दहावीचा विक्रमी ९९.७२ टक्के निकाल

0
101

>> सांगे, धारबांदोडा तालुक्याचा निकाल १०० टक्के; ९९.९८ टक्के मुली, तर ९९.०५ टक्के मुले उत्तीर्ण

कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर काल जाहीर करण्यात आला. यंदाचा दहावीचा निकाल विक्रमी ९९.७२ टक्के एवढा लागला, अशी माहिती गोवा शालांत मंडळाचे चेअरमन भगिरथ शेट्ये यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोरोनामुळे परीक्षा न घेताच निकाल जाहीर होणार असल्याने त्याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसह सर्वांचेच लक्ष लागले होते.

दहावीतील २३९६७ विद्यार्थ्यांपैकी २३९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ६७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये १२९४६ मुलांचा, तर १०९५४ मुलींचा समावेश आहे. यंदाचा दहावी इयत्तेचा निकाल हा राज्यातील आतापर्यंतचा विक्रमी व सर्वाधिक असा निकाल असल्याची माहितीही भगिरथ शेट्ये यांनी दिली. जे ६७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कुठली तरी एक अंतर्गत परीक्षा दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अनुत्तीर्ण होण्याची वेळ आल्याची माहिती शेट्ये यांनी दिली.

केवळ २ मुली अनुत्तीर्ण
वस्तुनिष्ठ निकषांद्वारे ज्या २३९६७ जणांचा निकाल तयार करण्यात आला त्यात १३०११ एवढे मुलगे होते. त्यापैकी १२९४६ उत्तीर्ण झाले, तर ६५ जण अनुत्तीर्ण झाले. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.०५ टक्के एवढे आहे. १०९५६ मुलींपैकी १०९५४ मुली उत्तीर्ण झाल्या. केवळ २ मुली अनुत्तीर्ण झाल्या. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ९९.९८ एवढी आहे.

दोन तालुक्यांचा १०० टक्के निकाल
सांगे व धारबांदोडा या दोन तालुक्यांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. काणकोण केंद्राचा निकाल ९९.९ टक्के लागला आहे. तसेच पेडणे व फोंड्याचाही निकाल ९९.९ टक्के लागला आहे. डिचोली, सत्तरी व मुरगावचा ९९.८ टक्के, सासष्टी व बार्देशचा ९९.७ टक्के, तिसवाडीचा ९९.४ टक्के, तर केपेचा ९९.२ टक्के एवढा निकाल लागला आहे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी इयत्तेत प्रवेश घेता येईल, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

निकालावर समाधानी नसलेले
विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात

जे विद्यार्थी वस्तुनिष्ठ निकषांद्वारे तयार केलेल्या आपल्या निकालावर समाधानी नाहीत, ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा शालांत मंडळ अथवा त्यांच्या विद्यालयाकडून घेण्यात येईल. मात्र महामारीचा धोका नसेल, त्याच वेळी पूर्वकल्पना देऊन ही परीक्षा घेतली जाणार आहे.

१० दिवसांत प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर होणार
ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल, तसेच जे डिप्लोमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात, त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच खासगी, आयटीआयसाठीची शालांत मंडळाची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षांसाठीची तारीख १० दिवसांच्या आत जाहीर करण्यात येणार आहे. २०२० किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनाही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.