दर्यादिल राजकारणी

0
185
  • वामन सुभा प्रभू
    (ज्येष्ठ पत्रकार)

२२ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या मोबाईलवर झळकलेला हा संदेश मागील सहा-सात दिवसांत मी किमान साठ-सत्तरवेळा वाचला असेल. मैत्रीचं, मित्रत्वाचं नातं या संदेशात उलगडून सांगितलं आहे. मैत्री ही रेशमी धाग्याने बांधलेलं बंधन असतं, सुगंधी असं ते एक चंदन असतं, असं बरंच काही हा संदेश आम्हाला सांगतो. माझ्या ५१-५२ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात, पत्रकार ते राजकारणी अशा अनेक रूपे वा भूमिकांतून माझा जवळचा साथीदार राहिलेल्या परम मित्र प्राचार्य सुरेंद्र सिरसाट यांनी मला वॉट्सऍप केलेला हा संदेश.

रेशमी धाग्यांचं एक बंधन असतं,
सुगंधी असं ते एक चंदन असतं|
वसंतात कधी ते हसतं,
जवळ असताना ते जाणवत नसतं|
दूर असताना राहवत नसतं,
मित्रत्वाचं नातं हे असंच असतं॥

२२ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या मोबाईलवर झळकलेला हा संदेश मागील सहा-सात दिवसांत मी किमान साठ-सत्तरवेळा वाचला असेल. मैत्रीचं, मित्रत्वाचं नातं या संदेशात उलगडून सांगितलं आहे. मैत्री ही रेशमी धाग्याने बांधलेलं बंधन असतं, सुगंधी असं ते एक चंदन असतं, असं बरंच काही हा संदेश आम्हाला सांगतो. माझ्या ५१-५२ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात, पत्रकार ते राजकारणी अशा अनेक रूपे वा भूमिकांतून माझा जवळचा साथीदार राहिलेल्या परम मित्र प्राचार्य सुरेंद्र सिरसाट यांनी मला वॉट्सऍप केलेला हा संदेश. त्यानंतर केवळ सहा दिवसांत माझा हा मित्र परत न येण्याच्या, अनंताच्या यात्रेला निघेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मित्रत्वाचं नातं पूर्ण निभावूनच आपण निघत आहे, हेच तर या मित्राने मला पाठवलेल्या संदेशातून कळवलं वा सूचित केलं नसावं ना, असंच मला आता राहून राहून वाटू लागलं आहे आणि या संदेशाचा नेमका अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे. होय, आमच्यामधील मैत्रीचं नातं हे असंच रेशमी धाग्यांचं एक बंधन होतं. सुमारे पन्नास वर्षं आमची मैत्री राहिली आणि अनेक कसोट्यांवर टिकलीही. सोमवारी सकाळी वृत्तपत्रं हातात घेतली तर या माझ्या मित्राच्या निधनाची बातमी पाहून मी हादरलोच. सुरेंद्र आजारी होता, इस्पितळात त्याच्यावर उपचार चालू आहेत याची कल्पना नव्हती असं नाही; पण दोन दिवसांतच सारं काही संपलं होतं. हा धक्का सहन करणं मला बरंच जड झालं. कोणत्याही बर्‍या-वाईट घटनांचा आरसा असलेल्या सोशल मीडियावर फेरफटका मारूनच रात्री झोपायला जाणं हा तसा माझा नेहमीचा शिरस्ता. काहीवेळा माझा पत्रकार मुलगा प्रवेश हाही कोणतीही महत्त्वाची घटना घडली असेल तर वेळेचं भान न ठेवता मला कळवल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री असल्याने एखाद-दुसरा दिवस मोबाईलच्या वाट्याला न जाता झोपायला जाणं व्हायचं. रविवारची रात्र त्यातलीच एक रात्र होती. पत्रकारितेतील माझ्या ५१ वर्षांच्या प्रवासावर चालू असलेल्या पुस्तक