20,618 पैकी 19,486 विद्यार्थी उत्तीर्ण
निकालात यंदाही मुलींनी मारली बाजीगोवा शालांत मंडळाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी इयत्तेचा निकाल जाहीर करण्यात आला असून हा निकाल 94.51 टक्के एवढा लागला आहे. मार्च महिन्यात राज्यभरातील 32 केंद्रांतून घेण्यात आलेल्या या परीक्षेला बसलेल्या 20,618 विद्यार्थ्यांपैकी 19,486 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालात मुलींची चमक
यंदाही परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी चमक दाखवलेली असून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ही मुलींपेक्षा कमी आहे. यंदा परीक्षेला बसलेल्या मुलांची संख्या ही 10,813 एवढी होती. त्यातील 10,072 मुलगे उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 94.37 टक्के एवढी आहे. यंदा 9,805 एवढ्या मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 9,414 मुली उत्तीर्ण झालेल्या असून त्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 96.51 एवढी आहे.
191 जणांचा निकाल राखीव
191 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 140 मुलांचे तर 51 मुलींचे निकाल आरक्षित ठेवण्यात आले आहेत. सर्वसामान्य गटातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 95.17% एवढी
आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 98.37 टक्के एवढी आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.38 टक्के तर अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 97.38 टक्के एवढी आहे.
सर्वाधिक निकाल
धारबांदोडा तालुक्याचा
यंदा सर्वाधिक निकाल हा धारबांदोडा ह्या तालुक्याचा लागला असून तो 98.47 टक्के एवढा आहे. या तालुक्यातील 457 विद्यार्थ्यांपैकी 450 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित तालुक्यांचा निकाल खालीलप्रमाणे आहे. बार्देश तालुक्याचा निकाल हा 95.54 टक्के एवढा आहे. या तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या एकूण 3472 विद्यार्थ्यांपैकी 3317 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डिचोली तालुक्याचा निकाल हा 96.27 टक्के एवढा लागला असून 1714 विद्यार्थ्यांपैकी 1650 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. काणकोण तालुक्याचा निकाल हा 97.49 टक्के एवढा लागला असून 597 विद्यार्थ्यांपेक्षा 582 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केपे तालुक्याचा निकाल हा 94.12 टक्के एवढा लागलेला असून एकूण 1191 विद्यार्थ्यांपैकी 1121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुरगाव तालुक्याचा निकाल 91.90 टक्के लागला असून 1629 विद्यार्थ्यांपैकी 1497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सासष्टी तालुक्याचा निकाल 94.35 टक्के एवढा लागलेला असून 4622 विद्यार्थ्यांपैकी 4361 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. सत्तरी तालुक्याचा निकाल हा 93.88 टक्के एवढा लागलेला असून 556 विद्यार्थ्यांपैकी 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तिसवाडीचा निकाल हा 95.54 टक्के एवढा लागला असून 2198 विद्यार्थ्यांपैकी 2100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फोंडा मतदारसंघाचा निकाल हा 95.78 टक्के एवढा लागला असून 2629 विद्यार्थ्यांपैकी 2518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सांगे तालुक्याचा निकाल हा 97.29 टक्के एवढा लागला असून 332 विद्यार्थ्यांपैकी 323 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
417 जणांना एटीकेटी
एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या 417 विद्यार्थ्यांना एटीकेटी देण्यात आलेली असून त्यांना अकरावी इयत्तेत प्रवेश घेता येणार आहे. मात्र, त्यांना त्यांचा अकरावी इयत्तेचा निकाल मिळवण्यासाठी पुढील दोन वर्षांच्या आत दहावीतील अनुत्तीर्ण झालेल्या विषयांत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.
क्रीडा गुणांमुळे 67 विद्यार्थी उत्तीर्ण
6637 विद्यार्थ्यांना यंदा क्रीडा गुण (क्रीडापटू असलेले विद्यार्थी) मिळाले असून त्यापैकी 67 विद्यार्थी हे क्रीडा गुणांमुळे परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदा क्रीडा गुणांमुळे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 0.34 टक्के एवढी आहे.
विषयवार टक्केवारी
इंग्रजी विषयात उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी 96.64 टक्के एवढी आहे. हिंदीची उत्तीर्ण टक्केवारी 97.87 टक्के, मराठीची 98.38 टक्के, कोकणीची उत्तीर्ण टक्केवारी 95.34 टक्के, उर्दूची 99.16 टक्के, संस्कृत 100 टक्के, अरेबिक 100 टक्के, फ्रेंच 100 टक्के, पोर्तुगीज 100 टक्के, स्टँडर्ड मॅथॅमॅटिक्स (गणित) 99.74 टक्के, बेसिक मॅथॅमॅटिक्स (गणित) 91.44 टक्के, विज्ञान 94.74 टक्के, समाजशास्त्र 94.48 टक्के, इंडियन साइन लँग्वेज 86.79 टक्के निकाल लागला आहे.