दाबोळी विमानतळावर विमान प्रवाशांना लुटण्याच्या प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल एका घटनेत विमानतळावर काम करणार्या दोघा कर्मचार्यांनी युक्रेनच्या एका महिला पर्यटकाच्या बॅगेतून १ लाख ३० हजार रुपयांचे विदेशी चलन चोरण्याची घटना घडली. तथापि, सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे हे दोघे चोरटे पोलिसांच्या हाती आयतेच सापडले. दाबोळी विमानतळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी युक्रेनहून चार्टड विमानानाने गोव्यात फिरायला आलेल्या बोझुकू ओलिकोसॅन्ड्रा हीच्या बॅगमधून बसप्पा लमाणी (मांगोरहिल) आणि रझाक शेख (बायणा) या दोघांनी १ लाख ३० हजार रुपयांचे विदेशी चलन लांबविले. विमानतळावरील माल हाताळणी बेल्टवर हे दोघे लोडर काम करीत होते. तेव्हाच त्यांनी बॅग खोलून पैसे लांबविले. तक्रारदार बोझुकू यांनी जेव्हहा आपली बॅग बेल्टवरून काढली तेव्हा ती उघडी असल्याचे तिच्या लक्षात आले. तीने विमानतळ पोलिसांकडे लगेच तक्रार केली असता सीसीटीव्ही फूटेजवरून वरील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून ऐवज सापडलेला नाही. बॅगेतून विदेशी चलन लंपास करून ते विमानतळावरील प्रसाधनगृहात लपविल्याचे वरील चोरट्यांनी जबानीत सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रसाधनगृहात जाऊन शोध घेऊनही चोरलेला ऐवज सापडला नाही. याप्रकरणी दाबोळी विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.