लिखाणातील आणखी एक प्रकरण संपवून मी रात्री साडेअकरा वाजता झोपायला गेलो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मोबाईल ऑन करून पाच मिनिटे सोशल मीडियावर मुशाफिरी केली असती तर सुरेंद्रची बातमी रात्रीच कळली असती; पण तसं झालं नाही. ज्यावर भरवसा होता त्या प्रवेशनेही मला ही बातमी झोपण्याआधी दिल्यास मला त्याचा त्रास होईल हे जाणून बातमी न देणंच उचित ठरवलं. सुरेंद्रशी माझ्या असलेल्या जिवाभावाच्या नात्याची कल्पना या प्रसंगातून कोणालाही यावी. सुरेंद्र आता या जगात राहिलेला नाही, हे मला दुसर्‍या दिवशी सकाळीच कळणं इष्ट ठरेल, असं प्रवेशला वाटलं ते त्यासाठीच. सोमवारी सकाळी वृत्तपत्रातील ती बातमी वाचून मी पुरता गळून गेलो. आप्तस्वकीयांपैकीच मी एकाला गमावल्याचं ते दु:ख होतं. मित्रत्वाचं खरं नातं उलगडून सांगणारा संदेश पाठवल्यानंतर उण्यापुर्‍या सहा दिवसांतच माझ्या पत्रकारितेच्या प्रवासातील हा मित्र अनंताच्या यात्रेला निघून गेल्याचं मानण्यास मन तयार नव्हतं; परंतु गोव्याच्या सार्वजनिक जीवनाच्या इतिहासातील एक सोनेरी पान गळून पडलंय, हे सत्य मानणं भाग होतं.

सुरेंद्र सिरसाटकडील मैत्री हे शब्द लिहिताना मनात अनेक आठवणी दाटतात. पन्नास वर्षांआधी ‘गोमन्तक’चा बातमीदार म्हणून सुरेंद्रशी झालेल्या भेटीपासून अगदी दीड-दोन महिन्यांआधी डांगी कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी तीन-चारवेळा झालेल्या भेटीपर्यंत अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळतात. त्यांच्यातील अनेक व्यक्तिमत्त्वांशी माझी भेट झालेली आहे. बातमीदार म्हणून सुरेंद्रला जसा मी भेटलो तसाच नगरसेवक, आमदार, म्हापसा अर्बन बँकेचे संचालक, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, राज्य विधानसभा सभापती, मंत्री, म.गो. पक्षाचा अध्यक्ष, जनता पक्षाचा प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष, प्राध्यापक, प्राचार्य, कलाकार, लेखक आणि एक कार्यकर्ता समाजसेवक म्हणूनही त्यांच्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे मी अगदी जवळून दर्शन घेतलं आहे, अनुभवलं आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांची श्रीमंती तशी क्वचितच कोणाच्या वाट्यास आली असेल. अर्धशतकी पत्रकारितेच्या दीर्घ प्रवासात अनेक राजकारणी, आमदार, मंत्री भेटले आणि पाहिलेही परंतु सुरेंद्र सिरसाट यांच्यासारखा दर्यादिल, शालीन, सभ्य राजकारणी विरळाच. ज्या ज्या क्षेत्राला, मग ते कोणतेही क्षेत्र असो, सुरेंद्र सिरसाट यानी स्पर्श केला तेथे त्याचे सोने केले. वास्तविक माझ्या या मित्राने असे एकही क्षेत्र सोडले नाही की जेथे त्याने आपला स्वतःचा ठसा ऊमटवला नाही. मानापनाच्या महारूद्र देवस्थानाच्या उत्सवात नाटकात त्यानी वठवलेल्या काही भूमिकाही आम्ही पाहिल्या आहेत. ते स्थानिक दैनिकात लिहीत असलेल्या सत्यकथांचा मीही एक वाचक होतो. सुरेंद्र सिरसाट यांच्या सुरुवातीच्या भेटीच्या काळात आठवड्यातून निदान एकदा तरी त्यांची फेरी चक्क