारंभ झाला. त्यानंतर अशोक मांद्रेकर व साथी कलाकारांच्या ‘जय जय राम कृष्ण हरी’ नामाच्या गजराने अखंड २४ तासांच्या भजनाला सुरुवात झाली. त्यानंतर साखळी पद्धतीने २४ तासांच्या अखंड भजनाला प्रारंभ झाला. याप्रसंगी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, उद्योगक नारायण बांदेकर, उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू, मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स उपस्थित होते. संध्याकाळच्या सत्रात उपसभापती जोशुआ डिसोझा, मंत्री माविन गुदिन्हो, रोहन खवंटे, आमदार विजय सरदेसाई, जेनिफर मोन्सेरात, कार्लूस आल्मेदा, जीत आरोलकर, दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, नरेंद्र सावईकर, दीपक नाईक यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.

दोन वर्षानंतर सार्वजनिकरित्या साजरा होणार्‍या या १२३व्या श्री दामोदर भजनी सप्ताहाला अलोट गर्दी होती. भाविक श्री दामोदर देवाच्या दर्शनाला आतुरलेला होता, हे त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. दोन-तीन तास रांगेत उभे राहून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संध्याकाळच्या सत्रात सप्ताहानिमित्त श्री दामोदर उत्सव बाजारकर समितीतर्फे स्वतंत्र पथ मार्गावर पोलीस वसाहतीजवळ गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा भजनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जेष्ठ भजनी कलाकार पांडुरंग राऊळ, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गावस या गायक कलाकारांनी भाग घेतला.

उत्सव समितीतर्फे यंदा दोन गायकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पहिली बैठक नटराज थिएटरजवळ उभारण्यात आलेल्या मंडपात आयोजित केली होती. या बैठकीत प्रसिद्ध गायक कलाकार ऋषिकेश बडवे यांच्या गायनाची मैफल झाली. दुसरी बैठक जोशी चौकात श्री साईबाबा मंदिराजवळ संपन्न झाली. या दोन्ही मैफलींतगायक ऋषिकेश बडवे यांनी रसिकश्रोत्यांना रिझवून ठेवले.

या बैठकीनंतर पाराचे मंदिराकडे जाण्यास मार्गक्रमण झाले. पार मंदिराकडे पहाटे ४ वाजता पोहोचल्यानंतर पाराची समाप्ती झाली.