गोमन्तकमध्ये असायची. म्हापशाचे एखादी तरी बातमी अंकात असावी यावर त्यांचा कटाक्ष असे, नव्हे त्यासाठी तसे कामही करत असत. रोज नसली तरी दिवसाआड फोनवर आमची गाठ पडत असे. येथेच आम्हा दोघांची नाळ जुळली आणि अखेरपर्यंत ती कायम राहिली. साधारण ७५च्या सुमारास सुरेंद्र सिरसाट यांनी राजकारणात प्रवेश केला आणि म्हापशाचे नगरसेवकही झाले. ही तर त्यांच्या क्रियाशील राजकीय कारकिर्दीची केवळ सुरूवात होती. त्यानंतर केवळ दोन वर्षातच विधानसभेचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला. अर्थात त्यावेळचे राजकारण हे आजच्या काळाच्या तुलनेत वेगळेच होते. राजकारणाची आजची व्याख्याही खूपच बदललेली आहे. १९७७च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ऊमेदवारीवर म्हापसा मतदारसंघांतून विधानसभेवर झालेली त्यांची निवड आमच्यासारख्या त्यांच्या अनेक मित्रांसाठी गौरवास्पद बाब होती. त्यानंतर राजकारणातील एक एक शिखर पादाक्रांत करत त्यानी आपल्या दर्यादिल स्वभावाने आणि त्यांच्यातील अंगभूत अनेक गुणांच्या जोरावर सर्वानाच जिंकले. राजकारण म्हटलं की स्वतःच्या अंगाला आधी चिखल फासावा लागतो किंवा चिखलात उडी घेणे अपरिहार्य ठरते. नंतरच दुसर्‍यावर तो फेकण्याची तयारी हवी, ही आजच्या राजकारणाची व्याख्या आहे. कोणताही चिखल अंगावर घेण्याची मनाची तयारी त्यामुळे होते. १९७७ नंतरच्या दोन-अडीच दशकांनंतर तेव्हाच्या राजकारणाला असं विकृत वळण मिळत गेलं की त्या राजकारणापासून दूर राहणंच आमच्या मित्राने पसंत केलं. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात खर्‍या अर्थाने लोकशाही आणली ती सुरेंद्र सिरसाट यांनीच. शशिकला काकोडकर यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला हरवून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ जेव्हा सुरेंद्र सिरसाट यांच्या गळ्यात पडली तो दिवसही यादगार बनून राहिला आहे. एकदा नव्हे तर दोनवेळा ही किमया सुरेंद्र सिरसाट यांनी करून दाखवली आहे. दुसर्‍यावेळी त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी होते शिवदास शेट वेरेकर. त्यावेळी या गोष्टी तशा सोप्या नव्हत्या. सुरेंद्र सिरसाट हे आर्थिकदृष्ट्या सशक्त होते, अशातलाही भाग नव्हता; परंतु अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हीच त्यांना मिळालेली सर्वांत मोठी देणगी होती आणि त्याच्या जोरावरच आमच्या या मित्राने मोठमोठ्या लढाया जिंकल्या. दैवाने त्यावेेेळी आणखी थोडी साथ दिली असती तर आमचा हा मित्र गोव्याच्या मुख्यमंत्रिपदीही विराजमान झालेला आम्हा सर्वांना पाहायला मिळाला असता; परंतु तसं होणं नव्हतं. १९७८-७९ च्या वर्षात मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्याविरोधात विधानसभागृहात जो एक प्रकारचा ‘तमाशा’ झाला त्यावेळी मी स्वत: पत्रकार गॅलरीत हजर होतो. सुरेंद्र सिरसाट यांनी त्यावेळी बाळगलेला संयम आणि ज्या प्रकारे त्यांनी एकूण परिस्थितीचं भान ठेवून स्वत:ला अलिप्त ठेवलं, त्याचं आजही कौतुक वाटतं. नंतर त्याचा पद्धतशीर विपर्यास करण्यात आला असला तरी वस्तुस्थिती वेगळी होती. शशिकला काकोडकर यांचं सरकार कोसळल्याने व नंतर राष्ट्रपती राजवट गोव्यात लागू करण्यात आल्याने या विधानसभेची मुदत तीन वर्षांतच संपली. परिणामी सुरेंद्र सिरसाट यांची आमदार म्हणून टर्म फक्त तीन वर्षांची राहिली. त्याची भरपाई नंतर त्यांनी ८९ आणि ९४ मध्ये सलग दोन निवडणुका जिंकून केली. ८९ नंतर कॉंग्रेसचं सरकार जाऊन सत्तेवर आलेल्या पुलोद सरकारातही त्यांचं योगदान राहिलं. सभापती म्हणून त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण निवाड्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या शिक्कामोर्तबामुळे सुरेंद्र सिरसाट यांची तत्त्वनिष्ठा खर्‍या अर्थाने अधोरेखित झाली. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरच्या पहिल्या विधानसभेचा काळ राजकारण्यांच्या कोलांट्या उड्यांमुळे खर्‍या अर्थाने गाजला असला तरी सभापती म्हणून सुरेंद्र सिरसाट यांनी दिलेल्या रोखठोक निवाड्यामुळे ते चर्चेत राहिले.

प्राचार्य सुरेंद्र सिरसाट यांच्याशी असलेली माझी गाढ मैत्री पारखून भाजपचे तत्कालीन प्रदेश सचिव मनोहर पर्रीकर यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती करण्याचा प्रस्ताव सुरेंद्र सिरसाट यांच्याकडे पोचवण्याचं व त्याचा पाठपुरावा करण्याचं काम मित्र या नात्याने माझ्याकडे सोपवलं. १९८९ मध्ये म. गो. पक्षाने भाजपला केवळ दोन जागा देऊ केल्याने या दोन पक्षांमध्ये युती झाली नव्हती. यावेळीही म.गो.चे अन्य काही नेते भाजपकडील युतीसाठी विशेष रस घ्यायला तयार नव्हते. मित्र या नात्याने सुरेंद्र सिरसाट यांच्याशी विस्तृतपणाने त्यावर चर्चा केली. युतीवर प्राथमिक बोलणी करण्यासाठी निदान होकार द्यावा यासाठी मी प्रयत्न केले आणि त्यात यश आलं. आमच्या पर्वरी येथील निवासस्थानीच बोलण्याच्या तीन-चार फेर्‍या झाल्या. म. गो. आणि भाजप यांच्यात युतीसाठी आमच्या घरी झालेल्या चर्चेत वाटा घेणारे दोन मोहरे आता काळाच्या पडद्याआड गेलेत. दोन वर्षांआधी मनोहर पर्रीकर यांनी अकाली या जगाचा निरोप घेतला तर सुरेंद्र सिरसाट आता असेच एकाएकी आमच्यातून न परतण्यासाठी दूरच्या प्रवासाला निघून गेले आहेत. भाजप आणि म.गो.च्या नेत्यांमध्ये आमच्या घरी झालेल्या आणि नंतर सिरसाट यांच्या म्हापशातील पोलिस स्टेशननजीकच्या जुन्या बैठ्या घरातील बैठकांतही सिरसाट यांनी पक्षासाठी आग्रहाने मांडलेली भूमिका मला आजही आठवते. या घटनेला आता २७ वर्षं होऊन गेली असली तरी गोव्याच्या पक्षीय राजकारणातील तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला. भाजपने याच युतीच्याद्वारे चार आमदारांसह विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर भाजप राज्यात खर्‍या अर्थाने बहरत गेला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला त्यानंतर उतरती कळा लागली असली तरी त्याची कारणंही अनेक आहेत. मध्यंतरी झालेल्या भेटीत सुरेंद्र सिरसाट यांना त्या काळातील घटना, विशेष करून त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली युती यावर बोलतं करण्याचाही प्रयत्न केला; पण भाजपशी केलेल्या युतीचा आपल्याला कोणताही खेद वाटत नाही, त्यावेळची ती गरज होती, या मतावर ते ठाम होते. ९४च्या निवडणुकीनंतर गोव्याच्या राजकारणाने कूस बदलली आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीत आमच्या मित्राकडे खास अशी भूमिका राहिली नाही. एकूण परिस्थितीचं भान ठेवून २००२ मध्ये सुरेंद्र सिरसाट विजय मल्ल्‌याच्या जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बनले. आमच्या गोवा न्यूजलाइन वृत्तवाहिनीचं कार्यालय असलेल्या पणजीतील कांपाल ट्रेड सेंटर इमारतीतच गोवा प्रदेश जनता पक्षाचं कार्यालय थाटलं होतं. त्यामुळेही सुरेंद्र सिरसाट यांची भेट होत राहिली. संपर्क तर कायम होता. जनता पक्ष आणि नंतर या पक्षाचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण झाल्यानंतर एकूण रागरंग पाहून सुरेंद्र सिरसाट यांनी निवडणूक न लढवण्याचाच निर्णय घेतला. राजकारण्यांमध्ये रागरंग ओळखून निर्णय घेण्याची क्षमता आज अभावानेच दिसते; परंतु आमचा मित्र मात्र त्यास अपवाद होता. यानंतर त्यानी आपल्या अधिकच आवडीच्या शिक्षण क्षेत्रात अधिक लक्ष देत तेथेही आपली छाप सोडली.

आमचे सामाईक मित्र स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर मी लिहिलेल्या ‘मनोहर पर्रीकर-ऑफ द रेकॉर्ड’ या पुस्तकाने आम्हा दोघांना अलीकडे पुन्हा एकत्र आणलं. नियतीचीच ती इच्छा असावी. पर्रीकर यांच्यावरील पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती करत मी त्यांच्या घरी पोचलो तेव्हा कोविड-१९चा धसका त्यांनीही घेतला होता, हे स्पष्ट दिसत होतं. माझी प्रस्तावना लिहिण्याची विनंती अमान्य करणं त्यांना शक्य नव्हतंच. ९४ च्या म.गो.-भाजप युतीच्यावेळी मी घेतलेल्या पुढाकाराचा संदर्भही पुस्तकात असल्याने प्रस्तावना त्यांनीच लिहावी, यावर माझा भर होता आणि त्यांनी तो नेमका ओळखला. त्यानंतर पुन्हा दोन-तीन वेळा त्यांच्या घरी जाणं झालं. पुस्तक प्रकाशन समारंभास त्यांनी यावं, यासाठी केलेला आग्रह मात्र त्यांनी कोविडचं कारण देऊन नाकारला. प्रकाशन समारंभानंतर दोन-तीन दिवसांनीच त्यांना पुस्तकाची प्रत भेट देण्यासाठी पुन्हा म्हापशाला त्यांच्या घरी गेलो; पण त्यांची भेट न झाल्याने वहिनींकडे पुस्तक देऊन परतलो. पुस्तक देण्यासाठी पणजीहून मुद्दाम म्हापशाला आल्याने नंतर फोनवरून सुरेंद्रने माझे आभारही मानले आणि पुस्तक खूपच सुंदर झाल्याचा अभिप्रायही दिला. या पुस्तकावर अभिप्राय लिहिण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं; परंतु प्रकृती अस्वास्थ्याने असावं त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. पुस्तकाच्या निमित्ताने झालेली आमची भेट शेवटची ठरली. त्यांच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहताना सुमारे पन्नास वर्षांचा आमचा सहवास झटकन डोळ्यांसमोरून सरकत गेला. एका दर्यादिल मित्राला ही शब्दांजली.